१.सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची लक्षणे
कृतीने व्यक्तीची ओळख पटते
इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात नुकतेच सुरू झाले होते तेव्हाची गोष्ट आहे. लष्करातल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीयांची वेदविद्या जाणून घ्यावी अशी इच्छा झाली. त्यासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. नेहमीच्या पोशाखात गेलं तर कोणीही पंडित आपल्याला त्यांची देववाणी संस्कृत शिकवणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी केस कापून घेऊन मुंडण केले, गळ्यात जानवे घातले, धोतर नेसले आणि त्यांच्यापैकी एका अधिकाऱ्याने अनवाणी पायांनी चालत जाऊन एका पंडिताला गाठले. संस्कृत शिकवण्याची विनंती केली. बरोबर मित्रही येणार म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी पंडित आपल्या नवीन शिष्यांची वाट पाहू लागला. लांबून चार जण एका रांगेत चालत येताना त्याला दिसले. थोडे जवळ आल्यावर सर्वजण ताठच्या ताठ चालत आहेत, एका रांगेत पावले टाकत आहेत, असे त्या पंडिताला दिसले. बरोबर ठरलेल्या वेळी चारहीजण पंडिताच्या दाराशी पोचले. हा वक्तशीरपणा, चालण्यातील ऐट आणि शिस्त पाहून पंडिताने ओळखले की, हे ब्राह्मणवेषातील फिरंगी आहेत. असे वागणे फक्त इंग्रजांनाच जमेल. अर्थातच संस्कृत शिकण्याचा त्या अधिकाऱ्यांचा बेत फसला. परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायला गेलेल्या कर्णाची अशीच गत झाली. त्याची सहनशक्ती पाहूनच तो ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे हे परशुरामांनी ओळखले. आपली प्रत्येक कृती आपले अंतरंग प्रकट करत असते. आपली सहज कृती देखील आपण आत्मसात केलेले विचार प्रकट करत असते.
आचार, विचार आणि प्रचार
महिन्याभरापूव सर्व सदस्यांसमोर बोलत असताना सर्वांनी प्रबोधिनीपणाचे प्रचारक बनून काम करण्याची गरज सांगितली होती. प्रबोधिनीतून सर्वच जण अनेक गोष्टी घेतात. त्यापैकी विचार घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे. आपण अनेक विचार ऐकत असतो; परंतु त्या विचाराप्रमाणे आपण प्रत्यक्ष वागू शकलो तर तो विचार आपला स्वत:चा झाला. अशा विचारांचाच प्रचार करता येतो; काही थोड्या जणांना भाषणे करून किंवा लेख लिहून प्रचार करता येतो; परंतु विचाराप्रमाणे निष्ठेने आचरण करणे हे अनेकांना जमू शकते. असे निष्ठापूर्वक आचरण हाही प्रचारच आहे. एखाद्या विचाराचे आचरण करणे म्हणजे तो विचार मूर्त स्वरूपात प्रकट करणेच आहे. अशी एक कृती हजार शब्दांचे काम करून जाते. त्यामुळे प्रबोधिनीच्या प्रत्येक सदस्याला आपल्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील आचरणाने प्रबोधिनीपणाचे प्रचारक होणे शक्य आहे.
सर्वसाधारण प्रबोधिनीपण
1) विनाश्रमाचे घेणार नाही
2) गुणवत्तेत तडजोड नाही
3) आजचे काम उद्यावर नाही
4) आपले काम दुसऱ्यावर नाही
हे सगळे साधेसाधे विचार आहेत. प्रबोधिनीत आणि प्रबोधिनीबाहेरही अशा विचाराने वागणाऱ्यांचे आदर्श नेहमीच असायला हवेत. बाहेर याचा आग्रह कमी असेल. प्रबोधिनीत याचा आग्रह आपण मुद्दाम धरतो. असे वागणे प्रबोधिनीत सगळ्यांनाच जमायला हवे. कोणत्याही विभागातील कोणत्याही पदावरच्या कार्यकर्त्याने हे सर्वसाधारण विचार पचवलेले असलेच पाहिजेत. त्याचा प्रचार त्यांनी आचरणाद्वारेच करायचा आहे. हे चार सर्वसाधारण विचार किंवा सर्वसाधारण गुण त्यांच्यातील जोर व्यक्त होण्यासाठी नकारात्मक भाषेत, म्हणजेच काय करायचे नाही, हे सांगणऱ्या भाषेत मांडले आहेत. विधान नकारयुक्त असले तरी त्यातला आशय सकारात्मकच आहे. त्याचप्रमाणे जोर येण्यासाठी पुढील चार विचार ‘च’कारयुक्त भाषेत मांडलेले आहेत.
