कातकरी गटासाठीचे काम तसे नवीनच म्हणजे वेल्हे तालुक्यात २०१७ पासून सुरू झाले. वंचित गटासाठी काम करायचे आहे असे म्हणणारी प्रतिभाताई वेल्हे निवासात मुक्कामी आली तेव्हा कातकरी समाजाच्या विकास कामाला सुरुवात झाली.
वेल्ह्यातली कातकरी वस्ती म्हणजे मुख्य समाजापासून वंचित राहिलेली वस्ती, तशी परिचित होती पण दुरून-दुरून .. कामाला सुरुवात केली तेव्हा ताई वस्तीवर गेली की तीला दिसायची ती शाळेच्या वेळात शाळेत न जाता उंडारणारी पोरं! वस्तीवर काम सुरू करायला भेट दिली तरी काही प्रतिसादच नसायचा. शासन मुलांनी शिकावे म्हणून प्रयत्न करत असते पण शाळेत आलेल्या मुलांसाठी …. जे शाळेतच येत नाहीत त्यांच्यासाठी काय? असा मुख्य प्रश्न होता.
कातकरी समाज मागास कारण शिक्षण नाही.. शाळेत बोललेली भाषा समजत नाही, एका जागेवर एवढा वेळ बसायची सवय नाही .. ते बघून वाटायचे जर शाळेत जाऊ शकणारी मुले जर आज शाळेत गेली नाहीत तर विकासायाची सुरुवातच पुढच्या पिढीपासून होईल म्हणून ‘चला त्यांना शाळेत जावे असे वाटायला मदत करूया’ अशा उपक्रमाने सुरुवात केली. असे काम वस्तीवरच्या किती मुलांसाठी करावे लागणार आहे हे कळावे म्हणून वस्तीचे सर्वेक्षण केले. त्यात मुला-मुलींची नेमकी यादीच मिळाली. आणि आजही ५-७ भावंडे असणारी कुटुंब अस्तित्वात आहेत अशी सर्वेक्षण करणाऱ्या ग्रामीण मुलींना सुद्धा धक्का देणारी माहिती समोर आली. या सर्वेक्षणात कौटुंबिक माहिती बरोबर आर्थिक, रोजगारा विषयी, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, आरोग्य या विषयीचीही माहिती घेतली.
वस्तीवरच्या कामाची सुरुवात, वस्तीवर साप्ताहिक भेट देण्यापासून केली. या साप्ताहिक भेटीत मुलांचे शारीरिक खेळ, गाणी शिकवणे, गोष्टी सांगणे आशा उपक्रमापासून सुरू केले. हळूहळू एक-एक जण गटात यायला लागला/ली. वस्तीवरचे काम करणाऱ्या युवती जवळपासच्या गावातल्याच होत्या, तरीही अशा वस्तीवर प्रथमच जात होत्या. या ताई कॉलेजमध्ये जाणाऱ्या, वयाने लहान असल्यामुळे मुला-मुलींना जवळच्या वाटायला लागल्या. आपल्या उपक्रमात नियमित सहभागी होणाऱ्या मुलांचे भावविश्व समृद्ध व्हावे म्हणून पुण्यात सहली काढल्या, उपक्रमात पुण्यातून जाऊन सहभागी होणाऱ्या रसिकाताईच्या आग्रहाने, नवीन काही शिकायला मिळेल अशी सहामाही शिबिरे घेतली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलेपणा वाढला, मग वैयक्तीक स्वच्छतेच्या सवयी असा विषय हाताळणे सोपे झाले. रोज आंघोळ करायची, वेणी घालायची, दात घासायचे याचे प्रात्यक्षिक दाखवून आग्रह धरायला सुरुवात केली. स्वच्छ कपडे घातले की मग शाळेतली बाकी मुले चिडवणार नाहीत असेही हळूहळू सांगायला सुरुवात केली. शाळेत जाताना पायात चप्पल असावी म्हणून एका ताईंनी तर गटातल्या प्रत्येकाला नवी कोरी चप्पल खरेदी करून प्रोत्साहन दिले. अगदी बक्षीस म्हणून साबण, तेल बाटली, कंगवा, पेस्ट, ब्रश अशा गोष्टी देणगी मिळवून वाटप सुरू केले.. शाळेतल्या सरांना विश्वासात घेऊन, ‘मुलांना आवरून शाळेत पाठवतो आहोत…. शिकायला बसतील असे बघा’ इथपर्यंत बोलणी केली.
