Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 160

सारे विचार-प्रवाह आमचेच

$
0
0

रूचीनां वैचित्र्याद्…

प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके ही जणू प्रबोधिनीचे कार्य समाजापुढे सादर करण्याची एक पर्वणी असते. त्या त्या कालखंडातील युवक कार्यकर्त्यांनी शारीरिक कौशल्यांची कसून तयारी करावी आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे जोशपूर्ण वातावरण तयार व्हावे, असा त्यामागचा हेतू असतो. अशा वातावरणात शारीरिक बलोपासनेनंतर प्रचोधिनीच्या कार्याचे प्रयोजन कालोचित संदर्भासह प्रबोधिनीचे आदरणीय संचालक सर्वांपुढे दुहरतात. शालेय विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रौढ घटकांपर्यंत सर्वांनी करावयाचा तो एक सामूहिक संकल्प असतो. समाज प्रबोधनाच्या विचारांचे स्फूर्तिदाते स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त ही कृतिरूप, गानरूप आणि व्याख्यानरूप आदरांजली असते.

यंदाच्या स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने दि. २६ फेबुवारी २००७ रोजी जी क्रीडा प्रात्यक्षिके झाली, ती संख्येने भव्य तर होतीच, परंतु रचनेच्या दृष्टीनेही संघटन प्रभागाला चांगला आकार देणारी झाली. पूर्वतयारीमध्ये प्रबोधिनीच्या पहिल्या तुकडीच्या आता विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. ‘हे बीर विवेकानंद..” असे पद्य म्हणणाऱ्यांत अभियंते, डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापक आणि अन्य उद्योग-व्यवसाय, नोकरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

प्रबोधिनीच्या संघटनेचे विकसित होणारे ते स्वरूप पाहून उपस्थित पालक, आमेष्ट आणि नागरिक सुद्धा या समूह गायनात पुढील कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजेत, अशी अपेक्षा मा. संचालक वाचस्पती गिरीशराव बापट यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली. समाजात करणारे आणि पाहणारे असे दोन वर्ग नसावेत, सर्वांनीच एकत्र विचार व कृती करावी, असे आवाहन त्यांनी प्रारंभी केले. प्रबोधिनीच्या ‘मातृभूमिपूजन’ या कार्यक्रमात ठिकठिकाणी अशी पद्धत रूढ केल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधिनीची पूजा पद्धती सुरचित असली पाहिजे, सार्थ असली पाहिजे आणि सामूहिक असली पाहिजे, याचे त्यांनी स्मरण करून दिले.

या पार्श्वभूमीवर त्यांनी भाषणात पुढे केलेल्या प्रकट विचारमंथनाची ही पुस्तिका आहे. ‘युवकांमध्ये बलोपासनेवर श्रद्धा निर्माण व्हावी’, असा उद्देश या क्रीडा प्रात्यक्षिकांचा असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा उपक्रम करणे नक्की जमू शकेल, पहिल्यापेक्षा तो उत्तम करू असा आत्मविश्वास मनामध्ये जागा होणं यावर त्यांनी भर दिला आहे. आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि निर्भयता यांची जोड मिळाली, की व्यक्तीचं खरं शिक्षण होतं. शिक्षणानं स्वतःचं रूप पालटलं की देशाचं रूप कसं पालटायचं, याचाही विचार सुचू लागतो, असं त्यामागचं गणित आहे.

स्वामी विवेकानंदांचं पुण्य स्मरण करावयाचं म्हणजे त्यांच्या शिकवणुकीची प्रत्यक्ष उदाहरणं अभ्यासायची. गेल्या शंभर वर्षांत तीन मोठे विचारप्रवाह या दृष्टीनं अभ्यासण्याजोगे आहेत, याकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या वाटचालीचा मागोवा घेत त्यांची त्रिसूत्री मा. संचालकांनी मांडली. “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!” ही ती तीन क्षेत्रे होत. अन्याय्य बंधनं ओलांडायची आणि सामाजिक चौकट इष्ट त्या आकाराला जाईपर्यंत मोठे नियम शोधून काढून त्यासाठी छोटे नियम मोडण्याची तयारी ठेवायची, असा मार्ग डॉ. बाबासाहेबांनी पत्करला. देशातील आजचा तो एक प्रमुख विचार प्रवाह झाला आहे, असे वा. गिरीशराव बापट यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नांचा अंगिकार केलेले दुसरे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सामर्थ्याची, शक्तीची उपासना हे स्वामीजींचे आग्रहतत्त्व स्वा. सावरकरांनी जगून दाखविले. संपूर्ण देशाने अशी प्रयत्नांची, शस्त्रबलाची कास धरली पाहिजे, दैववाद सोडून दिला पाहिजे, भौतिक प्रगतीसाठी आवश्यक ती विज्ञाननिष्ठा स्वीकारली पाहिजे, असे स्वा. सावरकर म्हणत. यामागे औषधासाठी का होईना विषवत् वाटणारा जडवाद स्वीकारणे अपरिहार्य झाले आहे, अशा स्वामीर्जीच्या प्रतिपादनाची आठवण येते. आपल्याला बलाने कुणी जिंकू नये, उलट आपण प्रेमानं जग जिंकलं पाहिजे, असा दोघांच्या विचारातील समान धागा आहे.