5) रोजची उपासना झालीच पाहिजे
6) प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे
7) रोज नवीन काही सुचलेच पाहिजे
8) कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे
सर्वसाधारण प्रबोधिनीपणाचे निकष सर्वांसाठीच आहेत. प्रबोधिनीत येणाऱ्या आणि न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि प्रबोधिनीत येणाऱ्या आणि न येणाऱ्या प्रौढांसाठीही. समाजातल्या सगळ्यांमधेच हे गुण असायला हवेत म्हणून ते ‘सर्वसाधारण’ आहेत. प्रबोधिनीला समाजमनात बदल घडवून आणायचा आहे. त्यामुळे प्रबोधिनीतल्या सगळ्यांमध्येही ते असायला हवेत. म्हणून या गुणांमध्ये ‘प्रबोधिनीपण’ आहे. प्रबोधिनीचा एक एक सदस्य म्हणजे या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण व्हायला पाहिजे. सर्वसाधारण प्रबोधिनीपण असे 1. सद्गुणांचा आग्रह धरणारे, सकारात्मक, आणि 2. दुर्गुणांचा आग्रह करणारे नकारात्मक आहे.
सौर श्रावण 1, शके 1917
23.7.1995
******************************************************************************************************************
२.विनाश्रमाचे घेणार नाही
चार प्रकारचे सदस्य
प्रबोधिनीमध्ये संगणक प्रणालीकार (कॉम्प्युटर प्रोग्रॅमर) एवढे एकच काम करणारे अजून तरी कोणी नाही. पण अनेक विभागांमध्ये गरजेनुसार संगणक प्रणाली तयार करून घ्यावी लागते. कल्पना करूया की अशांची नेहमीसाठी गरज निर्माण झाली व अनेक जण त्या प्रकारचे काम करू लागले. कोणतेही काम करणारे पुरेशा संख्येने आले की प्रबोधिनीत त्यांचे काम करण्याचे चार प्रकार जाणवायला लागतात. तसेच या संगणक प्रणालीकारांचेही चार प्रकार जाणवायला लागले.
पहिला प्रकार, हे काम जे हौसेने काम करता करता शिकले आहेत, व जिथे कुठे आव्हानात्मक काम मिळेल तिथे जातात, त्यांचा. ते एकदा आले आणि कामाला लागले, की काम एका टप्प्यापर्यंत नेऊन किंवा संपवूनच जातात. पण दुसऱ्या दिवशी आणखी कुठे बोलावणे आले की तिकडे जातात. पुन्हा त्यांना बोलावून आणायचे म्हणजे पाठपुराव्याची तपश्चर्याच करावी लागते.
दुसरा प्रकार, हे काम जे बाहेर कुठेतरी नियमितपणे करत असतात, व नंतर फुरसतीच्या वेळात प्रबोधिनीत येऊन काम करतात, त्यांचा. दिवसातले एक-दोन तास, किंवा आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस, ते नेमाने येतात आणि स्वीकारलेली जबाबदारी, सावकाश परंतु निश्चितपणे पूर्ण करतात.
तिसरा प्रकार, प्रबोधिनीतच पूर्ण वेळ येऊन प्रणालीकार म्हणून काम करणाऱ्यांचा. हे सदस्य नियमितपणेे येतात. नेमून दिलेले काम उत्तम करतात. काही नवीन शिकायला सांगितले तर शिकतात. थोडे आव्हानात्मक काम दिले तर स्वीकारतात. चार इतर कामेही उत्सुकता म्हणून करून पाहतात. त्यांची कामाची वेळ संपली की घरी जातात.
चौथा प्रकार कधीही, केव्हाही पाहिले, तर नवीन प्रणाली तयार करत, किंवा जुनी प्रणाली सुधारत बसलेल्यांचा. त्यांना वेळेची, कामाच्या जागेची, कामाच्या स्वरूपाची काळजी नसते. थोडे पहिल्या प्रकारासारखेच. परंतु पहिल्या प्रकारचे सर्वसंचारी असतात. त्यातला थोडा वेळ प्रबोधिनीच्या वाट्याला येतो. चौथ्या प्रकारचे प्रबोधिनीतच संचार करत असतात.
पहिले दोन प्रकार तर मी प्रबोधिनीत अनुभवले आहेतच. पुढचे दोन प्रकार तशा प्रकारचे काम वाढले की भेटतील याची खात्री आहे.
चारही प्रकारचे सदस्य कार्यकर्तेच
या चार प्रकारच्या संगणक प्रणालीकारांमध्ये प्रबोधिनीच्या कार्यशैलीप्रमाणे सवेतन-निर्वेतन, अंशकाल-पूर्णकाल-सर्वकाल, स्वयंसेवी-नियुक्त, प्रासंगिक-नियमित, हौशी-व्यावसायिक, व्रती-व्यवहारी, शिकाऊ-अनुभवी-निवृत्तीनंतर काम करणारे, अशा सर्व रंगछटांचे सदस्य सापडतील. अशा सर्वांनी परस्परांना प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणूनच संबोधावे असे मला वाटते.
