Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 160

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…

$
0
0

निरूपण –

आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत.

जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,
सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥

जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच मानतो. या दोन्ही आईंशी आपण एकरूप आहोत, कारण आपण त्यांच्यापासूनच जन्मलो आहोत. ही एकरूपता अनुभवणे म्हणजेच मातृभक्तीची भावना. ही एकरूपता सर्वांना सतत जाणवते असे नाही. जाणवत नसते तेव्हा तिला ‘मातृभक्ति की सुप्त’ म्हणजे झोपलेली ‘भावना’ म्हटले आहे. सर्वांमध्ये ही एकरूपतेची भावना जागी करण्याचे काम आम्ही स्वीकारले आहे.

सदैव से महान जो सदैव ही महान हो,
कोटि-कोटि कंठ से अखंड वंद्य गान हो,
मातृ-भू की अमरता, समृद्धि और अखण्डता की
शुभ्र कामना जगाने हम चलें ॥१॥

कामना म्हणजे अमुक एक गोष्ट व्हावी किंवा मिळावी, ही इच्छा. स्वतःला मिळावे, स्वतःसाठी व्हावे अशी, इच्छा असली की ती स्वार्थाने डागाळलेली किंवा कलंकित कामना. अनेकांना किंवा सर्वांना मिळावे, किंवा सर्वांसाठी व्हावे, ही शुभ्र किंवा निष्कलंक कामना. शुभ्र म्हणजे स्वार्थरहित.आपली मातृभूमी पूर्वीपासून महान आहेच. ती या पुढेही सर्व काळ महान राहावी ही शुभ्र कामना. कोट्यवधी लोकांनी महान मातृभूमीची स्तोत्रे सतत गावीत, ही शुभ्र कामना.

आम्ही ‘देशजननी रूप में ही विश्वजननी दीखती’ असे म्हणतो. मातृभूमीला आम्ही जगन्मातेचे प्रतीक मानतो. ही मातृभूमी अमर म्हणजे तिचे अस्तित्व चिरंजीव व्हावे, तिची समृद्धी किंवा भरभराट होत राहावी आणि तिची अखंडता म्हणजे फाळणी आणि फुटीरता नष्ट व्हावी, हीच शुभ्र कामना आहे. ही कामना धृपदात म्हटल्याप्रमाणे जगन्मातेपर्यंत पोचावी आणि मातृभूमी प्रमाणे अखिल पृथ्वीच्या रूपातील जगन्माताही चिरंजीवी, समृध्द व अखंड व्हावी याकरिता आम्ही सरसावलो आहोत.

एक माँ के पूत, एक धर्म, एक देश है,
फिर भी प्रेम के स्थान ईर्षा और द्वेष है,
सुबन्धुता व स्नेह की, सुकार्य और सुध्येय की
स्वच्छ भावना जगाने हम चले ॥२॥

सारे भारतवासी हे एकाच भारतमातेचे कन्या-पुत्र आहेत. सर्वांचा देश आणि मातृभक्तीचा धर्म एकच आहे. झोपेतून उठल्यावर डोळे, तोंड धुवून, प्रातर्विधी व स्नान करून शरीर स्वच्छ करावे लागते. तसे मातृभक्तीची सुप्त भावना जागी केल्यावर त्याबरोबर डागाळलेल्या, म्हणजे स्वतःपुरते बघायच्या, कामना आणि परस्पर प्रेमाऐवजी ईर्षा म्हणजे एकमेकांशी स्पर्धा आणि त्यातून येणारा मत्सरही प्रकट होतात. या अस्वच्छ भावना धुवून काढायला हव्यात. आपण एका आईचे कन्या-पुत्र आहोत, या नात्याने आपण प्रेमाने जोडले गेलेले आहोत, हे एकदम लक्षात येत नाही. त्यासाठीच ईर्षा आणि द्वेषाच्या जागी परस्परांमध्ये सुबन्धुता, म्हणजे राम-लक्ष्मण किंवा राम-भरतासारखा बंधुभाव व स्नेह, म्हणजे राम-सुग्रीव किंवा कृष्ण–सुदामा सारखी मैत्री, या स्वच्छ भावना जागवायला आम्ही निघालो आहोत. स्वच्छ म्हणजे अहंकाररहित. अस्वच्छ भावना समूळ जाण्याकरिता व स्वच्छ भावना कायम टिकण्याकरिता मातृभूमीची अखंडता, समृद्धी आणि अमरता यासाठी प्रयत्न करणे हे सुकार्य आहे. ती शुभ्र कामना मनात सदैव असणे हेच सुध्येय आहे. सुबन्धुता, स्नेह, सुकार्याची तळमळ आणि सुध्येयाची आस याच स्वच्छ भावना आम्हांला सर्वांमध्ये जागृत करायच्या आहे.

