Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 170

४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार

सृजनात्मक आणि आव्हानात्मक काम

कोणतेही नवीन किंवा मोठे काम करताना, ते नवीन आहे किंवा मोठे आहे, हे आव्हान किंवा त्याचा आनंद, काम करणाऱ्याला प्रेरणा देत असतो. नवीन रेल्वे मार्ग उभारणे, नवीन आठ पदरी महामार्ग बांधणे, वेगवान प्रवाहाच्या नदीवर पूल बांधणे, समुद्रतळाखालून बोगदा खणणे, दोनशे मजली इमारत बांधणे, प्रचंड धरणे बांधून कालव्याद्वारे त्यातील पाणी शेकडो किलोमीटर नेणे, ही सगळी आव्हानात्मक कामे आहेत. ऑक्सिजनची टाकी पाठीवर न घेता एव्हरेस्ट शिखर चढणे, एकट्याने शिडाच्या होडीतून जगप्रवास करणे, वीस हजार फुटावरील विमानातून हवाई छत्रीचा वापर न करता खाली उडी मारणे ही कामे देखील आव्हानात्मक आहेत. ग्रंथच्या ग्रंथ तोंडपाठ म्हणणे, तांदुळाच्या दाण्यावर गणपतीचे चित्र काढणे, अंगठीतून आरपार जाईल असे नऊ वार तलम कापड विणणे, अंगठ्याच्या नखाएवढ्या कागदावर गीतेचा पूर्ण लोक लिहिणे या कामातही अनेकांना आव्हान दिसते.
भव्य शिल्पे बांधणे, सुंदर नगररचना करणे, चमत्कृतीपूर्ण बंगले व राजवाडे बांधणे, उद्याने उभी करणे, प्रतिभापूर्ण संगीतरचना करणे, महाकाव्ये लिहिणे, सृष्टीतील रहस्यांची कारणे शोधून काढणे, मानवी क्षमतेच्या अनेकपट लहान किंवा मोठ्या प्रमाणावर कामे करणारी यंत्रे बनवणे या कामांमध्ये नवीन निर्माण करण्याचा आनंद मिळत असतो.
अशी नवीन किंवा मोठी कामे करणाऱ्या व्यक्ती अनेक वेळा ते काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतात. त्यामध्ये स्वत:ला होणारे कष्ट व त्रास यांची त्यांना जाणीवही होत नाही. तहान, भूक, झोप, विश्रांती यांचेही भान त्यांना राहत नाही. ते खरोखर आपल्या कामाच्या प्रेमात पडतात. त्यांना जग आपल्या कामाची दखल कशी घेत आहे, किंवा घेते आहे की नाही, याचीही फिकीर नसते. ‌‘लुटा दी है काम के खातिर प्यारी मस्त जिन्दगानी‌’ अशा मस्तीत ते काम करतात. पण असे काम करण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.

कर्तृत्वाला समाजाचा अप्रत्यक्ष आधार

कामाच्या मस्तीत काम करणाऱ्यांना देखील कधीतरी कोणाची तरी मदत किंवा आधार लागतो. पूव कधीतरी वाचलेला एक किस्सा माझ्या आठवणीत पक्का बसला आहे. अमेरिकेतील संरक्षण खाते अमेरिकेत चालणाऱ्या शास्त्रीय संशोधनाला सर्वात जास्त आर्थिक मदत करते. या संरक्षण खात्याच्या एका समितीपुढे वेगवेगळे शास्त्रज्ञ संशोधनाच्या नव्या योजना मांडत होते. प्रत्येक शास्त्रज्ञाची मुलाखत होऊन त्याच्या योजनेला आर्थिक मदत करायची की नाही हे ती समिती ठरवत होती. प्रत्येक शास्त्रज्ञाला समितीचे सदस्य एक प्रश्न हमखास विचारायचे, “तुमच्या संशोधनाचा देशाची संरक्षणक्षमता वाढायला कसा उपयोग होईल?”. प्रत्येक शास्त्रज्ञ या कळीच्या प्रश्नाला कसे उत्तर देतो यावर मदतीचा निर्णय होत होता. एका शास्त्रज्ञाचा प्रस्ताव फारच वेगळा होता. समितीतल्या एकाही सदस्याला याचा संरक्षण खात्याला काय उपयोग होणार हे कळत नव्हते. सुरुवातीचे प्राथमिक प्रश्न झाल्यावर मग त्यांनी कळीचा प्रश्न विचारला “याने संरक्षणक्षमता कशी वाढणार?”. शास्त्रज्ञाने उत्तर दिले, “याने आपल्या देशाचे संरक्षण का केले पाहिजे याच्या कारणांमध्ये भर पडणार आहे”. देशाच्या ‌‘संरक्षणक्षमते‌’पेक्षा ‌‘देशाची रक्षणीयता‌’ वाढणे जास्त मोलाचे आहे ही विचारपद्धती समितीला एकदम पटली. विशेष बाब म्हणून त्यांनी त्या आगळ्या वेगळ्या प्रस्तावाला आर्थिक मदत देण्याचे ठरवले.

