निरूपण –
गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न) निरूपणे का लिहायला घेतली ? (दुसरा प्रश्न) पद्यांची निवड कशी केली ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे — सुमारे अकरा-बारा वर्षांपूर्वी ‘स्वतःला घडविण्यासाठी उपासना’ हे माझे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात स्वतःला घडविण्याच्या चार पायऱ्या मी मांडल्या आहेत. कै. आप्पांनी १) चित्तशुद्धी, २) चित्त उल्हास आणि ३) चित्त प्रेरणा अशा तीन पायऱ्या मांडल्या होत्या. माझ्या समजुतीप्रमाणे व अनुभवानुसार मी चित्तशुद्धीचे पुन्हा १.१) चित्तप्रकाशन व १.२) चित्तविस्तार असे दोन भाग केले.
चित्तप्रकाशनावर लिहिताना मी माझ्या परदेश वास्तव्यातला एक अनुभव सांगितला होता. घर व विद्यापीठ यामधले चार-पाच किलोमीटर अंतर बऱ्याच वेळा मी पायी ये-जा करायचो. रस्त्यावर पादचारी कोणी नसायचेच. निर्मनुष्य रस्त्यावर चालत असताना मला म्हणता येणारी व आवडणारी पद्ये मोकळ्या आवाजात व मोठ्याने म्हणत जायचो. सुरुवातीला केवळ चाल व शब्दयोजनेमुळे आवडणारी पद्ये म्हणता म्हणता, त्यांच्या अर्थावर विचार होत गेला. अर्थ समजत गेला तशी ती पद्ये अधिक आवडत गेली. तीन वर्षांमध्ये दोनशे वेळा तरी असे चालत पद्यगायन केले असेल. पद्यांचा अर्थ जसा मनात ठसत गेला तसे राष्ट्रभक्तीची अस्फुट भावना व आधीपासून केलेले राष्ट्रकार्याचे संकल्प मनात अनुक्रमे स्पष्ट व दृढ होत गेले. त्या प्रक्रियेला व तिच्या परिणामाला चित्तप्रकाशन असे नाव मी नंतर दिले. पुस्तकातील हा भाग वाचलेल्या काही जणांनी, करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी अभंगांची निरूपणे लिहिली, त्याच पद्धतीने मला समजलेल्या अर्थाप्रमाणे या पद्यांचे निरूपण मी लिहावे, असे सुचवले होते. त्याला आत्ता वेळ मिळाला.
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर — मी परदेशात वारंवार म्हणत असलेली ३६ पद्ये अजून आठवतात. त्यातली प्रबोधिनीतल्या कवींची बहुतेक पद्ये, त्या कवींना अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा, माझ्याकडून वेगळा अर्थ लिहिला जाऊ नये म्हणून, मी वगळली. उरलेल्या पद्यांपैकी मला जी जास्त अर्थपूर्ण वाटली ती पद्ये मी निरूपणासाठी निवडली. आज त्यातल्या शेवटच्या पद्याचे निरूपण करून ही निरूपणमाला संपवतो आहे.
पद्य क्र. १७ – वंदना के इन स्वरों में
या निरूपणमालेतले आजचे शेवटचे पद्य म्हणजे मातृभूमीला केलेले वंदन आहे. या पद्याचा प्रबोधिनीत जो पाठ रूढ आहे त्याच्याच अर्थाचे निरूपण आज करत आहे.
खुलभर दुधाची कहाणी अनेकांनी ऐकली असेल. एका राजाने शिवमंदिराचा गाभारा भरण्यासाठी गावातील सगळ्यांना घरचे दूध आणून गाभाऱ्यात घालायला सांगितले. सगळ्यांनी तसे केले, पण गाभारा भरला नाही. दुपारी एक म्हातारी खुलभर (चुळकाभर किंवा चूळ भरता येईल एवढे) दूध घेऊन आली. तिने दूध ओतताच गाभारा भरून गेला. तिने तिच्याकडे होते ते सर्व दूध प्रामाणिकपणे दिले हे त्याचे महत्त्व आहे. इतरांनी किती दूध दिले, दूध दिले की त्यात काही पाणी होते, याची चौकशी तिने केली नाही. इतरांनी त्यांचे काम केलेच असेल हा विश्वास आणि मी माझे काम केले पाहिजे ही भावना त्या म्हातारीची होती. तीच भावना या पद्यात व्यक्त झाली आहे.
वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो ॥धृ.॥
सर्व जण मनोभावे मातृभूमीचे स्तवन करत तिला नमस्कार करत आहेत. त्या स्तवनामध्ये माझाही आवाज मिसळून घ्या. मीही तुम्हा सर्वांबरोबर या स्तवनामध्ये सहभागी होतो.
