वेल्ह्यात एकूणातच आरोग्याची ऐशी-तैशी आहे. त्यातही महिलाच्या आरोग्याला कोणी वालीच नाही म्हणून गेली २५ वर्ष आपण वेल्हे तालुक्यात खपून काम करत आहोत. डॉक्टरांपेक्षाही जाणीव जागृतीचीच गरज जास्त आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात येत होतं म्हणून 2020 मध्ये कामाच्या पंचविशी निमित्ताने महिला दिनाला ‘आरोग्य दौड’ काढली.. ६ ते ७२ या वयातल्या ८९० जणी ६३ गावातून सहभागी झाल्या होत्या. विंझर ते वेल्हे असे १० किमी अंतर पळून अनेकींनी पार केले त्यात अनेक जणी नउवारी साडीतल्याही होत्या. ….. या कार्यक्रमाला गावागावातून बायकांना दौडला घेउन आलेल्या वाहन चालकांचा अजून हिशोबही पूर्ण झाला नव्हता तेवढ्यात करोना संकट आले…
अचानक आलेल्या संकटात आधी स्वतःला सावरायचे मग इतरांना मदत करायची तसे झाले. हे करोना संकट इतके अचानक आले की स्वतःला सावरण्यात थोडा वेळ गेला कारण पुणे-मुंबई या मोठ्ठ्या शहरात लॉकडाउन केल्यावर पोटासाठी तिथे स्थलांतरीत झालेली गावातली मुले म्हणजे पुरुष मंडळी आपापल्या गावी घरी दीर्घ मुक्कामासाठी बायका-पोरांसह परतली होती. गावाची लोकसंख्या सात-आठशे असताना अचानक त्यात दोन-अडीचशेने त्यात एकदम वाढ झाली …… स्थानिक किराणा मालाच्या दुकानदाराचे साहित्यच संपले… असेही झाले. यामुळे करोनाचे गांभीर्य गावागावातच काय पण घराघरात पोचले.
स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागातल्य सर्व जणी फोनवर संपर्क करत होत्या. रोज झूमवर मिटिंग होत होती त्यामुळे ग्रामीण भागातली परिस्थिती समजत होती. पुण्यात एवढेच माहिती होते की फक्त ‘अत्यावश्यक सेवा’ चालू आहेत. याचा ग्रामीण अर्थ, जे फुले करणारे शेतकरी होते म्हणजे ज्यांनी झेंडूचे किंवा मोगरा, निशिगंध याचे शेत केले होते अशांचे ‘फुल बाजार बंद’ (कारण फुले अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने) नुकसान झाले. कारण फुलांसाठी पाडवा झाला नाही की रामनवमी अगदी हनुमान जयंती सुद्धा झाली नाही या उत्सवांचा पक्वान्ना बरोबरच फुलांशीही संबंध असतो! गावाकडून व्हॉट्सअप वर आलेले झेंडूच्या फुललेल्या शेताचे फोटो या काळ्या किनारीमुळे पहावत नव्हते!
गावांनी ठरवून पुण्यात जाणाऱ्या गवळी लोकांना सुद्धा सांगितले ‘जीव महत्वाचा असला तर दूध घालायला जाउ नका, त्यांच्या अत्यावश्यक सेवेपेक्षा जीव महत्वाचा आहे’ रोज ६० ते ८० लिटर दूध मोटारसायकलवर येउन दूध घालणारे बंद झाले. त्यांचे दूध जवळच्या डेअरीला घातले गेले म्हणजेच लिटर मागे १५-२० रुपयाचा फटका! आता कर्ज कसे फिटणार ही वेगळीच चिंता. शासनाने हप्ता ३ महिने लांबवला तरी व्याजाचे काय? आज कोणालाच उत्तर माहित नाही. अशा कशाकशाचे समाजावर आर्थिक ताण.
जसे दूध बंदी केली तसे गावाबाहेर जाण्यास गावानेच शासनाने सांगण्याआधीच आपापली बंदी केली. भाज्या शेतात पण तोडा करून मार्केटला जाउ नका, घरच्या लागतील तेवढ्याच काढा पण पुण्याचे मार्केट नको…. पुण्यातून येताना करोना आला तर? याची भीती! अगदीच योग्य होती…. कारण सगळे काळजी घेत आहेत असे चित्र नाही…. हे टीव्ही वर सारखे दिसते आहे.
तर काय…. गावात एकूणच उदासीन वातावरण आहे! तरीही थोडे सावरल्यावर गावातली कार्यकर्ती गावातच बाहेर पडली. गावात कोणाला मदतीची जास्त गरज आहे ते पहायला सुरुवात झाली. ज्यांची मुले घरी परतली नव्हती अशा किंवा ज्यांना मुलेच नव्हती अशा वयोवृध्द दांपत्यांना मदतीची गरज होती, हातावरच पोट असणाऱ्या एकल महिला; त्यांच्या कुटुंबाला मदतीची गरज होती. गावातल्या कार्यकर्तीला यादी पाठवायला सांगितली. तर म्हणता म्हणता ५० कुटुंबे झाली. तोवर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी थोडी देणगी उभी केली. पुण्यातून प्रत्यक्ष कोणी जाउ शकणार नव्हते हे जरी नक्की असले तरी होईल तेवढे सगळे जण मदत करत होते.
