प्रस्तावना
प्रस्तावना
भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहण्यासंबंधी आणि ध्येयनिष्ठेविषयी सूचना करणारे श्लोक होते, मग प्रत्यक्ष ध्येयाचा उच्चार व त्यासाठी नियमांचे पालन याविषयीचे श्लोक व अभंग होते. शेवटी हा सर्व आशय मराठीतील गद्य प्रार्थनेमध्ये मांडला होता. या वर्षारंभ दिन उपासनेचा शेवट गायत्री मंत्राने व्हायचा.
वर्षारंभ उपासनेची ही पोथी तयार केली तेव्हा मुख्यतः पुणे शहरातील इयत्ता ८वी ते ११वी चे विद्यार्थी ज्ञान प्रबोधिनीत शिकत होते. त्यानंतर गेल्या ५० वर्षात ज्ञान प्रबोधिनीचा विस्तार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाला आहे. विद्यार्थ्यांचा वयोगटही वेगवेगळ्या ठिकाणी वय वर्षे साडेतीन पासून वयाच्या एकवीस-बावीस वर्षापर्यंत विस्तारला आहे. शालेय वयोगटाच्या शिक्षणाबरोबरच संशोधन, ग्रामविकसन, प्रशिक्षण, आरोग्य, संघटन, समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक प्रौढ स्त्री-पुरुष सदस्यही ज्ञान प्रबोधिनीमध्ये मनुष्यघडणीचे आयुष्यभर चालणारे सहज शिक्षण घेत आहेत.
या सर्वांच्याच शिक्षणाचा पाया भारतीय अध्यात्मात असला पाहिजे अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे. १९६५ साली तयार केलेली पोथी श्रावणी या प्राचीन संस्काराचे पुनर्रचित रूप होते, ज्यांचे उपनयन झाले आहे, त्यांना आयुष्यभर विद्याध्ययन करण्याच्या व्रताचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून श्रावणी या संस्काराची योजना होती. ज्ञान प्रबोधिनीमध्ये राष्ट्रघडणीच्या ध्येयाचे वार्षिक स्मरण आणि त्या ध्येयाच्या दिशेने पुढील वर्षात काही पाऊले पुढे जाण्याचा प्रकट व मनोमन आणि वैयक्तिक व सामूहिक संकल्प करण्याचा दिवस म्हणून वर्षारंभ उपासनेची योजना केलेली असते.
विविध वयोगट आणि विविध प्रकारची कामे करणारे प्रौढ सदस्य यांच्या गरजा लक्षात घेऊन वर्षारंभ उपासनेच्या या तिसऱ्या आवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. ज्ञान प्रबोधिनीमध्ये उपनयन संस्काराची पुनर्रचित पोथी विद्याव्रत संस्कार या नावाने तयार केलेली आहे. हा विद्याव्रत संस्कार साधारणपणे इ. ८वी तील सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींसाठी करता येतो. पुनर्रचित वर्षारंभ उपासनेमध्ये विद्याव्रत संस्कार झालेल्या आणि शालेय, महाविद्यालयीन, व विद्यापीठातील शिक्षण चालू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ उपासनेची एक संहिता (पोथी) केली आहे. शाळा, महाविद्यालयांमधले शिक्षण संपलेल्या व विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रौढ सदस्यांसाठी वर्षारंभ उपासनेची स्वतंत्र संहिता (पोथी) केलेली आहे. या दोन्ही उपासनांचा शेवट गायत्री मंत्राने होतो.
विद्याव्रत संस्कार न झालेल्या इ. ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभउपासनेची तिसरी स्वतंत्र संहिता (पोथी) केली आहे. या उपासनेचा शेवट गायत्री मंत्राच्या ऐवजी “चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्” या शिवमंत्राच्या उच्चारणाने होतो.