माझे एक मित्र ग्रामीण कामातला अनुभव म्हणून सांगतात की ‘गंप्या’ला ‘गणपतराव’ म्हटले की तो शेफारून बसतो व करायचा ते कामही करेनासा होतो. मला वाटते की हा ‘गणपतराव’ म्हणण्याचा परिणाम नसून त्याने जे कोणी ‘गणपतराव’ पाहिलेले असतात त्यांचे तो वरवरचे अनुकरण करायला लागतो म्हणून तसे होते. दुसरे म्हणजे ‘गंप्या’ने कोणती कामे करायची आणि ‘गणपतराव’ कोणती कामे करायची याची प्रतवारी नकळत अनेकांच्या मनात तयार झालेली असते. त्याचाही परिणाम होतो. सर्वजण ‘गणपतराव’च आहेत. सर्व गणपतरावांनी कोणतेही काम करायला तयार असले पाहिजे. ही अपेक्षा ग्रामीण भागातील व्यक्तींचा आत्मसन्मान वाढवणारी व त्याचवेळी त्यांना श्रमप्रतिष्ठा शिकवणारी आहे. प्रबोधिनीतील सर्व सदस्य हे देखील या भूमिकेतून कार्यकर्ते आहेत.
कार्यकर्ता म्हणताना जो आदर, बहुमान परस्परांना द्यायचा, तो सर्वांनी सकारात्मक भूमिकेतून द्यावा. कुठे वागण्यात काही कमी पडत असले तर ते भरून निघेल या अपेक्षेने द्यावा. कोण, काय, किती, व कसे काम करतो याची काटेकोर चिकित्सा करत बसू नये. कार्यकर्ता या संबोधनाला आपण स्वत: पुरे पडतो आहोत की नाही याची काळजी त्या त्या सदस्यांनी करायची आहे.
विनाश्रमाचे घेणार नाही
प्रबोधिनीतील सर्व संगणक प्रणालीकार गरज पडली तर संगणक आणि तो ठेवलेले टेबल स्वच्छ करतील आणि संगणक वापरून तयार केलेल्या प्रणालीही सिद्ध करतील. ‘विना मोबदला श्रम नाही’ अशी एक शिकवण कळत न कळत समाजात सर्वांना मिळत असते. कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात वेतन, मानधन किंवा सेवा-शुल्क अशा पद्धतीने देणे ही आज सर्वांना समजणारी व रूढ पद्धत आहे. दोन शतकांपूव जहागिरी आणि वतने देण्याची पद्धत होती. पुढच्या शतकात वेगळी पद्धत असेल. त्यामुळे श्रमाचे मूल्य मिळाले पाहिजे ही अपेक्षा चूक नाही. श्रमाचा मोबदला घेणारे व न घेणारे संगणक प्रणालीकार आजही पाहायला मिळतात. ते सर्व कार्यकर्तेच आहेत. केवळ श्रमाचा मोबदला न घेण्यामध्ये कार्यकर्तेपण नाही. उलट श्रम केल्याशिवाय मोबदला घेणार नाही असे म्हणण्यात कार्यकर्तेपणाची पहिली पायरी चढणे आहे. शारीरिक कष्ट, मानसिक गुंतवणूक, बौद्धिक प्रयत्न हे सर्व श्रमच आहेत.
जिथे श्रम मोजायचे असतील तिथे त्याच्या मापात, जिथे श्रमाचे परिणाम मोजायचे असतील तिथे त्याच्या मापात, जिथे श्रमाचा परिणाम सातत्य आणि गुणवत्तेत बघायचा असेल तिथे त्या अपेक्षेनुसार, आधी श्रम करतो तो कार्यकर्ता. स्वीकारलेले काम वेळेवर, चोख, मन:पूर्वक, देखरेखीशिवाय, आठवणीशिवाय, आणि त्या कामाचा अपेक्षित परिणाम समजून घेऊन करणारा कधीही ‘विना श्रमाचे घेणार नाही’, तोच कार्यकर्ता.
विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळण्यासाठी ‘विनाश्रमाचे घेणार नाही’ हे सूत्र आवश्यक आहे. प्रौढ सदस्यांकरिता आपला आत्मसन्मान राखण्यासाठी आपण श्रम न करता फुकटचे काही घ्यायचे नाही, हे लक्षात ठेवण्यासाठी या सूत्राचा उपयोग होतो.
सौर फाल्गुन 1, शके 1928
20.2.2007
*****************************************************************************************************************
३.गुणवत्तेत तडजोड नाही
दूरदृष्टीचे नियोजन
रविवार दि. 25 फेब्रुवारी 2007 रोजी युवकांची क्रीडा-प्रात्यक्षिके पुण्यामध्ये झाली. प्रात्यक्षिके विद्युत्-प्रकाशात झाली. वीज-पुरवठा खंडित झाला तर अडचण होऊ नये म्हणून सर्व वेळ जनित्राचा वापर केला होता. योगायोगाने प्रात्यक्षिके चालू असतानाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील वीज गेली होती. प्रात्यक्षिके पाहणाऱ्यांना मात्र बाहेर सर्वत्र अंधार आहे याची काहीच कल्पना नव्हती. एका जनित्राने केवढी सोय केली!