श्रेष्ठ जीवन को न भूलो, राग में जब मस्त झूलो
अर्चना के रत्नकण में, एक कण मेरा मिला लो ॥१॥
राग म्हणजे आवडीची गोष्ट मिळाल्यावर किंवा झाल्यावर येणारा सुखद अनुभव. त्या सुखद अनुभवात तुम्ही जेव्हा मनोमन मस्त डोलत असता, तेव्हा तुम्हाला तुमची प्रिय गोष्ट म्हणजेच तुमचे प्रेयस मिळालेले असते. अशा वेळी आपण आवडीच्या गोष्टींच्या मागे लागणे एवढेच करायचे नसून, आयुष्यात त्यापेक्षा श्रेष्ठ असेआपल्याला व सर्वांना श्रेयस्कर म्हणजेच श्रेयसही मिळवायचे आहे हे विसरू नका.
समुद्रमंथनाच्या वेळी ज्यातून चौदा मौल्यवान वस्तू निघाल्या तो रत्नाकर समुद्र आपल्या मातृभूमीचे पाय सतत धूत असतो. या पूर्वी होऊन गेलेले अनेक ब्रह्मर्षी व राजर्षी म्हणजे आपल्या देशातली मानवी रत्नेच होती. ही रत्ने मातृभूमीसाठी जगली. त्यांनी आपल्या मौल्यवान आयुष्याने मातृभूमीची पूजा केली. माझे आयुष्य एक रत्नकण नसले तरी एक धूलीकण निश्चितच आहे. रत्नाकर समुद्र, ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांच्याप्रमाणे माझा धूलीकणही मला मातृभूमीच्या चरणांवर वाहू द्या. सगळे जण करत असलेल्या पूजेत मलाही सहभागी करून घ्या. तेच माझे व सर्वांचे श्रेयस आहे.
जब हृदय के तार बोले, शृंखला के बंध खोले
चढ रहे हैं शीश अगणित, एक सर मेरा चढा लो ॥२॥
तार म्हणजे उच्च स्वर. हृदय म्हणजे अंतःकरण. अंतःकरणापासून उच्च स्वरात म्हणजे व्याकुळतेने परमेश्वराला साद घातली की तो आपल्या बंधनातून आपली सुटका करतो. भागवतात गजेन्द्रमोक्षाची कथा आहे. सरोवरात गेलेल्या हत्तीचा पाय मगरीने पकडला. हत्तीने कितीही जोर लावला तरी त्याला तो पाय सोडवता येईना. शेवटी त्याने व्याकुळ होऊन विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा त्याच्या अंतःकरणातील विष्णूने त्याची सुप्त शक्ती जागी केली. त्याला मग आपला पाय सोडवता आला. आपल्यामधील शक्तीच्या अमर्याद राखीव साठ्याची जाणीव होऊन तो साठा वापरता येण्यासाठी मरणवेळ येऊन ठेपावी लागते. जगण्याची तीव्र इच्छा असली तर त्या मरणासन्न वेळी ‘हृदयाचे तार बोलायला’ लागतात. मग आपल्या मर्यादांची बंधने ओलांडून आपण कल्पनातीत पराक्रम करून जातो. मातृभूमीसाठी अनेक जण मरणाच्या दारापर्यंत गेले. त्यांनी मातृभूमीला जणू आपले शिर वाहिले. तसे माझेही शिर मी वाहायला तयार आहे. शिर हे आपले उत्तमांग. ते वाहायला तयार असणे म्हणजे आपला अहंकार किंवा ‘मी कोणीतरी श्रेष्ठ, कोणीतरी विशेष’ ही भावना विसरायला तयार असणे. ती विसरल्यावरच आपण व्याकुळतेने आपल्यातील सुप्त शक्तीला आवाहन करू शकतो.
मातृभूमीला आपले जीवन म्हणजे सर्व शक्ती व अहंकार अर्पण करायचा तो सर्व देशांमध्ये सुसंवाद असलेले एक आदर्श जग निर्माण करण्यासाठी. त्याबाबत मदुराई येथे मानपत्राला दिलेल्या उत्तरात विवेकानंदांनी सांगितलेल्या वाक्याने या निरूपणाचा आणि एकूण निरूपणमालेचा समारोप करतो. विवेकानंद म्हणतात — ‘उद्याच ती अवस्था (सामाजिक परिपूर्णता) येईल अशा कल्पनेने व ती आपल्याच परिश्रमांवर अवलंबून आहे असे समजून प्रत्येकाने काम केले पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने अशी श्रद्धा बाळगली पाहिजे की जगातील प्रत्येकाने आपले कार्य पार पाडले असून, जगाला पूर्णता प्राप्त करून देण्याचे उर्वरित कार्य आपल्यालाच करायचे आहे. आपण घ्यायची जबाबदारी अशा स्वरूपाची आहे’. म्हणूनच ‘एक स्वर मेरा मिला लो | एक कण मेरा मिला लो | एक सर मेरा चढा लो |’ असे म्हणत राहिले पाहिजे.
पद्य –
वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो ॥धृ.॥
श्रेष्ठ जीवन को न भूलो, राग में जब मस्त झूलो
अर्चना के रत्नकण में, एक कण मेरा मिला लो ॥१॥
जब हृदय के तार बोले, शृंखला के बंध खोले
चढ रहे हैं शीश अगणित, एक सर मेरा चढा लो ॥२॥
The post पद्य निरूपणाची भूमिका first appeared on ज्ञान प्रबोधिनी.