ज्ञान प्रबोधिनी ही एक शिक्षणसंस्था म्हणून सामान्यतः समाजात परिचित आहे. ग्रामविकसन, स्त्रीसबलीकरण, युवक व युवती संघटन, मानसशास्त्र संशोधन, संस्कृत-संस्कृति-संशोधन, शैक्षणिक उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या प्रांतात ज्ञानसेतूचे म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय एकात्मतेचे काम करणे, राष्ट्रीय आपत्प्रसंगी शक्यतो मदतीसाठी धावून जाणे, वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालये चालवणे, अशी नानाविध कामे करणारी ज्ञान प्रबोधिनी एक संघटना आहे याची माहिती फारच थोड्यांना असते. तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे प्रशासनासाठी अनेक कार्यक्षम, प्रामाणिक व प्रतिज्ञित प्रशासक तयार करणारी प्रबोधिनी क्वचितच कोणास माहिती असते.
प्रबोधिनीतील विद्याथ, कार्यकर्ते आणि हितचिंतक अशा अनेक व्यक्तींनाही ठिकठिकाणी चालू असणाऱ्या प्रबोधिनीच्या बहुविध कार्याचे पुरेसे ज्ञान नसते किंवा प्रसंगी थोडे ऐकीव अथवा वाचनात आलेले तुटपुंजे ज्ञान असते. अशा अनेकांनी जिज्ञासेने विचारलेल्या प्रश्नांना प्रबोधिनीचे मा. संचालक वा. गिरीश श्री. बापट यांनी वेळोवेळी समुचित उत्तरे दिली आहेत. पण तरीही असे अनेक विद्याथ, कार्यकर्ते असतात की त्यांच्या मनात प्रबोधिनीसंबंधी जिज्ञासा असते, शंकाही असतात, पण मा. संचालकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे निरसन करून घेण्याची संधीच त्यांना मिळालेली नसते. असे ठिकठिकाणी कार्य करणारे जे जिज्ञासू त्यांचे समाधान व्हावे यासाठी ‘जिज्ञासापूतचा’ हा प्रयत्न केलेला आहे, तो औचित्यपूर्ण आहे. शंभरहून अधिक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी संकलित केलेली आहेत.
प्रबोधिनीचा शिक्षण विभाग व त्यातील औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, क्रीडा दले व ती चालवणारे कार्यकर्ते यांच्यासंबंधीही बरेच प्रश्न पुस्तकात उत्तरलेले दिसतील. हिंदुत्व, धर्मसंस्थापना, धर्मसंस्कार ह्या संबंधीची उत्तरे पुस्तकात वाचता येतील. प्रतिज्ञा ग्रहण, सहविचार, प्रबोधिनीची वैचारिक बैठक, व्यक्तिविकास या प्रबोधिनीच्या विशेषताही प्रश्नानुषंगाने स्पष्ट केलेल्या यात वाचावयास मिळतील.
विज्ञाननिष्ठा हे प्रबोधिनीच्या तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व! ‘डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका| जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका’ हे पालुपद असणारे गीत प्रबोधक म्हणत असतात. त्यामुळे प्रबोधक चिकित्सक असतातच. पण त्यांनी श्रद्धापूर्वक चिकित्सा करावी अशी अपेक्षा असते.
प्रबोधिनीप्रणीत उपासनेत विरजामंत्रांचा समावेश असतो. त्यात विरजा आणि विपाप्मा हे दोन शब्द अनेकांना अडतात. त्यांचे स्पष्टीकरण पुस्तकात केले आहे. रज म्हणजे धूळ अथवा मळ. ‘मी मालिन्यमुक्त होत आहे’ असे चिंतन उपासकाने करावयाचे असते. रज म्हणजे बहिरंगाचे मालिन्य आणि पाप म्हणजे आंतरिक मालिन्य. मनाचे मालिन्य नाहिसे झाले आहे (असे मी व्हावे) असा विपाप्मा शब्दाचा अर्थ आहे.