प्रात्यक्षिके संपल्यानंतर बाहेरची वीज गायब झाल्याचा प्रकार कळला. अशाच एका प्रात्यक्षिकांच्या वेळची ऐकलेली आख्यायिका मला आठवली. त्यावेळी जनित्रे सहज उपलब्ध नसायची व भाडेही जास्त वाटायचे. वीज गेलीच तर…. म्हणून संयोजकांनी प्रात्यक्षिके सादर व्हायच्या क्रीडांगणाच्या चार कोपऱ्यांवर मोटारी उभ्या करून ठेवल्या होत्या. प्रात्यक्षिकाच्या वेळी वीज गेलीच. लगेच मोटारींचे पुढचे दिवे चालू केले. प्रात्यक्षिके चालू राहिली. पाहणाऱ्यांना वेगळी प्रकाश-योजना आहे असे वाटले. वीज गेल्याचे कळलेच नाही.
साधनांची नव्हे आपली गुणवत्ता
मोटारींचे दिवे ऐनवेळी लावायच्या ऐवजी पूर्ण वेळ जनित्र वापरणे एवढा तांत्रिक व आर्थिक बदल इतक्या वर्षांमध्ये झाला. या सुधारलेल्या साधनांना गुणवत्ता म्हणायचे? की पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याच्या दूरदृष्टीला गुणवत्ता म्हणायचे? प्रबोधिनीचा सदस्य गुणवत्तेत तडजोड करणारा नसावा असे आपण म्हणतो. आधुनिक तंत्रे व साधने वापरण्याला, त्याच्यात तडजोड न करण्याला गुणवत्ता म्हणायचे? की उपलब्ध तंत्रे व साधने वापरून आपले नियोजित काम झालेच पाहिजे या आग्रहाने विविध पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याला गुणवत्ता म्हणायचे?
तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या उत्तमातील उत्तम साधने वापरण्याचा आग्रह धरणे म्हणजे ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ ही वृत्ती आहेच. परंतु पर्यायी साधने, पर्यायी सहकारी, पर्यायी जागा, पर्यायी वेळ यांचा विचार करून ठेवणे व ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे असा आग्रह धरणे म्हणजे अधिक टिकाऊ गुणवत्तेचा आग्रह धरणे. त्यामुळे ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ ही वृत्ती साधनांच्या गुणवत्तेकडून साध्याच्या व काम करणाऱ्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधते.
गुणवत्तेमुळे श्रमांना मोल येते
‘मोले घातले रडाया, नाही प्रीती नाही माया’ असा अनुभव अनेकजणांनी घेतला असेल. अलीकडे ‘मोले घातले सत्कार करण्या’, ‘मोले घातले प्रसिद्धी करण्या’, ‘मोलेे घातले प्रचार करण्या’, ‘मोले घातले उत्सव करण्या’, अशी कामे व्यावसायिक पद्धतीने करणारे publicity managers व event managers बघायला मिळतात. ते त्यांच्या श्रमांचा मोबदला वाजवून घेऊनच काम करतात. त्यासाठी साधनांची, तंत्रांची, कार्यक्रमासाठी आवश्यक दूरदृष्टीची गुणवत्ता त्यांना राखावीच लागते. त्यांना ‘विनाश्रमाचे पैसे’ कोणी देणार नाही. मागच्या महिन्यात ‘विनाश्रमाचेे घेणार नाही’ या वृत्तीचे वर्णन ‘स्वीकारलेले काम वेळेवर, चोख, मन:पूर्वक, देखरेखीशिवाय, आठवणीशिवाय आणि त्या कामाचा अपेक्षित परिणाम समजून घेऊन काम करण्याची वृत्ती’ असे केले होते. ‘मोले’ काम करायला लागले म्हणजे ही सगळी गुणवत्ता त्यात आल्यावरच कामाचे मोल वाढते हे लक्षात येते.
कामाच्या मोबदल्याकडून कामाकडे
प्रबोधिनीमध्ये कोणत्याही मार्गाने, कोणत्याही कामासाठी, कोणत्याही कारणासाठी आलेल्या सदस्याने आपल्या श्रमांना असे गुणवत्तेने येणारे मूल्य प्राप्त करून दिले पाहिजे. आणि त्यापुढे जाऊन ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ असे म्हटले पाहिजे. म्हणजे आपल्या कामात प्रीती, माया, जिव्हाळा, आपुलकी ओतली पाहिजे.
साधारणपणे आपण आपल्या कामावर जेवढे प्रेम करतो तेवढेच स्वत:वर करत असतो. मला धक्का न बसता जेवढे काम मला करता येईल तेवढे मी करतो. काम करताना धक्के जास्त बसायला लागले तर ते धक्के सहन करण्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जास्तीचा मोबदला मिळावा अशी आपली अपेक्षा असते. म्हणजे श्रम वाढले, श्रमांची गुणवत्ता वाढली पण आपली गुणवत्ता वाढली नाही. आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी स्वत:वरचे प्रेम थोडे थोडे कामाकडे वळवावे लागते. आपण काम का करतो आहोत त्या ध्येयाकडे लक्ष गेले की कामावरचे प्रेम वाढवता येते. मी माझ्यासाठी काम करत नसून ध्येयासाठी काम करतो आहे असे वाटायला लागले की स्वत:वरचे प्रेम कामाकडे वळायला लागते.