एरवी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बैठकीला गावागावातून आणायचे काम खुटवडदादा नेहमी करायचे मग त्यांना विचारले, ‘गावोगावी जाल का?’ त्यांनी आनंदाने ‘हो’ म्हंटले. नसरापूर गटातल्या महिलांनी घाउक दुकानाचा संदर्भ दिला तिथे खुटवड दादा गेले व पहिली ५० मदतीची पाकिटे बनवायला सांगितली. त्याचे e-payment केले (नोटाबंदीने सगळ्यांना e-payment करायला शिकवले त्याचा आत्ता उपयोग झाला) आणि पहिली मदत कार्याचे सामान घेउन गाडी निघाली!
शासन परवानगी लागेल हे लक्षातच आले नाही. गाडीने वेल्हे तालुक्यात प्रवेश केला आणि आंबवणे गावात पोलिसांनी गाडी अडवली. मदत कार्याचे पत्र हवे असे सांगितले मग pdf फॉर्म मधले e-पत्र व्हॉटस-अॅप वरून खुटवडदादांना पुण्यातून पाठवले. पण त्यावर शासकीय शिक्का नव्हता. हे होई पर्यंत वेळ गेला. पण स्थानिक कार्यकर्त्या निमाताई दादांना माहिती होत्या त्यांना दादांनी पोलीसांपाशी बोलावले. ‘हो हे संस्थेचे मदत कार्य आहे… सोडा की त्यांना’ निमाताई त्याच गावात रहात असल्याने पोलीस ओळखत होते…. तोवर वेल्हे कार्यालयातल्या निवासी कार्यकर्त्या प्रतिभाताई तहसील कार्ययालायात पोचल्या. नायब तहसिलदार होते. त्यांना गाडी आडवल्याचे सांगितले. त्यांनी आंबवणे गावात असलेल्या पोलिसांना खात्री करून मदत कार्याची गाडी सोडा… असे सांगितले.
पोलिसांनी खुटवडदादांना मदत घेउन जायच्या गावांची व कुटुंबाची यादी मागितली. त्यांनी त्या त्या गावच्या तलाठ्यांना फोन करून माहितीची खातर जमा करायला सांगितली मग तलाठ्यांनी सरपंचांना फोन केले, सरपंचांनी गावातल्या आपल्या कार्यकर्तीला बोलावून यादी मागितली. तिनेच ती दिली असल्याने चोख जुळली…. पुन्हा सगळे उलटे फोन झाले आणि खुटवडदादांना पोलीस म्हणाले, ‘आज सोडतो पण उद्या आलात तर शासन शिक्याचे पत्र असेल तरच सोडीन!’
हे सगळे करायला सगळं चोख होतं तरी तास गेला मग दादांनी निघताना पुन्हा कार्यकर्त्यांना फोन केले. ‘आंबवणे येथून निघालो’ सांगितले … तर त्या म्हणाल्या, ‘गावात कसे येणार रस्ता झाड पाडून आडवला आहे’, तर कोणी म्हणाले ‘दगडी टाकली आहेत आम्ही!, ….मग मात्र सांगितले ‘सगळ्यांना घेउनच मुख्य रस्त्यावर येते. तुम्ही आम्ही येईपर्यंत थांबा’ दादा पोचेपर्यंत सगळ्यांना गोळा करून तोंडाला मास्क घालून एक एक कार्यकर्ती जिच्या तिच्या फाट्यावर पोचली. गाडी आल्यावर सामान घेतले…. अगदीच ज्यांना चालताही येत नव्हते त्यांचे सामान त्यांनी स्वतःच गावापर्यंत वाहून नेले आणि प्रत्येकीला दिले. संच मोजून दिले होते. ‘कशाची मदत करायची?’ हे ठरवताना सगळ्याच बायका असल्यामुळे नेमके जिन्नस निवडले. शासन रेशन देत होती त्यात गहू तांदूळ होते. त्यामुळे तेल, मसाला, बेसन, साखर, साबण आणि मुख्य म्हणजे चहा असा शिधा आपण दिला होता. घरात बसले की दूध नसले तरी चालेल एकवेळ पण चहा हवाच! हे समजून सामान भरले. काही ठिकाणी इतरही मदत पोचली होती पण ज्यांना मदत मिळत/ मिळाली/ मिळवता आली नव्हती अशा घरात आपली मदत पोचली!
पहिला दिवस खूप शिकवून संपला…. दिवस भरात फक्त ७ गावातल्या नेमक्या ५० कुटुंबांना ही मदत मिळाली. समाधान वाटले. ज्यांनी वाटप केले अशा एकीनेही स्वतःचे नाव त्या यादीत घातले नव्हते हे विशेष!