प्रत्येक कातकरी वस्तीवरचे प्रश्न वेगळे होते. नसरापूर वस्ती हायवेच्या एका बाजूला आहे तर शाळा दुसऱ्या बाजूला! एवढा वहाता रस्ता छोटी मुलं ओलांडणार कसा? म्हणून मुले शाळेत जात नाहीत असे लक्षात आले. पालकांनाच शिक्षणाचे महत्व समजत नाही, आणि हातावरचे पोट, कामाच्या वेळामुळे शाळेत सोडायला जमत नाही मग देणगी मिळवून रोज वस्तीवरच्या सगळ्या मुला-मुलींना शाळेत सोडायला ताईची नेमणूक केली. सातत्याने केलेल्या अशा विविध प्रयत्नातून अनेक जण अधून मधून शाळेत जायला लागली, साधारण २५ जण मात्र नियमित शाळेत जायला लागली ही विशेष! आपल्या वेल्हे निवासात सध्या ३ जणी राहून नियमित शाळेत जात आहेत. त्यांची घरं शाळेजवळ असली तरी शाळेत जाण्यासाठी पूरक वातावरण घरात/ वस्तीवर नाही म्हणून सतत संवाद केल्यावर जागृत झालेल्या पालकांनी तिचा निवासात प्रवेश घेतला! त्यांत्यातल्या ६ जणांचे शिक्षण १०-११ वी पर्यन्त झाले. म्हणजे ते शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात. ही संधी घेऊ शकतात. आपण नसतो तर ही संधी घेण्या इतके ते शिकले नसते.
फक्त शाळा भरती असे एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन विकास उपक्रम राबवता येत नाही. सोबत वस्ती विकासही करावा लागतो. विकास प्रक्रियेतील सगळ्या स्टेकहोल्डरसाठी काहीतरी करावे लागते. मग वस्तीवर महिलांसाठी बचत गट सुरू केले, गटात येणाऱ्या शेळी पालन करणाऱ्या महिलांसाठी खेळत्या भांडावलातून आर्थिक मदत केली, त्यांचे मेळावे घेतले, सहली काढल्या. महिलांसाठी असे काम सुरू केल्यावर मुलांचे काम, नियमित स्थिर उपस्थितीने सुरू झाले.
३ वर्षांपूर्वी पुण्यातल्या ग्लोबंट कंपनीत काम करणाऱ्यांनी ग्रामीण भागातल्या कोणाची तरी दिवाळी साजरी करायला देणगी दिली. या निमिताने आपण कातकरी वस्त्यांवर दिवाळी साजरी केली. घरापुढे रांगोळी काढली, पणत्या लावल्या, मुलांना सुगंधी तेल/ अत्तर लावले एकत्र फराळ खाल्ला! अशा प्रकारे अनेक घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी झाली. आता आपण दरवर्षी कातकरी विकास उपक्रमाचा भाग म्हणून अशी दिवाळी साजरी करतो!
जसे जसे उपक्रम घ्यायला लागलो तसतसे वस्तीवर स्वागत व्हायला लागले. मग कोणी बाळंतीण झाली की तिला मदत मिळावी असे वाटायला लागले. महिलाच काय पण पुरुष मंडळी सुद्धा बोलायला लागली. कोकणातले कातकरी मासेपालन कसे करतात हे पाहायला त्या सगळ्यांची सहल नेली. शासकीय योजनांची माहिती दिली. तेव्हा मात्र योजनेचे लाभार्थी हे कातकरी होऊ शकत नाहीत असे लक्षात आले कारण वस्तीवर राहाणाऱ्यांचा अस्तित्वाचा पुरावा असणारे आधार कार्ड यांच्याकडे नाही! मग तालुकाच्या तहसीलदार साहेबांशी बोलणी केली आणि वस्तीवरच आधारकार्ड निघेल असा शासकीय अधिकाऱ्यांसह मेळावा घेतला! संस्थेच्या या प्रयत्नांमुळे अजून बरीच जण बाकी असली तरी वस्तीवरची ६२ जण आधार कार्ड मिळाल्यामुळे अस्तित्वात आली.
आता ते सगळे शासकीय कार्यालयात आपापल्या कामासाठी जाऊ शकतात, बराच पल्ला गाठायचा अजून बाकी आहे तरी काही मुलं आपल्या प्रयत्नाने शाळेत जायला लागली, महिलांना बचत गटातून कर्ज मिळाली, त्यांनी त्या कर्जाची १००% परतफेड केली. मुख्य प्रवाहात यायचे तर असे सगळे करावे लागते, असे का करायचे तेही समजावे लागते. स्वतःच्या स्वार्थापलिकडे जाऊन जिच्यावर विश्वास ठेऊन करायचे अशी व्यक्ती/संस्था आपल्यासाठी काम करत आहे असे वाटले की विकासप्रक्रियेला सुरुवात होते, अशी कातकरी विकासाची सुरुवात काही वस्त्यांवर तरी आपल्या प्रयत्नाने सुरू झाली.
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६
The post मागे वळून बघताना ९ – कातकरी विकास उपक्रम first appeared on ज्ञान प्रबोधिनी.