प्रान्त-भेद, भाषा-भेद, भेद भी अनेक हैं,
छिद्र –छिद्र राष्ट्र का शरीर देख खेद है,
अनेकता व भेदता से एकता अभेदता की
श्रेष्ठ भावना जगाने हम चले ॥३॥

सुबन्धुता व स्नेह या स्वच्छ भावना. त्या जाग्या व्हाव्यात या साठी वर वर दिसणाऱ्या वेगळेपणाच्या आतला सारखेपणा जाणवणे व आपण शंभर आणि पाच नसून एकशे पाच आहोत हे जाणवणे, म्हणजेच स्वच्छतेच्या पलीकडच्या, श्रेष्ठ भावना जागवायच्या आहेत. श्रेष्ठ भावना म्हणजे स्व-केंद्रित ऐवजी राष्ट्र्केंद्रित भावना. जाती, पंथ, प्रान्त, भाषा, खान-पान हेच बघायला लागले तर अगदी दोन व्यक्तींमध्ये सुद्धा भेद दिसतील. कापडाकडे कावळ्याच्या नजरेने पाहिले तर आडव्या-उभ्या धाग्यांच्या ऐवजी त्यांच्या मधली छिद्रे किंवा भोकेच दिसतात. कापड ज्याचे बनले आहे ते उभे-आडवे धागे एकाच कापसाचे आहेत हे बघणे, ही श्रेष्ठ भावना. राष्ट्राचे शरीर म्हणजे इथला समाज. त्यातली छिद्रे, म्हणजे वेगळेपणा, शोधण्याऐवजी, देशातील व्यक्तींच्या नात्यामधला घट्टपणा वाढवणे, एकता आणि अभेदतेच्या मुद्‌द्यांची जाणीव व त्याबद्दलचा अभिमान या श्रेष्ठ भावना वाढवणे हेच आमचे काम आहे.

व्यक्ति-व्यक्ति के हृदय समष्टि भाव को जगा,
सकामता व स्वार्थता के हेय भाव को मिटा,
परहितों सुखों मे निज के हित-सुखों को देखने की
श्रेष्ठ चाह को जगाने हम चले ॥४॥

काही तरी मिळावे असे वाटणे म्हणजे सकामता. मलाच मिळावे असे वाटणे म्हणजे स्वार्थता. मनाच्या या दोन्ही वृत्ती हेय म्हणजे तुच्छ व त्याज्य आहेत. त्या टाकून द्यावेसे वाटणे म्हणजेच श्रेष्ठ चाह किंवा श्रेष्ठ इच्छा. त्या कशा टाकायच्या? तर ‘परहितों सुखों में’ म्हणजे इतरांच्या हिताच्या व सुखाच्या गोष्टींमध्ये, ‘निज के हित-सुखों को’ म्हणजे स्वतःचे हित आणि सुख पाहण्याची सवय लागली, तर त्या टाकता येतील. इतरांच्या हितात स्वतःचे हित असल्याचे कधी वाटते? तर व्यक्ती-व्यक्तीमध्ये समष्टि-भाव म्हणजे आपण सर्वजण मिळून एकच मोठा जीव आहोत, असे सर्वांना वाटू लागले तर. प्रत्येक व्यक्तीला असे वाटू लागावे हीच श्रेष्ठ चाह. आपण कोणाचे चाहते असतो तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम असते. इथेही श्रेष्ठ चाह म्हणजे राष्ट्र्केंद्रित चाह आहे. ती निर्माण करायला आम्ही निघालो आहोत.

निज सुखों की एक ओर छोड कर के लालसा,
चल पडे हैं मातृभू-उत्थान का ले रास्ता,
श्रम से, तप से, त्याग से ध्येय-दीप जगमगा के
महान चेतना जगाने हम चले ॥५॥

