Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing latest article 7
Browse Latest Browse All 389

१५. सहयोगी कार्यकर्ता

$
0
0

कार्यकर्त्याचा चौथा गुण :

भगवदगीतेध्ये 10व्या अध्यायात दोन श्लोक आहेत :-

मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम्‌‍ ।
कथयन्तश्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०.९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌‍ ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०.१०

प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी सहयोगी (को-ऑपरेटिव्ह) असले पाहिजे असे म्हणताना हे दोन श्लोक नेहमी डोळ्यासमोर येतात. कार्यकर्ता दक्ष असला पाहिजे. उत्कट असला पाहिजे आणि नवनिर्माता असला पाहिजे हे आपण यापूर्वीच्या मासिक वृत्तांधून पाहिले. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे चौथे लक्षण हे आहे की, तो
सहयोगी असला पाहिजे.

संघटनेध्ये एकत्र काम करत असताना अनेकांबरोबर सहविचार करावा लागतो. अनेकांची मदत घ्यावी लागते. एकत्र संकल्प करावे लागतात. एकत्र अपयश पचवावे लागते. काही वेळा आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याला द्यावे लागते, तर काही वेळा न केलेल्या कामातील अपयशाचे धनी व्हावे लागते. असे काम करणारे जे असतात त्यांना परस्पर सहकार्याने काम करणे जमू लागले असे म्हणता येईल. हे जमविण्यासाठी काही वेळा एकत्र पद्ये म्हणावी लागतात. सगळ्यांनी मिळून सहलीला जावे लागते. सगळ्यांनी एकत्र बसून जेवावे लागते. एकत्र प्रवास करावा लागतो.
एकमेकांच्या कामापलीकडच्या आयुष्यात रस घ्यावा लागतो. हे सगळे करताकरता अनेकांना एकमेकांच्या सहयोगाने काम करणे जमू लागते. काहीजणांना या सगळ्याशिवायच सहयोगी बनता येते. दैनंदिन कामातील सहकार्य आणि सहयोग आवश्यक आहे; परंतु एकत्र काम करताना इतरांच्या स्वभावाशी जुळवून घेणे जमावे लागते. तक्रार न करता स्वत: बदलणे कवा शांतपणे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करीत राहणे हे जमवावे लागते. केवळ बोलण्या-चालण्याच्या पद्धतीतून कोणाच्या स्वभावाचे एकदम मूल्यमापन करायचे नाही हे शिकावे लागते. तसेच दीर्घकाळ एकत्र काम करायचे असेल, तर दर्शनी व्यक्तिमत्वाने प्रभावित न होता सहकाऱ्याचे अंतर्मन जाणून घेण्यासाठी चिकाटीने प्रयत्नही करावे लागतात. सहयोगी बनण्यासाठी हे सगळेही करायला लागेलच.

परंतु सुरुवातीला दिलेल्या दोन श्लोकांचा अर्थ आचरणात आणता आला तर आपण निश्चितच सहयोगी होऊ. या दोन श्लोकांचा अर्थ मी असा लावतो-

ज्यांच्या चित्तामध्ये ध्येयाशिवाय अन्य अन्य कोणताही विषय नाही ,ज्यांचा संपूर्ण दिनक्रम ध्येयसिद्धीसाठीच आखलेला आहे, जे परस्परांशी ध्येय अधिक स्पष्ट करून घेण्यासाठीच बोलत असतात, ज्यांना ध्येयाविषयी बोलताना नेहमीच आनंद व समाधान वाटते, असे नेहमी ध्येयाशी जोडले गेलेले आणि ज्यांच्या मनात केवळ ध्येयसाधनेचीच आवड आहे, त्यांना परस्परांच्या स्वभावातील गुण-दोष व सवयींमधील सरळपणा वा वेडेवाकडेपणा यांच्या पलिकडे जाऊन केवळ समान ध्येयामुळे व अनंत ध्येयासक्तीमुळे एकमेकांशी ध्येयसिद्धीसाठी जोडले जाण्याची
बुद्धी होते व अशा बुद्धीने एकत्र काम करून ते आपले ध्येय त्यानंतर निश्चितच गाठतात.

सहयोगी बनण्यासाठी इतके मुळापासून प्रयत्न केले, तर आधी उल्लेख केलेली पथ्ये व कार्यपद्धती पाळणे खूपच सोपे जाईल. अशा पद्धतींनी सहयोगी बनलेले कार्यकर्ते कामाच्या आवश्यकतेप्रमाणे कधी गटातील सहयोगी सदस्य असतील किंवा आवश्यकतेप्रमाणे गटातील सर्वांचे सहकार्य मिळवून गटाचे नेतृत्वही करतील. सहकारी आणि नेता या दोन्ही भूमिका सहयोगी कार्यकर्त्याला प्रसंगानुरूप बजावता आल्या पाहिजेत.

The post १५. सहयोगी कार्यकर्ता first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing latest article 7
Browse Latest Browse All 389

Trending Articles