ध्येयावर प्रेम म्हणून कामावर प्रेम
आपले काम जसे पुढे जाते तसे आपले ध्येयही स्पष्ट होत जाते. ध्येय स्पष्ट झाल्यामुळे कामात काही बदल किंवा सुधारणा सुचतात. कामात बदल झाला की कामाच्या पद्धतीत व कामाच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. अनुभवाने यशस्वी व पक्क्या झालेल्या आपल्या पद्धती व सवयी बदलायच्या झाल्या की काही गैरसोय होते. ही गैरसोय आनंदाने सहन करणं व स्वत: नवीन पद्धती अंगवळणी पाडून घेणं म्हणजे कामावर प्रेम करणं.
कामासाठी चोवीस तास वाहून घेतलेले थोडे जण असतात. बाकीच्यांच्या दिनक्रमात दोन-चार-सहा-आठ तास कामासाठी व बाकीचे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी अशी विभागणी असते. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी जसं खाडीत शिरतं, तसं काही वेळा कामाला उधाण येतं व कामाचा वेळ स्वत:च्या वेळेत शिरतो. हे उधाण खाजगी वेळावर आक्रमण वाटणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं. हे उधाण नवीन शिकण्याची संधी आहे असं वाटणं म्हणजे कामावर प्रेम करणं. ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ म्हणजे ‘कामावर प्रेम करण्यात काटकसर करायची नाही’. ‘विनाश्रमाचे घेणार नाही’ म्हणण्यात आत्मसन्मान आहे. तर ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ या सूत्राने समाजमान्यता मिळते.
सौर चैत्र 1, शके 1929
22.3.2007
******************************************************************************************************************
४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार
सृजनात्मक आणि आव्हानात्मक काम
कोणतेही नवीन किंवा मोठे काम करताना, ते नवीन आहे किंवा मोठे आहे, हे आव्हान किंवा त्याचा आनंद, काम करणाऱ्याला प्रेरणा देत असतो. नवीन रेल्वे मार्ग उभारणे, नवीन आठ पदरी महामार्ग बांधणे, वेगवान प्रवाहाच्या नदीवर पूल बांधणे, समुद्रतळाखालून बोगदा खणणे, दोनशे मजली इमारत बांधणे, प्रचंड धरणे बांधून कालव्याद्वारे त्यातील पाणी शेकडो किलोमीटर नेणे, ही सगळी आव्हानात्मक कामे आहेत. ऑक्सिजनची टाकी पाठीवर न घेता एव्हरेस्ट शिखर चढणे, एकट्याने शिडाच्या होडीतून जगप्रवास करणे, वीस हजार फुटावरील विमानातून हवाई छत्रीचा वापर न करता खाली उडी मारणे ही कामे देखील आव्हानात्मक आहेत. ग्रंथच्या ग्रंथ तोंडपाठ म्हणणे, तांदुळाच्या दाण्यावर गणपतीचे चित्र काढणे, अंगठीतून आरपार जाईल असे नऊ वार तलम कापड विणणे, अंगठ्याच्या नखाएवढ्या कागदावर गीतेचा पूर्ण लोक लिहिणे या कामातही अनेकांना आव्हान दिसते.
भव्य शिल्पे बांधणे, सुंदर नगररचना करणे, चमत्कृतीपूर्ण बंगले व राजवाडे बांधणे, उद्याने उभी करणे, प्रतिभापूर्ण संगीतरचना करणे, महाकाव्ये लिहिणे, सृष्टीतील रहस्यांची कारणे शोधून काढणे, मानवी क्षमतेच्या अनेकपट लहान किंवा मोठ्या प्रमाणावर कामे करणारी यंत्रे बनवणे या कामांमध्ये नवीन निर्माण करण्याचा आनंद मिळत असतो.
अशी नवीन किंवा मोठी कामे करणाऱ्या व्यक्ती अनेक वेळा ते काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतात. त्यामध्ये स्वत:ला होणारे कष्ट व त्रास यांची त्यांना जाणीवही होत नाही. तहान, भूक, झोप, विश्रांती यांचेही भान त्यांना राहत नाही. ते खरोखर आपल्या कामाच्या प्रेमात पडतात. त्यांना जग आपल्या कामाची दखल कशी घेत आहे, किंवा घेते आहे की नाही, याचीही फिकीर नसते. ‘लुटा दी है काम के खातिर प्यारी मस्त जिन्दगानी’ अशा मस्तीत ते काम करतात. पण असे काम करण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.
