२४. बीजापासून फळ आणि फळावेगळे बीज
भुईमुगाच्या शेतामध्ये जाऊन एखादे रोप उपटले आणि खाली लागलेल्या कोवळ्या शेंगा पाहिल्या, तर लक्षात येते की त्यांच्यामध्ये दाणे आणि टरफलं अजून एकमेकांपासून वेगळे झालेले नाहीत. भुईमुगाची पेरणी केली की त्याच्या मूळ सत्त्वापासून म्हणजे सृजनाच्या किंवा नवनिर्मितीच्या शक्तीपासून पूर्ण रोप आणि शेंगा तयार होतात. त्या शेंगांची हळूहळू वाढ होत टरफल टणक होत जाते व आतले दाणे भरत जातात. पूर्ण वाढ झाल्यावर टरफल वेगळे होते आणि आतले दाणे सुटे होतात. त्या दाण्यांमध्ये मुळात पेरलेले सत्त्व पुन्हा आलेले असते. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये एके ठिकाणी म्हटले आहे, की आपले शरीर हे ब्रह्मांडाचे फळ आहे. परब्रह्माच्या सृष्टी निर्माण करण्याच्या संकल्पाचे देहफळ तयार होते आणि तोच संकल्प देहामध्ये पुन्हा तयार होतो. हा संकल्प म्हणजेच ब्रह्मांडाचे सत्त्व आहे. ज्यांचे देहफळ खरेच परिपक्व झालेले आहे त्यांना स्वतःला परब्रह्माच्या संकल्पाचा विशेष प्रकारे अनुभव येतो.
रामकृष्ण परमहंसांना समाधी अवस्थेमध्ये असताना आपण खोलीमध्ये वर तरंगत आहोत आणि आपला देह खाली आसनस्थ आहे असे दिसले. महर्षी रमण यांनी लहान वयातच एक प्रयोग केला. मृत्यू काय असतो हे पाहण्यासाठी त्यांनी शवासन केले आणि निश्चल पडून राहिले. मृत्यू झाला म्हणजे हातापायातील संवेदना गेलेल्या आहेत. डोळे मिटलेले आहेत आणि कानही काही ऐकत नाहीत अशी स्थिती हवी. हातापायांचे स्नायू कडक व्हायला हवेत. शरीर असे क्रियाशून्य आणि संवेदनाशून्य केले, तरी ‘मी’ आहेच, असे त्यांना जाणवले. या अनुभवानंतरच त्यांनी आपले घर सोडले व ‘मी आहेच’ हा अनुभव ज्याला येतो तो ‘मी’ कोण, याचा शोध घेण्यासाठी तपश्चर्या केली. ‘मी’ म्हणजे देह नाही, हे त्यांना पहिल्याच प्रयोगात लक्षात आले होते.
कोणी देह म्हणजे उशीचा अभ्रा व ‘मी’ म्हणजे आतली उशी असे वर्णन केले आहे. तर कोणी देह म्हणजे उशीची रिकामी खोळ व ‘मी’ म्हणजे त्या उशीला आकार देणारा आतला कापूस, असेही आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे. हे अनुभव वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वयामध्ये आलेले आहेत. त्यामुळे देहफळ परिपक्व होणे, म्हणजे शरीराची पूर्ण वाढ होणे, असा त्याचा अर्थ नसून, त्या शरीराबरोबर असलेले मन व बुद्धी परिपक्व होणे असा अर्थ आहे. ते ज्यांचे परिपक्व झाले आहेत त्यांना शरीर हे जणू रथासारखे आहे, त्या शरीरातील इंद्रिये जणू रथाच्या घोड्यांसारखी आहेत, बुद्धी म्हणजे त्या रथाचा जणू सारथी आहे व मन त्या सारथ्याच्या हातातील इंद्रियांना नियंत्रित करणारा जणू लगाम आहे हे कळते. आणि ‘मी’ त्या सारथ्याला कुठे, कधी व किती वेगाने जायचे या सूचना देणारा, त्या रथात बसलेला रथाचा जणू स्वामी आहे, हे कळते. रथातील ‘मी’ वेगळा असल्यामुळेच रथाच्या सगळ्या भागांना माझे शरीर, माझे मन, माझी बुद्धी असे आपण म्हणतो. ‘मी’ या सर्वांपेक्षा वेगळा, हे कळण्याइतके ज्याची बुद्धी परिपक्व झाली आहे, तो आपल्या शरीराकडे कसे पाहतो, हे गीतेतील पुढील श्लोकात सांगितले आहे.
गीता २.२२ : वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही ॥
गीताई २.२२ : सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन
तशी चि टाकूनि जुनी शरीरे आत्मा हि घेतो दुसरी निराळी
हा श्लोक देखील प्रबोधिनीने प्रचारात आणलेल्या अंत्येष्टीच्या पोथीत आलेला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके १९३९ , पान १३ ). उशी आणि तिचा अभ्रा याऐवजी गीतेमध्ये शरीर आणि शरीरावरचे कपडे असा दृष्टांत वापरला आहे. जुने, विरलेले किंवा फाटलेले कपडे आपण फेकून देतो. आणि नवीन चांगले कपडे घालतो. तसेच जुने, निरूपयोगी शरीर ‘मी’ टाकून दिले आहे व दुसरे नवे शरीर धारण करीन असे ‘मला’, म्हणजे आत्म्याला, वाटले पाहिजे. असे वाटणे हाच परब्रह्माच्या सृष्टी निर्माण करण्याच्या संकल्पाचा एका व्यक्तीपुरताचा भाग आहे.
स्मशानात गेलेल्या सर्व व्यक्ती हे म्हणण्याइतक्या परिपक्व झालेल्या नसतात. ‘काशीस जावे नित्य वदावे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. असे म्हणत राहिले, तर कधीतरी काशीयात्रा घडतेच. कारण पुन्हा पुन्हा म्हणून तो संकल्प मनात पक्का झालेला असतो. प्रत्यक्ष काशीयात्रा घडेपर्यंत, ती घडणारच अशी श्रद्धा मनात तयार होते. मी 1977 साली आंध्र प्रदेशातल्या वादळानंतर समुद्रलाटेत बुडालेल्या तिथल्या सुमारे अडीचशे व्यक्तींच्या मृत देहांचे दफन केले होते. त्या प्रत्येक वेळी अंत्यसंस्कार म्हणून ‘वासांसि जीर्णानि’ हा श्लोक म्हटला होता. जिवंतपणीच ‘मी’ वेगळा व ज्यात ‘मी’ राहतो तो देह वेगळा, असा रमण महर्षींसारखा अनुभव मला अजून आलेला नाही. तरी अभावितपणे या श्लोकाचा असा अनेक वेळा जप घडल्यामुळे ‘मी देह नाही, आत्मा आहे’ या विधानावर माझी श्रद्धा जडली आहे.
The post प्रबोधनाचे गीतासूत्र first appeared on ज्ञान प्रबोधिनी.