चैतन्यपूर्ण लोक, गौरवशाली देश

मोठ्या आव्हानात्मक व नवीन आनंददायक कामांची जी जंत्री सुरुवातीला दिली आहे ती करणाऱ्या व्यक्ती आपापल्या देशातील पराक्रमाची परंपरा व सांस्कृतिक ठेवा वाढवतात. आपला देश रक्षणीय, वंदनीय, पूजनीय बनवतात. ही पराक्रमाची परंपरा, हा सांस्कृतिक ठेवा, देशातील लोक आपल्या मनात साठवून ठेवतात. म्हणून त्यांची आठवण पिढ्यान्‌‍ पिढ्या राहते. कालकुपीमध्ये पुरून ठेवलेल्या इतिहासापेक्षा लोकांनी पिढ्यान्‌‍ पिढ्या मनात जपलेला इतिहास जास्त महत्त्वाचा आहे. तो जिवंत इतिहास आहे. देशाचा इतिहास जिवंत ठेवण्याकरिता देशातील लोक जिवंत असावे लागतात. देशातील लोक जिवंत असणे म्हणजे ते उद्योगी, आनंदी, उत्साही, आशावादी आणि नाती जपणारे असणे. अनेक देशांमध्ये, अनेक वेळा, अनेक जणांना देशातील लोक जिवंत ठेवण्याचेच काम करावे लागते. आधी लोक व त्यांचा देश जिवंत राहिला पाहिजे. मग ते लोक आपल्या देशाची परंपरा व वारसा जिवंत ठेवतात.
कोणतेही काम करत असताना त्याच्यामुळे देशाची रक्षणीयता, वंदनीयता, पूजनीयता वाढते आहे याची जाणीव अभिमानास्पद आहेच. पण सर्व कामांचा देशाच्या गौरवाशी असलेला संबंध प्रत्येकाला दिसेलच असे नाही. त्यामुळे आपले प्रत्येक काम लोकांचा जिवंतपणा, त्यांचे चैतन्य वाढवणारे कसे होईल एवढेतरी प्रत्येकाने पाहिलेच पहिजे. माझ्या प्रत्येक कामामुळे निदान एका व्यक्तीचे आरोग्य किंवा स्वावलंबन वाढावे, निदान एक व्यक्ती तरी अधिक उद्योगी, अधिक आनंदी, अधिक उत्साही, अधिक आशावादी किंवा इतरांशी नाते वाढवणारी व्हावी असा प्रयत्न तर आपण केलाच पाहिजे.

लोकहितं मम करणीयम्‌‍

स्वामी विवेकानंद म्हणत की संन्यासी देखील याला अपवाद नाहीत. त्यांनी आपल्या एका संन्यासी शिष्याला सांगितले होते, “जोपर्यंत जिवंत आहेस तो पर्यंत बाकी काही करता आले नाही, तर भिक्षा मागून एक पैसा मिळव. तो देऊन एक मडके विकत घे. ते पाण्याने भरून रस्त्याच्या कडेला बस. आणि येणाऱ्या जाणाऱ्या तहानलेल्या वाटसरूंना त्यातले पाणी प्यायला दे. एवढे केलेस तर तुला रोज जेवण्याचा अधिकार मिळेल.” हे किमान सांगितले. इतरांसाठी स्वामीजींनी सांगितले आहे की ‌‘जीव धोक्यात असलेल्याला जीवनदान, भुकेल्याला अन्नदान, अशिक्षिताला विद्यादान आणि सर्वांसाठी अध्यात्माचे दान यातील जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे‌’ यालाच म्हणायचे ‌‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार करणे‌’. या गुणामुळे समाजमान्यतेबरोबर समाजाच्या शुभेच्छाही मिळतात. सौर वैशाख 1, शके 1929
21.4.2007

The post ४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 170

Trending Articles