कर्तृत्वाला समाजाचा अप्रत्यक्ष आधार
कामाच्या मस्तीत काम करणाऱ्यांना देखील कधीतरी कोणाची तरी मदत किंवा आधार लागतो. पूव कधीतरी वाचलेला एक किस्सा माझ्या आठवणीत पक्का बसला आहे. अमेरिकेतील संरक्षण खाते अमेरिकेत चालणाऱ्या शास्त्रीय संशोधनाला सर्वात जास्त आर्थिक मदत करते. या संरक्षण खात्याच्या एका समितीपुढे वेगवेगळे शास्त्रज्ञ संशोधनाच्या नव्या योजना मांडत होते. प्रत्येक शास्त्रज्ञाची मुलाखत होऊन त्याच्या योजनेला आर्थिक मदत करायची की नाही हे ती समिती ठरवत होती. प्रत्येक शास्त्रज्ञाला समितीचे सदस्य एक प्रश्न हमखास विचारायचे, “तुमच्या संशोधनाचा देशाची संरक्षणक्षमता वाढायला कसा उपयोग होईल?”. प्रत्येक शास्त्रज्ञ या कळीच्या प्रश्नाला कसे उत्तर देतो यावर मदतीचा निर्णय होत होता. एका शास्त्रज्ञाचा प्रस्ताव फारच वेगळा होता. समितीतल्या एकाही सदस्याला याचा संरक्षण खात्याला काय उपयोग होणार हे कळत नव्हते. सुरुवातीचे प्राथमिक प्रश्न झाल्यावर मग त्यांनी कळीचा प्रश्न विचारला “याने संरक्षणक्षमता कशी वाढणार?”. शास्त्रज्ञाने उत्तर दिले, “याने आपल्या देशाचे संरक्षण का केले पाहिजे याच्या कारणांमध्ये भर पडणार आहे”. देशाच्या ‘संरक्षणक्षमते’पेक्षा ‘देशाची रक्षणीयता’ वाढणे जास्त मोलाचे आहे ही विचारपद्धती समितीला एकदम पटली. विशेष बाब म्हणून त्यांनी त्या आगळ्या वेगळ्या प्रस्तावाला आर्थिक मदत देण्याचे ठरवले.
चैतन्यपूर्ण लोक, गौरवशाली देश
मोठ्या आव्हानात्मक व नवीन आनंददायक कामांची जी जंत्री सुरुवातीला दिली आहे ती करणाऱ्या व्यक्ती आपापल्या देशातील पराक्रमाची परंपरा व सांस्कृतिक ठेवा वाढवतात. आपला देश रक्षणीय, वंदनीय, पूजनीय बनवतात. ही पराक्रमाची परंपरा, हा सांस्कृतिक ठेवा, देशातील लोक आपल्या मनात साठवून ठेवतात. म्हणून त्यांची आठवण पिढ्यान् पिढ्या राहते. कालकुपीमध्ये पुरून ठेवलेल्या इतिहासापेक्षा लोकांनी पिढ्यान् पिढ्या मनात जपलेला इतिहास जास्त महत्त्वाचा आहे. तो जिवंत इतिहास आहे. देशाचा इतिहास जिवंत ठेवण्याकरिता देशातील लोक जिवंत असावे लागतात. देशातील लोक जिवंत असणे म्हणजे ते उद्योगी, आनंदी, उत्साही, आशावादी आणि नाती जपणारे असणे. अनेक देशांमध्ये, अनेक वेळा, अनेक जणांना देशातील लोक जिवंत ठेवण्याचेच काम करावे लागते. आधी लोक व त्यांचा देश जिवंत राहिला पाहिजे. मग ते लोक आपल्या देशाची परंपरा व वारसा जिवंत ठेवतात.
कोणतेही काम करत असताना त्याच्यामुळे देशाची रक्षणीयता, वंदनीयता, पूजनीयता वाढते आहे याची जाणीव अभिमानास्पद आहेच. पण सर्व कामांचा देशाच्या गौरवाशी असलेला संबंध प्रत्येकाला दिसेलच असे नाही. त्यामुळे आपले प्रत्येक काम लोकांचा जिवंतपणा, त्यांचे चैतन्य वाढवणारे कसे होईल एवढेतरी प्रत्येकाने पाहिलेच पहिजे. माझ्या प्रत्येक कामामुळे निदान एका व्यक्तीचे आरोग्य किंवा स्वावलंबन वाढावे, निदान एक व्यक्ती तरी अधिक उद्योगी, अधिक आनंदी, अधिक उत्साही, अधिक आशावादी किंवा इतरांशी नाते वाढवणारी व्हावी असा प्रयत्न तर आपण केलाच पाहिजे.