समष्टि-भाव म्हणजे मी माझ्या शरीरापुरता मर्यादित नसून मी साऱ्या देशाला व्यापून आहे असे वाटणे. निज सुख म्हणजे माझ्या शरीराचे सुख. त्या एका शरीराला सुख मिळावे ही लालसा किंवा इच्छा आम्ही कधीच सोडून दिली आहे. साऱ्या देशाचे, राष्ट्राचे उत्थान म्हणजे राष्ट्राने झडझडून, अभिमानाने व सामर्थ्याने ताठ उभे राहणे, यातच आमचे सुख आहे. त्या सुखाच्या प्राप्तीच्या मार्गावर आम्ही पुढे निघालो आहोत. या मार्गाचा शेवट क्षितिजावर असल्याने अजून स्पष्ट दिसत नाही. आमच्या श्रमाने, तपाने आणि राष्ट्राच्या मोठ्या देहाच्या सुखाची धून लागल्यावर, आमच्या प्रत्येकाच्या छोट्या देहाची आस सुटल्यामुळेच, आमचा मार्ग आणि त्याच्या क्षितिजावरचे आमचे ध्येय, प्रकाशित होणार आहे. ते प्रकाशित करून, आता राष्ट्र-उत्थानाच्या मार्गावर वेगाने पुढे जाण्याची चेतना म्हणजे प्रेरणा मिळवून, आम्ही वाटचाल करत आहोत. आपापल्या सुखाची फिकीर कोणीही करत नसून, सर्व मिळून सर्वांच्या उत्थानाचे चिंतन करत असल्याने, आमची चेतानाही महान व्हावी. महान प्रेरणा म्हणजे राष्ट्रकेंद्रित प्रेरणा.

सुरुवातीच्या काळात या पद्यातील भावना, इच्छा, इत्यादी नामांकडे लक्ष न जाता त्या नामांच्या सुप्त, स्वच्छ, शुभ्र, श्रेष्ठ अशा विशेषणांकडेच लक्ष जाते. त्याच नामांना वेगवेगळी विशेषणे लावल्याची गंमत वाटते. कवीला वेगळी नामे सुचली नाहीत का अशी थट्टाही करावीशी वाटते. महाविद्यालयीन काळात मीही अशी थट्टा केली आहे. नंतर हळूहळू पद्यातील भाव कळत गेला. इच्छा किंवा कामना ही मूळ भावना. नैसर्गिक इच्छा बहुतेक वेळा स्वतःसाठी काही मिळावे किंवा व्हावे अशा असतात. स्वार्थ कमी करून ईश्वरासाठी किंवा मातृभूमीसाठी काही केले पाहिजे असे वाटू लागले की त्या इच्छेला इथे भावना म्हटले आहे. केवळ कर्तव्य म्हणून नाही तर ईश्वराबद्दलचे किंवा मातृभूमीविषयी प्रेम वाटू लागल्यावर भक्तिभावनेचे रूपांतर ‘चाह’मध्ये होते. त्या ’चाह’ला स्थिर व तीव्र केल्यावर त्यातून चेतना किंवा प्रेरणा निर्माण होते. सुप्त भावना जागी होण्यापासून महान चेतना जागरण होईपर्यंतचे टप्पे या पद्यामध्ये स्वार्थरहित शुभ्र कामना – अहंकाररहित स्वच्छ भावना – राष्ट्रकेंद्रित श्रेष्ठ भावना – राष्ट्रप्रेमाने युक्त श्रेष्ठ चाह – राष्ट्रोत्थानाची महान चेतना असे आले आहेत.


पद्य –

जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,
सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥

सदैव से महान जो सदैव ही महान हो,
कोटि-कोटि कंठ से अखंड वंद्य गान हो,
मातृ-भू की अमरता, समृद्धि और अखण्डता की
शुभ्र कामना जगाने हम चलें ॥१॥

एक माँ के पूत, एक धर्म , एक देश है,
फिर भी प्रेम के स्थान ईर्षा और द्वेष है,
सुबन्धुता व स्नेह की, सुकार्य और सुध्येय की
स्वच्छ भावना जगाने हम चले ॥२॥

प्रान्त-भेद, भाषा-भेद, भेद भी अनेक हैं,
छिद्र –छिद्र राष्ट्र का शरीर देख खेद है,
अनेकता व भेदता से एकता अभेदता की
श्रेष्ठ भावना जगाने हम चले ॥३॥

व्यक्ति-व्यक्ति के हृदय समष्टि भाव को जगा,
सकामता व स्वार्थता के हेय भाव को मिटा,
परहितों सुखों मे निज के हित-सुखों को देखने की
श्रेष्ठ चाह को जगाने हम चले ॥४॥

निज सुखों की एक ओर छोड कर के लालसा,
चल पडे हैं मातृभू-उत्थान का ले रास्ता,
श्रम से, तप से, त्याग से ध्येय-दीप जगमगा के
महान चेतना जगाने हम चले ॥५॥

The post पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 160

Trending Articles