सेवा कार्याविषयी विशेष आस्था बाळगणाऱ्या व्यक्तीने विचारले आहे की ‘प्रबोधिनीत सेवाकार्यास प्राधान्य का दिले जात नाही?’ मा. संचालकांनी दिलेल्या सुयोग्य उत्तरास पूरक म्हणून सांगावेसे वाटते की भूकंप, महापूर, भीषण वादळांसारख्या आपत्तीमध्ये प्रबोधकांनी हातातली कामे बाजूस ठेवून आपत्ती निवारणासाठी धाव घेतली आहे. मग तो कोयनेचा भूकंप असो की किल्लारीचा भूकंप असो! तापी-नर्मदा नद्यांना एकत्र आणणारा जलप्रलय असो किंवा दशसहस्र माणसांचा बळी घेणारे आंध्रातील वादळ असो! मा. संचालकांनी आंध्र वादळानंतरच्या शवसेनेत भाग घेऊन प्रेते पुरण्याचे कामही केले आहे. पुणे आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील कुष्ठरोगाचे पूर्ण निर्मूलन करण्याचे काम शासनाच्या वतीने प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी दोन दशके कुष्ठ रुग्णांच्या जखमा बांधून व लहान मुलांना प्रतिबंधक औषधे घ्यायला लावून यशस्वी केले आहे.
प्रबोधिनीच्या घटनेमध्ये ‘धर्मसंस्थापना’ हा शब्द आलेला आहे. रिलिजन म्हणजे ‘धर्म’ हा अर्थ सदोष असूनही तो रूढ झाला असल्याने ‘कर्तव्य’ हा त्याचा मूळ अर्थ विस्मरणात गेला आहे. ‘धर्मसंस्थापना’ शब्दात कुठल्या पूजा पद्धतीचा संबंध नाही. रिलिजनचा अर्थ पूजापद्धती असा आहे. म्हणून धर्मसंस्थापनेचा अर्थ स्पष्ट करणे इष्ट आहे. व्यक्तीचे कुटुंबापासून मानवमात्रापर्यंत काही कर्तव्य असते तसे निसर्गाशीही त्याचे काही कर्तव्य असते हे ध्यानी घेतल्यास धर्मसंस्थापनेचा अर्थ स्पष्ट होईल.
संस्कार शब्दाचा रूढार्थ फारसा चुकीचा नाही पण प्रबोधिनीत संस्कार शब्दास जो अर्थ गृहीत धरला आहे तो ध्यानी घेणे अधिक चांगले. आपल्याला हवा तसा बदल घडवून आणणे म्हणजे संस्कार करणे (इष्टरूपान्तकरण) असा एक अर्थ आहे. तो योग्यच आहे पण चांगल्या गुणांची प्रतिष्ठापना करणे व दुर्गुणांचे निराकरण करणे म्हणजे संस्कार हे स्पष्टीकरण त्याच्या सोबत घेतल्यास नेमकेपणा येईल. (गुणाधान व दोषापनयन असे मुळातील शब्द आहेत.) ज्ञान प्रबोधिनीत धर्मसंस्काराकडे या अर्थाने पाहण्याचा प्रयत्न असतो.
सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे ही एक महत्त्वाची सिद्धी म्हणता येईल. ती साधावी यासाठी करावयाचा विधी पूव उपनयन, मुंज इ. नावाने होत असे. ब्रह्मचर्याश्रमातील हे महत्त्वाचे काम! विनोबांनी ब्रह्मचर्याची व्याख्या करताना म्हटले आहे.