पन्नास वर्षांपूर्वी तयार केलेल्या वर्षारंभ उपासनेच्या पोथीमध्ये प्रत्येक संस्कृत मंत्र दोन वेळा म्हटला जायचा. वर्षारंभ उपासनेच्या तीनही संहितांमध्ये सर्व मंत्र श्लोक, ओव्या किंवा अभंग एक-एकदाच घेतलेले आहेत. जुन्या संहितेपेक्षा नवीन संहितांमध्ये मराठी ओव्या किंवा श्लोक जास्त संख्येने घेतले आहेत. उपासना अधिक अर्थवाही व्हायला त्याचा उपयोग होईल असे वाटते.
ग्रामीण भागात तसेच इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी या पोथ्यांचा वापर करताना सर्व श्लोकांखाली दिलेला प्रमाण मराठी भाषेतला अर्थ कदाचित अध्वयूँना अधिक सोप्या भाषेत सांगायला लागेल. त्या वेळी त्यांनी छापील मजकूर न वाचता स्वतःच्या शब्दात अर्थ सांगण्याचे स्वातंत्र्य जरूर घ्यावे. तथापि, थोडा सराव करून घेतला तर ग्रामीण भागातील मुलेही संस्कृत मंत्र म्हणू शकतात असा अनुभव आहे. त्यामुळे संस्कृत मंत्रात शक्यतो बदल करू नये.
प्रौढ सदस्यांसाठी केलेल्या पोथीमध्ये दिलेली गद्य प्रार्थना प्रबोधिनीच्या कोणत्याही विभागात काम करणाऱ्या सदस्यांना म्हणता येईल अशा समावेशक आशयाची आहे. त्याशिवाय विभागानुसार त्यांना उचित अशा आशयाची एखाद्या परिच्छेदाची भर त्या त्या विभागाने घालण्यास हरकत नाही. प्रबोधिनीशिवाय अन्य एखाद्या संस्था-संघटनेमध्येही गद्य प्रार्थनेत किरकोळ बदल करून वर्षारंभाची ही पोथी वापरता येईल. कोणत्याही संघटनेमध्ये ही पोथी वापरून त्यांनी आपल्या ध्येयाचे वार्षिक स्मरण केल्यास ते भारतीय परंपरेला अनुसरून होईल. सर्वच सामाजिक व सार्वजनिक कामे या पोथीतल्या चिंतनानुसार आध्यात्मिक पायावर दृढ होत गेली तर राष्ट्रघडणीला अनुकूल असे बदल सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेत होऊ शकतील असा विश्वास वाटतो.
गिरीश श्री. बापट
******************************************************************************************************
प्रस्तावना (पहिली आवृत्ती)
वेद नि ऋषी यांची श्रीमंत परंपरा आपल्याला लाभली आहे. सहज प्रतीत होणाऱ्या द्वैताच्या पलीकडच्या अद्वैताचे दर्शन घ्यावे ही आमच्या तत्त्वज्ञानाची सांगी आहे. ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्मविद्या नि भौतिकविद्या यांचा समतोल राखणे नि अभ्युदय-निःश्रेयसाची चरमसीमा गाठणे हा व्यक्तिजीवनाचा परमोच्च बिंदु आहे. उन्नत व्यक्तिजीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील द्वैत पुसले जाऊन तेथे समभाव निर्माण व्हावा हे आम्हाला साध्य करावयाचे आहे. त्यासाठी शिक्षण ! स्वामी विवेकानंद म्हणत असत, “Education is the manifestation of perfection already in man, and religion is the manifestation of Divinity already in man.” “शिक्षण म्हणजे काय? मानवात मुळातच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटन करणे म्हणजे शिक्षण; आणि धर्म म्हणजे काय? तर मानवात मुळातच असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे प्रकटन करणे म्हणजे धर्म !”
निराळ्या शब्दात आमचे ध्येय ‘धर्मसंस्थापना’ करणे हे आहे. स्वतःच्या हृदयातील देव जागृत करणे आणि त्याबरोबर इतर बांधवांच्या हृदयातील परमेश्वर जागृत करणे याचे नाव ‘धर्मसंस्थापना !’ ही धर्मसंस्थापना करणे हे आमचे परंपरागत राष्ट्रीय ध्येय आहे.