लोकहितं मम करणीयम्
स्वामी विवेकानंद म्हणत की संन्यासी देखील याला अपवाद नाहीत. त्यांनी आपल्या एका संन्यासी शिष्याला सांगितले होते, “जोपर्यंत जिवंत आहेस तो पर्यंत बाकी काही करता आले नाही, तर भिक्षा मागून एक पैसा मिळव. तो देऊन एक मडके विकत घे. ते पाण्याने भरून रस्त्याच्या कडेला बस. आणि येणाऱ्या जाणाऱ्या तहानलेल्या वाटसरूंना त्यातले पाणी प्यायला दे. एवढे केलेस तर तुला रोज जेवण्याचा अधिकार मिळेल.” हे किमान सांगितले. इतरांसाठी स्वामीजींनी सांगितले आहे की ‘जीव धोक्यात असलेल्याला जीवनदान, भुकेल्याला अन्नदान, अशिक्षिताला विद्यादान आणि सर्वांसाठी अध्यात्माचे दान यातील जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे’ यालाच म्हणायचे ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार करणे’. या गुणामुळे समाजमान्यतेबरोबर समाजाच्या शुभेच्छाही मिळतात. सौर वैशाख 1, शके 1929
21.4.2007
****************************************************************************************************************
५ रोज उपासना झालीच पाहिजे
‘पिक्सेल’ची संख्या वाढवा
आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला, आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर, विद्युत्-कणांचा मारा होतो. ते विद्युत्-कण या मुलाम्यावर आदळल्यावर त्यांच्या उर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. त्यामुळे संपूर्ण पडदा आतून प्रकाशित होतो व बाहेरून पडदाभर चित्र बघायला मिळते. या पडद्यावरचे चित्र किती स्पष्ट आणि किती उजळ दिसायचे, ते आतल्या रसायनांच्या मिश्रणात, विद्युत्-कणांनी उत्तेजित होऊन प्रकाशमान होणारे, किती कण आहेत, यावर अवलंबून असते. एका चौरस सेंटिमीटरमध्ये काही हजार, काही लक्ष किंवा आता ‘डिजिटल’ उपकरणांच्या युगात असे काही दशलक्ष कण असतात. या कणांना ‘पिक्सेल’ असे म्हणतात. पडद्यावरचे चित्र जास्त चांगले दिसायचे असेल, तर पडद्यामागील रसायनांच्या मुलाम्यातील, विद्युत्-कणांनी उत्तेजित होणाऱ्या कणांची संख्या वाढवायला लागते. तसेच पडद्यावर जेवढी ‘पिक्सेल’ची संख्या असते, त्या प्रमाणात दूरदर्शन संचाच्या प्रकाश नळीतून, विद्युत्-कण बाहेर पडले पाहिजेत. त्यांची संख्या मुळात दूरदर्शन-प्रक्षेपणासाठी चित्रे टिपणाऱ्या, कॅमेऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे कॅमेऱ्यातील भिंगाची व त्यातील चित्रफितीची क्षमता देखील, ‘पिक्सेल’च्या भाषेत चांगली पाहिजे. आताच्या चांगल्या कॅमेरात किंवा दूरदर्शन संचात, ती क्षमता दशलक्ष ‘पिक्सेल’ किंवा ‘मेगापिक्सेल’ मध्ये मोजतात.
मानवी कार्यक्षमतेचे ‘पिक्सेल’
दूरदर्शन संचातील पडद्याची कार्यक्षमता चांगली चित्रे दिसण्यावर ठरते. आपली कार्यक्षमता आपल्या शरीर, मन, बुद्धीवर अवलंबून असते. शरीर, मन, बुद्धीची कार्यक्षमता आपल्या शरीरातील विविध पेशींच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. या सर्व पेशींना दोन प्रकारची ऊर्जा मिळते. त्या उर्जेचे रूपांतर कार्यशक्तीत होते. पहिल्या प्रकारची ऊर्जा म्हणजे अन्न-पाणी-प्राणवायू-सूर्यप्रकाश यांच्यावरील रासायनिक-जैविक प्रक्रियांतून मिळणारी प्राणशक्ती. दुसऱ्या प्रकारची ऊर्जा म्हणजे आपले संकल्प पूर्ण करण्याच्या ध्यासातून, आणि उद्दिष्ट गाठण्याच्या, किंवा ध्येय साकार करण्याच्या ध्यासातून सक्रिय होणारी इच्छाशक्ती. प्राणशक्ती शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते. त्यातून सर्व जीवनावश्यक क्रिया होतात. आपल्यातील इच्छा-शक्ती, दूरदर्शनच्या पडद्यावर आदळणाऱ्या विद्युत्-कणांसारखे काम करत असते. पडद्यामागील जेवढे ‘पिक्सेल’ हे विद्युत्-कण ग्रहण करतील, तेवढेच प्रकाशमान होतात. त्याप्रमाणे आपल्या शरीरातील जितक्या पेशी आपल्या इच्छा-शक्तीने प्रभावित होतात, तेवढ्या पेशी जीवनावश्यक क्रियांपलीकडे संकल्पपूतसाठी, उद्दिष्ट गाठण्यासाठी, ध्येय साकार करण्यासाठी, जास्तीच्या क्षमतेने काम करतात. अशा पेशींनाच येथे कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ म्हटले आहे.
