प्रस्तावना
वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ तुरळक स्वरूपात अजूनही कुठे-कुठे चालू असतो. उत्सर्जन किंवा वर्षान्त हा संस्कार मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बंद पडला होता. आधुनिक काळातील शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाशी आणि सांगतेशी अनुक्रमे वर्षारम्भआणि वर्षान्ताची सांगड ज्ञान प्रबोधिनीने घातली आहे.
पूर्वीच्या काळी वेदाध्ययन सुरू करताना श्रावणी संस्कार होत असे, तर वेदाध्ययन तात्पुरते थांबवून, इतर विद्या शिकणे आणि वापरणे याला सुरुवात करायची म्हणून, उत्सर्जन संस्कार होत असे. आधुनिक काळात नवीन शैक्षणिक वर्षात नवीन विषय शिकण्याचे, नवीन कौशल्य शिकण्याचे आणि नवीन अभ्यासक्रम शिकण्याचे संकल्प वर्षारम्भदिनी करावे अशी पद्धत ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरू केली आहे. इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा विद्याव्रत संस्कार होतो. वर्षारम्भदिनाची उपासना विद्याव्रताचे स्मरण करण्यासाठी आहे. विद्याव्रत संस्कार होईपर्यंत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तो केवळ संकल्पदिन आहे. औपचारिक शिक्षण पूर्ण झालेल्यांसाठी वर्षारम्भदिन हा नवीन कार्यसंकल्प करण्यासाठी आहे आणि नव्या कामांसाठी आवश्यक ते नवे ज्ञान व कौशल्ये शिकण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
वर्षान्तदिन हा वर्षारम्भी केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्यासाठी आहे. शिकलेले ज्ञान व कौशल्ये व्यवहाराच्या कसोटीवर नेहमीच तपासून घ्यावे लागतात. वर्षान्त ते पुढचा वर्षारम्भ या मधल्या काळामध्ये विविध कामांमध्ये आपले ज्ञान व कौशल्य वापरण्याच्या योजना करायच्या असतात. तसेच कोणत्याही अभ्यासक्रमात बसवता येत नाही असे अनुभवशिक्षण वर्षान्त ते पुढील वर्षारम्भ या दरम्यानच्या काळात घ्यायचे असते. ज्ञानार्जन आणि ज्ञानाचे उपयोजन अशा दोन्ही पद्धतींनी शिकतच व्यक्तिमत्त्व विकसन होत असते. वर्षारम्भदिनाच्या उपासनेपेक्षा वर्षान्तदिनाच्या उपासनेत वेगळे श्लोक किंवा मंत्र असले तरी गद्यातील प्रार्थना दोन्ही दिवशी एकच ठेवलेली आहे. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ या सूत्राकडे ही गद्यातील प्रार्थना लक्ष वेधते.
सुमारे पन्नास वर्षे एकाच संहितेचा वापर केल्यानंतर कालानुरूप बदल करून वर्षान्तदिनाच्या उपासनेची नवी संहिता या पोथीमध्ये प्रकाशित केली आहे. वयोगटानुसार गद्य व पद्य भागाची वेगवेगळी मांडणी हे या नव्या संहितेचे वैशिष्ट्य आहे.
गिरीश श्री. बापट
संचालक
***************************************************************************************************************
वर्षान्तदिन उपासना
(विद्याव्रत संस्कार होण्यापूर्वी)
सूत्रचालक : हरिः ॐ
उपासक : हरिः ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : आज वर्षान्तदिन समारंभ आहे. विद्येची देवता जी सरस्वती तिच्या चिंतनाने उपासनेला आरंभ करूया.
सूत्रचालक आणि पाठोपाठ उपासक :
या कुन्देन्दु-तुषार-हार-धवला या शुभ्रवस्त्रावृता या
वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा ।।
सूत्रचालक : कुंदाची फुले, पौर्णिमेचा चंद्र, बर्फाचे स्फटिक आणि मोत्यांची माळ
जशी पांढरी शुभ्र आणि तेजस्वी असतात, तशी जिची कांती तेजस्वी आहे; जिने पांढरीशुभ्र वस्त्रे नेसली आहेत; जिच्या हातात उत्कृष्ट वीणादंड शोभून दिसत आहे; जी पांढऱ्या शुभ्र कमळाच्या आसनावर बसली आहे; जिला ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादि देवता नित्य वंदन करतात; ती बुद्धीचा मंदपणा दूर करणारी, भगवती, देवी सरस्वती, माझे रक्षण करो. देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपण तिला प्रार्थना केली, अधिकाधिक ज्ञान मिळवणे हेच विद्यार्थ्यांचे ध्येय असते. आपण वर्षभर विविध गुरूंकडून वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान घेतले. शाळेचे नवीन वर्ष सुरू होईपर्यंत आपल्याला स्वतः प्रयत्न करतच आपले शिक्षण चालू ठेवायचे आहे. सुट्टीमध्ये आपण अनेक शिबिरांना जातो, छंदवर्गांना जातो, घरच्यांबरोबर फिरायला जातो, नातेवाईकांकडे जातो. या सगळ्या कार्यक्रमांमधून वर्षभर अभ्यास करून आलेला कंटाळा जातो. नवीन कामासाठी आपण उत्साह मिळवतो. पण केवळ खूप आणि वेगवेगळे कार्यक्रम केले म्हणजे उत्साह मिळतो असे नाही. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितले आहे,
सूत्रचालक आणि पाठोपाठ उपासक :
बहु हिंडता सौख्य होणार नाही। शिणावे परि नातुडे हीत काही ।।
विचारे बरे अंतरा बोधवीजे। मना सजना राघवी वस्ती कीजे ।।
(मनाचे श्लोक ४१)
सूत्रचालक : या श्लोकात म्हटल्याप्रमाणे राघवासारखे म्हणजे श्रीरामचंद्रांप्रमाणे उत्तम व्यक्तिमत्त्व मिळवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यासाठी श्रीरामचंद्रांसारखे उत्तम व्यक्तिमत्त्व ज्यामुळे मिळेल, असेच कार्यक्रम आपण सुट्टीतही केले पाहिजेत. भारंभार कार्यक्रम करून आपोआप व्यक्तिमत्त्व विकसन होते असे नाही. अशा कार्यक्रमांचाही शीण म्हणजे कंटाळाच येऊ शकतो. त्यामुळे आपला मोकळा वेळ कसा वापरायचा हे विचारपूर्वक ठरवून त्याप्रमाणेच आपल्या मनाला वागायला शिकवले पाहिजे. आपला वेळ वापरण्यासंबंधीच समर्थ रामदासांनी पुढे म्हटले आहे
सूत्रचालक आणि पाठोपाठ उपासक :
मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवा हानि केली।।
रघुनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ।।
(मनाचे श्लोक ४६)
The post वर्षांत उपासना – इयत्ता सहावी ते आठवी विद्याव्रतापूर्वी first appeared on ज्ञान प्रबोधिनी.