सकळ इंद्रिये राखणे संयमी | ब्रह्मचर्य आम्ही त्यास म्हणू ॥
असे ब्रह्मचर्यव्रत स्वामी विवेकानंदांकडून ज्यांनी विधिपूर्वक स्वीकारले व आयुष्यभर त्याचे पालन करत भारतमातेची मोठी सेवा केली त्या भगिनी निवेदिता प्रबोधिनीमध्ये एक आदर्श मानल्या जातात. त्यांची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्यांचे अनुकरण व्हावे यासाठी त्या आदर्श मानल्या जातात. आपणास प्रिय व्यक्तीस फुले देऊन आपण प्रसन्न करतो. तसेच फुलांच्या साहाय्याने करावयाची कृती म्हणजे ‘पूजा’ हा तमिळ शब्द आहे. ज्या व्यक्तीस आपण प्रसन्न करतो आहोत ती व्यक्ती आपल्या वागण्याने खरोखरी प्रसन्न होत असते. फुलाने त्यात भर पडेल इतकेच! ज्याचा ज्याचा आपल्याला काही ना काही उपयोग होतो त्याच्यासंबंधी कृतज्ञ राहणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे केरसुणीही लक्ष्मी मानून तिची पूजा करणारी आपली संस्कृती आहे. उठल्या उठल्या ‘पादस्पर्शम् क्षमस्वमे’ असे म्हणून जीवनाधार अशा भूमातेला वंदन करणे, नाना कला-विद्या यांच्या निर्मितीस साहाय्यभूत ठरणाऱ्या हातांचे उठताउठताच दर्शन घेणे (प्रभाते करदर्शनम्) ही आपली संस्कृती आहे.
नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला विद्या कलांची उपासना करूनच पुढची प्रगती करणे शक्य होत असते. नेतृत्वगुणविकसन हे ज्ञान प्रबोधिनीचे एक उद्दिष्ट आरंभापासूनच नोंदवलेले आहे. हे विकसन व्हावे यासाठी शिबिरे, सहली, बैठकी, अभ्यासदौरे आणि अशी अन्य कृतिकार्ये गटागटानी करावी लागतात. एका वर्गाच्या पातळीवर अग्रणींनी असेच प्रत्यक्ष काम करण्याचा सराव ठेवला तर त्यांच्या नेतृत्वगुणांमध्ये वाढ होणे संभवनीय आहे, दलांवर ही गोष्ट सहज घडते.
दलांवर मुख्यतः युवकांची संख्या अधिक असल्यास त्यांचे स्वतंत्र खेळ व्हावेत, बालांची संख्या असेल तर त्यांचे वेगळे कार्यक्रम असावेत आणि आपण होऊन क्रीडांगणाकडे आकर्षित झालेल्या शिशूंचा गटही त्यांना योग्य असे छोटे खेळ खेळू शकतो. बालांमधील अनुभवी मुलेही शिशूंचे खेळ आवडीने घेऊ शकतात. कथाकथन, पद्यगायन, सोपे प्रासंगिक बोलणे इ. गोष्टी मात्र युवक-बाल व शिशूंचे एकत्रच व्हाव्यात. या मार्गाने युवकांच्या नवीन पिढीची निर्मितीही काही अंशी एका क्रीडांगणावरही होत राहते असा अनुभव आहे.
कला दल, विज्ञान दल, सेवा दल अशा नाना दलांची काळाची गरज म्हणून उभारणी करायची, असे उद्दिष्ट ठरले तर त्यासाठी त्या त्या दलास योग्य वाटतील असे काही खेळ असावेत, पण पद्य गायन, विचारमंथन, प्रार्थना अशा काही गोष्टी मात्र वेगळ्या नसाव्यात. ‘मातृभूमि हे दैवत येथे’ याचे स्मरण ठेवून त्या दैवतासमोर साजेल, शोभेल असा कोणताही उपक्रम घेण्यास प्रत्यवाय नसावा.
ज्ञान प्रबोधिनीशी संबंधित सर्वांनाच उद्बोधक ठरावी व काम करताना मार्गदर्शक ठरावी अशी ही पुस्तिका मा. संचालकांनी सिद्ध केली त्यासाठी त्यांना सारे वाचक धन्यवाद देतील यात संदेह नाही.
—– यशवंत शंकर लेले
The post जिज्ञासापूर्ती- प्रस्तावना first appeared on ज्ञान प्रबोधिनी.