Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 160

११. धर्म, संस्कृती आणि समाज

$
0
0
  • आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला समाज म्हणजेच आपले राष्ट्र असे राष्ट्राचे वर्णन प्रतिज्ञेत का केले आहे ?

अनुभवाने, पाहून-ऐकून, कल्पनेने आणि विचार करून जे लोक आपले वाटतात त्या सर्वांचा मिळून समाज बनतो. त्या समाजाला इतिहास असतो, तो समाज आजही वर्तमान असतो म्हणजे अस्तित्वात असतो,  त्याला भविष्य असते. आपल्या प्रत्येकापर्यंत जो इतिहास पोचतो ती आपली संस्कृती असते. परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचलेल्या संस्कृतीतले चांगले आहे ते टिकवणे, कालबाह्य झालेले वगळणे, कालानुरूप नवीन भर घालणे हे प्रत्येक समाजाला करावेच लागते. ही सांस्कृतिक सेवा. समाजाचे आजचे अनेक प्रश्न असतात. अस्तित्वाचे, अस्मितेचे, विकासाचे, न्यायाचे असे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे ही सामाजिक सेवा आहे. प्रत्येक समाजाचे भविष्याबद्दल काही स्वप्न असते, काही कल्पना असतात. प्रत्येकाने स्वत:मधील व इतरांमधील वैश्विक शक्तीचे अधिकाधिक अंशाने प्रकटीकरण करणे हेच स्वप्न आपल्या समाजात पिढ्यान्-पिढ्या बाळगलेले आहे. आर्थिक, भौतिक आणि लष्करी विकासापलीकडचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न करणे व ते स्वप्न कणाकणाने प्रत्यक्षात येत असल्याचा अनुभव घेणे म्हणजेच सर्व संप्रदायांना पोटात घेणार्‍या चिरंतन धर्माची सेवा करणे.

देशभावना हि चांगली आणि राष्ट्रभावना ही आक्रमक, अशी चुकीची परिभाषा रूढ होते आहे. भारताचा राष्ट्रवाद हा मूलतः अनाक्रमक, सांस्कृतिक व ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भूमिकेवर आधारित आहे. समाजाचा इतिहास, वर्तमान व भविष्य मिळून राष्ट्राचा पूर्ण विचार होतो. धर्माने भविष्याची, संस्कृतीने इतिहासाची व समाजाने वर्तमानाची आठवण होते म्हणून हे तिन्ही म्हणजेच आपले राष्ट्र असे राष्ट्राचे वर्णन प्रतिज्ञेत केले आहे. आपली रुची-स्वभाव-संस्कार-परिस्थितीची जाण, यानुसार आपण तिन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे सेवेचे काम सुरू केले तरी त्याचा परिणाम इतर दोनवर होतोच.

***********************************************************************************************************

The post ११. धर्म, संस्कृती आणि समाज first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 160

Trending Articles