Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 170

पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे …

निरूपण –

काही पद्यांमध्ये एखादा विचार प्रभावीपणे व्यक्त होतो. आतापर्यंत निरूपण केलेली बहुतेक पद्ये तशीच होती. पद्यातील विचारावर पुन्हा पुन्हा चिंतन केले की तो मनात खोलवर जाऊन रुजतो व त्याचे भाववृत्तीत रूपांतर होते. आजच्या पद्यामध्ये विचारापेक्षा भावनाच जास्त व्यक्त होतात. यातली मुख्य भावना देशभक्तीची आहे.

मातृभू की मूर्ति मेरे हृदय मंदिर में विराजे ॥धृ.

एखाद्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करणे ही भक्तीची प्राथमिक अवस्था आहे. समोर मूर्ती नसताना मनात तिची कल्पना करून तिला पूजेचे सर्व उपचारही कल्पनेनेच वाहणे याला मानसपूजा म्हणतात. ही जास्त श्रेष्ठ मानली जाते. कारण यामध्ये मूर्तीला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि पूजेची सर्व द्रव्येही कल्पनेनेच वाहायची असल्यामुळे ती उपलब्ध नाहीत असेही कधी होत नाही. मातृभूमीच्या चित्रमूर्तीची किंवा तिच्या मनुष्याकृतीतील मूर्तीची पूजा ज्यांना करता आली ते म्हणत आहेत की बाहेरील मूर्तीची पूजा करता करता आता मातृभूमीची मूर्ती माझ्या अंतःकरणात कायमसाठी स्थापन झाली आहे. जशी हनुमंताच्या हृदयात श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापित झाली होती.

कोटि हिंदू हिंदवासी, मातृ-मंदिर के पुजारी,
प्राण का दीपक संजोए, आरती माँ की उतारी,
लक्ष्य के पथ पर बढें हम, स्वार्थ का अभिमान त्यागे ॥ १॥

एकदा मातृभूमीची मूर्ती हृदयात स्थापन केल्यावर तिची पूजा करण्यासाठी कुठे दगडा-विटांच्या मंदिरापर्यंत जावे लागत नाही. कोट्यवधी हिंदूंपैकी प्रत्येक जण जिथे आहे तिथून आपापल्या अंतःकरणाच्या मंदिरात तिची पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्या मंदिरातील पुजारी आहे. आपले पंचप्राण आपल्याला कार्यशक्ती देतात. शक्ती ही तेजाची निदर्शक आहे. त्यामुळे आपल्या कार्यशक्तीचेच निरांजन करून, ‌‘संजोए‌’ म्हणजे त्या निरांजनाची ज्योत नीट सांभाळून, सर्वजण मातृभूमीची आरती करत आहेत. आपल्या कार्यशक्तीने मातृभूमीला जगात श्रेष्ठ पदावर नेण्याच्या उद्दिष्टापर्यंत पुढे जात राहणे, हीच मातृभूमीची आरती आहे. ती करताना स्वार्थाचा अभिमान म्हणजे अशी आरती करणारा मी कोणीतरी श्रेष्ठ आहे हे विसरून जायचे आहे.

स्वर लहरियाँ उठ रही है, मातृ तव आराधना की,
कोटि हृदयों में उठी है, चाह तेरी साधना की,
शंख ध्वनि संघोष करती, आज रण का साज साजे ॥२॥

अनेक जण मातृभूमीला जगात श्रेष्ठ करण्याच्या प्रयत्नांनी तिची आरती करत आहेत. त्याने वातावरणात चैतन्य भरून राहिले आहे. जणू आरतीचे स्वर समुद्राच्या लाटांसारखे सतत उमटत राहत आहेत. मातृभूमीची अशी आराधना किंवा साधना आपणही करावी अशी उत्कट इच्छा एकाचे पाहून दुसऱ्याच्या मनात, अशा तऱ्हेने कोट्यवधी लोकांच्या हृदयामध्ये निर्माण झाली आहे. महाभारताच्या युद्धात भीष्मांनी आपला शंख फुंकल्यानंतर इतर सर्व योद्ध्यांचे शंख वाजायला लागले व इतर सर्व ‌‘रण का साज‌’ म्हणजे रणवाद्येही वाजायला लागली. तसे मातृभूमीला श्रेष्ठ करायला एक जण सज्ज झाल्यावर कोट्यवधी लोक उभे राहिले असे दृश्य आमच्या मनःचक्षूंसमोर उभे राहिले आहे.  शंखनाद आणि रणवाद्यांचा उल्लेख पुढच्या कडव्यातील शत्रू विरुद्धच्या लढाईची प्रस्तावना म्हणूनही केला आहे असे वाटते.

हाथ में हो अरुण केतु, और पावों में प्रभंजन,
शत्रु शोणित विजयश्रीसे, आज कर ले मातृ अर्चन
विजयश्री का मुकुट फिरसे, मातृ मस्तक पर विराजे ॥३॥

अंधाराला नष्ट करायच्या मोहिमेवर आम्ही अरुण-केतु म्हणजे उगवत्या सूर्याच्या रंगाचा ध्वज घेऊन निघालो आहोत. पायांमध्ये प्रभंजनाचे अर्थात झंझावाताचे बळ घेऊन, म्हणजे अतिशय वेगाने, आम्ही शत्रूवर मात करायला निघालो आहोत. पारतंत्र्यामध्ये इंग्रज सरकार व त्यांचे सैन्य आपले शत्रू होते. स्वातंत्र्यामध्ये विषमता, दारिद्र्य, फुटीरता या वृत्तीच आपल्या शत्रू आहेत. विषमतेतील वीष काढून टाकणे, दारिद्र्याला दरिद्री करणे, फुटीरता फोडून टाकणे म्हणजे या शत्रूंना ठार करून जणू त्यांचे शोणित म्हणजे रक्त सांडणे. असे करणे म्हणजेच जणू त्यांच्या रक्ताने मातृभूमीला अभिषेक करून तिची पूजा करणे आहे. विषमता, दारिद्य्र, फुटीरता या शत्रूंना म्हणजेच अंधाराला घालवण्यासाठी समता, समृद्धी, एकात्मता यांचा प्रकाश आम्हाला आणायचा आहे. या प्रकाशाचे प्रतीक हा उगवत्या सूर्याच्या रंगाचा ध्वज आहे. या शत्रूंना नष्ट करूनच मातृभूमी श्रेष्ठ होणार आहे. या शत्रूंना नष्ट करून, जणू श्रेष्ठत्वाचा मुकुट मातृभूमीच्या मूर्तीला घालून, तिची शोभा वाढलेली आम्ही पाहू इच्छितो.


पद्य –

मातृ-भू की मूर्ति मेरे हृदय मंदिर में विराजे ॥धृ.॥

कोटि हिंदू हिंदवासी, मातृ-मंदिर के पुजारी,
प्राण का दीपक संजोए, आरती माँ की उतारी,
लक्ष्य के पथ पर बढें हम, स्वार्थ का अभिमान त्यागे ॥१॥

स्वर लहरियाँ उठ रही है, मातृ तव आराधना की,
कोटि हृदयों में उठी है, चाह तेरी साधना की,
शंख ध्वनि संघोष करती, आज रण का साज साजे ॥२॥

हाथ में हो अरुण केतु, और पावों में प्रभंजन,
शत्रु शोणित विजयश्रीसे, आज कर ले मातृ अर्चन
विजयश्री का मुकुट फिरसे, मातृ मस्तक पर विराजे ॥३॥

The post पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे … first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 170

Trending Articles