आता मदत कार्यासाठी तहसील कार्यालयातून आपल्या वाहनासाठी ‘अत्यावश्यक सेवा’ असे पत्र मिळवले. तेव्हा आपली योजना तहसीलदारांना सांगितली. त्यांनी स्थानिक नसल्यामुळे ज्यांना रेशन देता येत नाही अशा मजुरांची यादी दिली यांनाही मदत करा असे आवाहन केले. तलाठी संपर्क करतील असे सांगितले. वाटपाचा दुसरा दिवस होता. आता गाडी सोबत कार्याकर्त्याही गेल्या. सामान बरोबर आहे ना… घाऊकात घेतले म्हणून दर्जा घसरला नाही ना हे तपासले. मदत कार्य करताना गावागावाच्या वेशीवर आता खडा पहारा होता. पोलीस कुठे कुठे पुरणार? आता शासनाने शिक्षकांना कामाला लावले आहे. आपण किशोरी विकास करताना शाळेत जातो तेव्हा सारे शिक्षक आपल्या स्थानिक ताईना ओळखत होते. ‘अत्यावश्यक सेवा’ पत्र होते पण चेहेरेच ओळखीचे होते त्यामुळे कुठेही आडवणूक झाली नाही. अगदी गरजू कोण आहे… आणि राजकारणी घराशेजारी रहात असल्यामुळे गरजू कोणी ‘साधलंय’ हेही कळत होतं. ठेकेदारांच्या मजुरांना मदत करत होतो. ठेकेदार लांब असल्यामुळे काही करू शकत नव्हते…जाता जाता कळले राजगडावर काही मजूर बांधकामासाठी आले आहेत. एरवी पर्यटक जात असल्यामुळे त्यांना गडावर सगळे मिळे पण आता पर्यटक नाहीत …. त्यांची मदत गावात ठेवायची ठरले. वाटप करणाऱ्या साऱ्या स्वतःच स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी असल्यामुळे त्यातले गहू काढून तांदूळ दुप्पट ठेवले. कारण गडावर गिरणी नाही मग हे दळणार कसे? त्यापेक्षा भात खाउ दे! हा विचार. नुसतेच मदत कार्याला चला म्हंटले असते तर हे जमले नसते. ‘आपण अडचणीत सापडलेल्यांची भूक भागवतो आहोत’ असे वाटले म्हणून हे सुचले.
काही जण असे भेटले की एरवी त्यांची बरी परिस्थिती आहे, पुण्यात रहातात, रेशन कार्डही पुण्यातलेच आहे पण लग्नाला दोन दिवसासाठी गावात आले आणि गाड्या बंद केल्यामुळे आडकून बसले. सोबतचे पैसेही संपले… त्यांनाही मदत हवी आहे…. मग स्थानिक गाड्या बंद आहेत म्हणून कोणाला BP ची गोळी मिळाली नाही असे कळले तर त्याचे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन औषधाच्या दुकानदाराला देणे व जाताना त्या गोळ्या पेशंटला पोच करणे हा सुद्धा मदत कार्याचा भागच झाला …. अडचण आली म्हणून मदत करायाची ठरवले तर अशाही मदत करायला हवी असेही वाटून गेले. माणूस म्हणून सेवा भावाने सारे करूया …. तर समाधानही मिळेल.
सगळे फोनवरून संवाद होउन ठरत होते, कळत होते. ऐकताना असे वाटत होते की आता एवढ्या दिवसाच्या एकत्र कामाच्या विश्वासामुळे हे घडते आहे. गावातल्या बाईला आपण फोन वापरायला शिकवला त्यावर काम करायला शिकवले म्हणून हे घडू शकत आहे… अशा प्रकारचा गावागावात मुरलेला काही वर्षांचा संपर्क आहे म्हणूनच गरज असणाऱ्यांपर्यंत पोचायची व्यवस्था आपण करू शकत आहोत. कुठे सहनिवासाताल्या मुलींनी गावातली माहिती दिली नि वाटपासाठी मदत केली तर कुठे आशा आरोग्य कार्यकर्त्यांनी कुठे अंगणवाडी ताई यांनी मदत केली तर कुठे बचत गटाच्या प्रमुखांनी ….. फक्त पैसे उभे करून अशी कामे होत नाहीत. पैसे तर निःसंशय लागतातच पण असे विश्वासार्ह नेटवर्काही लागते त्या शिवाय यातले काहीही करणे शक्य झाले नसते! करणाऱ्याला काम खूप आहे ते म्हणतात ना ते हे असे!!
मदत कार्याच्या पहिल्या दोन दिवसाचे हे निवेदन आहे मदत कार्य चालू आहे…. आवश्यकते प्रमाणे चालू राहिलंही….. आपाली आर्थिक मदत स्वागतार्ह!
वैयक्तिक व्हॉटस अपवर लेखी संपर्क करावा सुवर्णा ९८८१९३७२०६
The post मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना….. first appeared on ज्ञान प्रबोधिनी.