या दृष्टीने विद्योपासनेला तपस्येचे पावित्र्य यावे, विद्यारम्भास सुसंस्कारांचे सामर्थ्य यावे, विद्यार्थ्याला नचिकेत्याची निष्ठा प्राप्त व्हावी नि विद्यादान करणाऱ्याला वेदव्यासांची विशाल दृष्टी लाभावी आणि यातून व्यक्ती, समष्टी आणि परमेष्टी यांचे अद्वैत प्रत्ययास यावे यासाठी ज्ञान प्रबोधिनीत वर्षारम्भाच्या अथवा श्रावणीच्या परंपरेचा स्वीकार करण्यात आला आहे.
**********************************************************************************************************
वर्षारंभ उपासना
(विद्याव्रत संस्कारापूर्वी)
अध्वर्यू – हरिः ॐ
उपासक – हरिः ॐ
अध्वर्यू – ॐ
उपासक – ॐ
अध्वर्यु – ॐ
उपासक – ॐ
अध्वर्यू – आज वर्षारंभ समारंभ आहे. विद्येची देवता जी सरस्वती तिच्या चिंतनाने आरंभ करू या.
अध्वर्यू आणि उपासक
या कुन्देन्दु-तुषार-हार-धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा ।।
अध्वर्यू – कुन्दफुले, हिमकणिका, चंद्रमा आणि मोत्यांच्या माळांप्रमाणे जिची कांती शुभ्र-सतेज आहे, जी शुभ्र वस्त्र ल्यायली आहे, जिच्या हातात सुंदर वीणा आहे, ब्रह्मा-विष्णू-महेश इत्यादी देवता जिला सदैव वंदन करतात, जी बुद्धीचा मळ समूळ धुवून टाकते त्या शारदादेवीला सरस्वतीला वंदन करूया.
देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपण तिची प्रार्थना केली. अधिकाधिक ज्ञान मिळवणे हेच विद्यार्थ्यांचे ध्येय असते. असे ध्येय असलेल्यांसाठी उपनिषदांनी श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा मार्ग सांगितला आहे.
अध्वर्यू आणि उपासक
उत्तिष्ठत । जाग्रत प्राप्य वरान् निबोधत ।
(कठोपनिषद १.३.१४)
अध्वर्यू – उठा, जागे व्हा, आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात राहून ज्ञानप्राप्ती करा. ज्ञान प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे गुरूंकडे जाणे होय. वेदांपासून चालत आलेली ही ज्ञानगंगा हीच साक्षात आपली गुरू आहे. त्या गुरुदेवतेचे अंश म्हणून आपणास ज्ञानी करणाऱ्या लौकिक गुरूंचा आदर आपण करूया.
अध्वर्यू आणि उपासक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
(गुरुगीता ५२)
अध्वर्यू – आपले गुरू ब्रह्मदेवासारखे आहेत. गुरू हेच विष्णु, गुरू हेच महेश, फार काय गुरू म्हणजेच साक्षात परब्रह्म आहेत. आणि म्हणून या गुरूंना वंदन करूया.
कोणतेही काम करायचे झाले तर ते ज्ञानपूर्वक केले तरच उत्तम होते. गुरूंकडून आपण ज्ञानही घेतो आणि त्यांच्याबद्दल मनात आदरभावही असतो. काम करताना आपल्या मनात ते काम योग्य आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच अशी श्रद्धा हवी तसेच अचूक कृतीही हवी.
अध्वर्यू आणि उपासक
यथासांग कर्मे करिती। परी भाव धरुनी चित्ती ।
आगळी काही असे महती । ज्ञानसंयुक्त कृत्यांची ।।
(उपनिषदर्य-कौमुदी, छांदोग्य १.१२६)
ज्ञानामुळे साधे प्रगती । ज्ञानेच होते उन्नती।
ज्ञानामुळे फलद होती । कर्मे योग्यरीतीने ।।
(उपनिषदर्थ-कौमुदी, छांदोग्य १.१३५)
म्हणून कर्ममार्गातही । ज्ञानभक्ती उपेलू नाही ।
प्रकाश नसता गोंधळे पाही। कोणतीही हालचाल ।।
(उपनिषदर्थ-कौमुदी, छांदोग्य १.१३६
अध्वर्यू – आपण गुरूंकडून ज्ञान घेतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि आंतरजालावरूनही (इंटरनेट) माहिती मिळवतो. एवढ्यानेच सगळे ज्ञान मिळत नाही.