स्वामीजींचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कालोचित विचार आचार, त्याचं प्रतिबिंब आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनात दिसतं. विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने पं. नेहरूंनी आधुनिक भारताच्या रचनेचा पाया घातला. त्यांनी भारताला अलिप्ततेचं परराष्ट्र धोरण दिलं. त्याचा परामर्श घेताना मा. संचालकांनी स्वामी विवेकानंदांच्या व्यापक, विजिगीषु विचारांची आठवण करून दिली. स्वामीजींनी, “जागतिक राजकारणाचे दोन्ही ध्रुब आपण आपल्या कवेत घेऊ शकू, इतकं जगाला देण्यासारखं काही भारताकडे आहे.” असं म्हटलं होतं. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्।’ या उद्‌गारातील सत्ता ही प्रेमाची, तत्त्वज्ञानाची, श्रेष्ठ जीवनपद्धतीची अपेक्षित आहे, असा उलगडा मा. संचालकांनी आपल्या भाषणात केला आहे.

स्वामी विवेकानंद आजच्या काळात समजावून घेणं म्हणजे त्यांच्या मांडणीचा आंबेडकरी सामाजिक अर्थ, सावरकरी पुरूषार्थ आणि नेहरूप्रणित विज्ञानार्थ लक्षात घेणं होय. हे तीन आधुनिक, भव्य असे विचार प्रवाह आहेत. त्यातील विविध छटा या नद्या-उपनद्यांसारख्या आहेत. संघर्षाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार करताना कोणी अन्य कुणाचा किंवा सर्वांचा आदर्श समोर ठेवला, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्याचा ग्लेष काढून प्रतिवाद करत बसण्याने लाभ नाही. क्रांतिकारकांच्या आराध्यदैवतांमधील विविधता तेवढीच समजावून घेतली पाहिजे. तसेच विज्ञान-तंत्रज्ञानवादी आदर्शाच्या मालिकेतील कोणताही ट्वा तितकाच स्वागतार्ह मानला पाहिजे, असे वैविध्यपूर्ण प्रतिपादन मा. संचालकांनी केले. आजच्या काळात गटागटांतील मतभेदांना बाजूला सारण्यासाठी स्वामीजींच्या शिकागोच्या धर्मपरिषदेतील बचनांची आठवण या निमित्ताने येते. ते म्हणले होते-

“रूचीनां वैचित्र्याद् ऋजुंकुटिल नानापथजुषां।

नृणामेको गम्यः त्वमसि पयसामर्णव इव।।”

त्या अर्थानं स्वामीजींचे पुण्यस्मरण म्हणजे या विचार प्रवाहांचा समन्वय करणे होय. ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिचा वारसा प्रबोधिनीच्या युवकांनी चालविला पाहिजे, असं आवाहन या पुस्तिकेत आपल्याला दिसेल. देशभर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींना १०,००० युवक हवे होते. आजच्या काळात निःस्वार्थपणे पण कर्तृत्वसंपन्न कसं जगायचं, संपत्तीची निर्मिती करताना गरिबांची आठवण कशी ठेवायची, एकीकडे ‘माझे स्वतःचे असे काही नाही,’ ही भूमिका जगत असताना ‘जगातलं सगळं जे आहे, ते माझंच आहे,’ असा आप्तभाव कसा अंगी बाणावायाचा, यावर प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे, असं आबाहन मा. संचालकांनी या भाषणात केलं आहे. सर्व उपस्थितांच्या हृदयाला भिडलेलं आवाहन मोठ्या वाचकवर्गाला उपलब्ध व्हावं म्हणून ही पुस्तिका प्रकाशित होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

सतत पुढचं पाहायचं, आणखी मोठा खटाटोप करायचा आणि देशाचंच काय तर सगळ्या जगाचं रूप आपल्याला पालटायचं आहे, असं भव्य स्वप्न या भाषणात सर्वांसमोर मांडलं गेलं आहे. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांसाठी म्हणूनच ही पुस्तिका स्फूर्तिप्रद आणि मोलाची ठरेल, असा विश्वास वाटतो.

सुभाष देशपांडे

कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी

The post सारे विचार-प्रवाह आमचेच first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 160

Trending Articles