पडद्यावरची ‘पिक्सेल’ची संख्या त्या त्या दूरदर्शन संचापुरती ठरलेली असते. जास्त ‘पिक्सेल’ हवे असतील तर संचच बदलावा लागतो. मानवी शरीरात अब्जावधी पेशी असतात. त्या पैकी इच्छाशक्तीने प्रभावित होणाऱ्या पेशी, सुरुवातीला तरी मुख्यत: आपल्या मेंदूतच असतात. दूरदर्शन संच बदलण्याप्रमाणे आपल्याला मेंदू किंवा त्यातील पेशी बदलता येणार नाहीत. परंतु मेंदूतील पेशींप्रमाणे, शरीरातील सर्वच पेशी इच्छाशक्तीला प्रतिसाद देणाऱ्या करता आल्या, तर कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ची संख्या मात्र कैक पटीने वाढवता येईल.
कार्यक्षमतेचे ‘पिक्सेल’ वाढविण्याचे साधन
दूरदर्शन पडद्यावरील ‘पिक्सेल’च्या संख्येच्या प्रमाणात, दूरदर्शन कॅमेरातील ‘पिक्सेल’ असल्या, तरच पडद्यावरील चित्राचा दर्जा सुधारतो. त्याचप्रमाणे कार्यक्षमता वाढण्यासाठी आपल्यातली इच्छाशक्ती तीव्र व्हायला हवी, व तिला प्रतिसाद देणाऱ्या पेशींची संख्याही वाढायला हवी. हे दोन्ही घडविण्याचे साधन म्हणजे कोणत्या तरी प्रकारची दैनंदिन उपासना.
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यातील उद्दिष्ट वेगवेगळे असू शकेल. कोणतेही उद्दिष्ट असले तरी ते उद्दिष्ट गाठण्याची इच्छाशक्ती तीव्र करण्यासाठी आपल्या मनातील मोह, दु:ख, असूया, स्पर्धा, गर्विष्ठपणा, लोभीपणा इत्यादी नकारात्मक भावना कमी व्हाव्या लागतात. त्यासाठी प्रबोधिनीच्या उपासनेतील शुद्धिमंत्र किंवा विरजामंत्र आहेत. तसेच या सर्व उद्दिष्टांचे रूपांतर अधिकाधिक मोठ्या मानवसमाजाच्या हिताच्या उद्दिष्टांमध्ये कसे होईल, याचाही विचार सतत चालू ठेवावा लागतो. त्यासाठी प्रबोधिनीच्या उपासनेतील शक्ति-मंत्र आहेत.
नित्य उपासनेमुळे प्रतिभा-स्फुरण होऊ लागले, बुद्धीच्या सर्व पैलूंना उजाळा मिळू लागला, की मेंदूतील ‘पिक्सेल’ वाढू लागले हे कळते. दु:ख, अपयश, निराशा यांचा निचरा करण्याची शक्ती वाढू लागली म्हणजे भावनांचे नियंत्रण करणाऱ्या ग्रंथींमधील पेशी ‘पिक्सेल’ बनू लागल्या हे कळते. उत्साह वाढू लागला, सकारात्मकता वाढू लागली की रक्तातील व रक्ताबाहेरील रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी ‘पिक्सेल’ बनू लागल्या. कौशल्यांमध्ये प्राविण्य व प्रभुत्वाच्या पलीकडे, अनायास सहजता आली, की ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांतील ‘पिक्सेल’ची संख्या वाढू लागली. हळू हळू शरीरातील सर्वच अवयवांमधील अधिकाधिक पेशी, ‘पिक्सेल’ म्हणून काम करू लागतात. मग चित्ताची प्रसन्नता वाढते, उद्दिष्टावरील एकाग्रता वाढते व इच्छाशक्ती शरीराच्या सर्व पेशींद्वारे काम करू लागते.
‘विनाश्रमाचे घेणार नाही’, ‘गुणवत्तेत तडजोड नाही’, आणि ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार’ हे आग्रह धरून सगळी कामे सातत्याने करण्यासाठी मोठी इच्छाशक्ती व तिला प्रतिसाद देणारे शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी लागतात. आत्मसन्मान, समाजमान्यता आणि समाजाच्या शुभेच्छा मिळवून देणाऱ्या, सर्वसाधारण प्रबोधिनीपणाच्या या तीन प्रगत पैलूंना, परमेश्वरी शक्तीचे अधिष्ठान देणारा चौथा पैलू हवा. इच्छाशक्तीला सन्मुख होण्याची स्वत:च्या शरीरातील पेशी-पेशीची क्षमता वाढवण्यासाठी, ‘रोज उपासना झालीच पाहिजे’ हा आग्रह. हाच तो आपले प्रबोधिनीपण दृढ करणारा चौथा प्रगत पैलू आहे.
सौर ज्येष्ठ 1 शके 1929
22.5.2007
******************************************************************************************************************
The post सर्वसाधारण प्रबोधिनीपण first appeared on ज्ञान प्रबोधिनी.