अध्वर्यू आणि उपासक
कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ।। धृ. ।।
प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ।।
(धूर्तकळा = धोरणी सावधपणा)
हीतकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम ।।
अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ।।
(अंतरपारखी इतरांचे मन जाणणे)
संगीत गायन दे रे राम। आलाप गोडी दे रे राम ।।
(आलापगोडी ध्यान समाधीची गोडी)
प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ।।
(प्रबंध सरळी अर्थपूर्ण सुसंगत लेखन)
सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ।।
दास म्हणे रे सद्गुण-धाम । उत्तमगुण मज दे रे राम ।।
(समर्थ रामदासांची स्फुट रचना)
अध्वर्यू – समर्थांनी रामाकडे प्रार्थना करताना त्याला सद्गुणांचे धाम म्हणजेच निवासस्थान म्हणलेले आहे. सद्गुण म्हणजेच उत्तम गुण, सद्गुणांचे स्मरण केल्यानंतर सत्यता, साधुता आणि सुंदरता हे तीन गुण आपल्या कामात येतात असे भगवद्गीतेत सांगितले आहे.
अध्वर्यू आणि उपासक
सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः पार्थ युज्यते ।। (गीता १७.२६)
सत्-कार-स्मरणें लाने सत्यता आणि साधुता ।
तशी सुंदरता कर्मी सत्-कारें बोलिली असे ।। (गीताई १७.२६)
अध्वर्यू – देवी सरस्वतीचे, गुरूंचे, उपनिषदांचे, भगवद्गीतेचे आणि संतांचे स्मरण केल्यानंतर, आपल्या मनातील इच्छा आपण गद्यामध्ये देवाला सांगूयात.
अध्वर्यू आणि उपाप्तक
राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची।i
खरोखर राष्ट्रहितार्थ जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरून आम्ही एकत्र जमत आहोत. हे परमात्मन्, तू याचा साक्षी हो !
आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही उत्तम अभ्यास करू.
उत्तम वाचन करू; उत्तम चिंतन करू;
खूप खेळ खेळू, शरीर सुदृढ करू, काटक करू; बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सर्व प्रकारे आम्ही कार्यक्षम होऊ.
सर्वमांगल्यकारक परमेश्वरा! आमच्या जीवनात परमोच्च यश आम्ही मिळवू असे होऊ दे. आम्ही ज्या क्षेत्रात काम करू,
तेथे आम्ही मुळापासून सुधारणा करणारे आणि समाजाला उत्तम लाभ देणारे असे काम संघटित होऊन करू.
अध्वर्यू – आता आपण शिवमंत्र म्हणून उपासनेचा शेवट करूया.
अध्वर्यू आणि उपासक
चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। चिदानंदरूपी शिव मी शिव मी ।
(आलटून पालटून संस्कृत व मराठी मंत्र प्रत्येकी पाच वेळा)
शिवोऽहं शिवोऽहम्। शिव मी शिव मी ।
(आलटून पालटून संस्कृत व मराठी मंत्र प्रत्येकी तीन वेळा)
अध्वर्यू : – यानंतर ‘नमस्ते एक’ म्हटल्यावर सर्वांनी हात जोडावेत. ‘दोन’ म्हटल्यावर मान खाली वाकवावी. ‘तीन’ म्हटल्यावर हात खाली सोडून समोर बघावे.
नमस्ते एक, दोन, तीन.
अध्वर्यू यानंतर पाच मिनिटांची मोकळीक आहे. सर्वांनी जागच्या जागी पाय मोकळे करावेत. नंतर सभेचा कार्यक्रम होईल.
The post वर्षारंभ उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी first appeared on ज्ञान प्रबोधिनी.