स्वयंरोजगार करून किंवा बचत गटातून बाईच्या हातात पैसा का यायला पाहिजे तर जर ‘ती’ने मिळवलेला पैसा असेल तरच ‘ती’ला तो पैसा ‘ती’चा वाटतो. नाहीतर एरवी ‘ती’च्या आरोग्यासाठी केलेला खर्च ‘ती’च्यासाठी जरी गरजेचा असला तरी तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने वायफळ वाटतो. ‘ती’ कमावती झाली तर स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करणे, स्वतःकडे लक्ष देणे ‘ती’ला परवडते!
भारतातल्या गावागावात ‘आशा’ आरोग्य सेविकांची नेमणूक होण्यापूर्वी जो पथदर्शी प्रकल्प निवडक ठिकाणी झाला त्यात ज्ञान प्रबोधिनी होती, तेव्हा आपण वेल्हे तालुक्यातील पासली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात आरोग्य सेवेची योजना, स्थानिक ग्रामीण महिलांच्या मदतीने राबवली होती व गावपातळीवर आरोग्य सेविकेची परिणामकारकता दाखवून दिली होती.
१९९६ पासून वेलहयातील महिलांसाठी सातत्याने केलेल्या आरोग्य कामाचा परिणाम असा होता की ‘मागच्याचे ऱ्हाऊद्या म्होरचे सुधारा!’ या न्यायाने पुढची पिढी आरोग्याबद्दल जास्त जागरूक झालेली दिसते आहे. या ‘आरोग्य’ विषयाच्या भांडवलावर २०१९ पासून आपण बजाजच्या CSRअर्थसहाय्यामुळे ५० गावासाठी आरोग्य जागृती करणारा ‘आरोग्य सखी’ असा प्रकल्प केला. वर्षभरात जाणीव जागृती व डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करून तालुका पिंजून काढला. त्यातच करोना आला आपले नेटवर्क गावोगावी तयार असल्याने करोना काळात किती महत्वाचे काम करू शकलो त्याबद्दल आधी लिहिलेच आहे. ही गावागावात आरोग्याची जी रचना उभी राहिली ती ‘आरोग्य सखी’या प्रकल्पामुळे! पहिल्या वर्षीचा नियोजनाप्रमाणे काम केल्याचा चांगला परिणाम पाहून पुढील वर्षी बजाजने ५० गावांऐवजी ८० गावात काम करायचा प्रस्ताव मंजूर केला. गावागावात ‘आशा’ आरोग्य कार्यकर्ती शिवाय प्रशिक्षण देऊन अशी एक-एक कार्यकर्ती उभी राहिली जी स्थानिक भाषेत, स्थानिक संदर्भासह बोलेल! हिला आपण ‘आरोग्य सखी’ म्हणायचे ठरवले.
ही ‘आरोग्य सखी’ गावात जाऊन प्रकल्पात जाणीव जागृती करण्यासाठी कशाकशावर बोलत होती तर नव मातांसोबत आपले बाळ सुधृढ होण्यासाठी बाळाला सकस आहार काय द्यावा यावर बोलत होती, किशोरींसोबत मासिक पाळीचे चक्र समजावून देउन अगदी सॅनिटरी पॅड कसे वापरून त्याची विल्हेवाट कशी लावायची या नाजूक विषयावर बोलत होती. गृहीणींसोबत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जंत संसर्गाची माहिती देउन जंत निर्मूलन करायची गोळी सगळ्यांनी जाणीव जागृती सत्रातच एकत्र घेतली जाईल असे पहात होती तर व्यसन म्हणून तंबाखू खाणाऱ्यांशी त्याचे गंभीर परिणाम सांगून सावध करत होती अगदी महिलांनी मेशरी मुक्त होण्यासाठी आवाहन करत होती. लहान मुलांसाठी ‘चांगला-वाईट स्पर्श’ यावर गोष्ट सांगून माहिती देत होती तर गावातल्या सगळ्यात दुर्लक्षित घटक असणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी ‘रजोनिवृत्ती नंतर घ्यायची काळजी’ काय असते हे सांगताना त्रास होत असेल तर डॉक्टर कधी येणार आहेत ते सांगून फुकट काम होईल असेही सांगत होती! गावातल्या महिलांवर येणारे मानसिक ताण कुठले यावर चर्चा घेउन उपचाराचे गरज कोणाला आहे का याचा अंदाज घेत होती. जाणीव जागृतीच्या या सत्रात जे विषय हाताळले जात होते ते सगळे विषय असे होते की जे एरवी कधीही बोलले जात नाहीत पण महत्वाचे आहेत!
या संवादात लक्षात असे आले की यासाठी फक्त आरोग्य विषयी माहिती देवाण-घेवाण पुरेशी नव्हती तर बोलणारी वरचा विश्वास महत्वाचा होता. ८० गावात काम करणाऱ्या सगळ्या मिळून आम्ही ६३ जणी होतो, यापैकी ४०-४५ जणी तरी असे आरोग्यकाम प्रथमच करत होत्या तरी कुठेही बिघडले नाही कारण त्या त्याच परिसरात रहात होत्या. आरोग्य जागृतीची माहिती ५-७ जणींच्या किंवा मुलांच्या गटात खाजगी बोलल्यासारखी बोलल्यामुळे नेमके बोलता येत होते. छोट्या गटामुळे मोकळेपणाने शंका सुद्धा विचारल्या जात होत्या. अगदी, ‘त्रास होतोय पण गावात नको दुसऱ्या गावात तपासणी असेल तर सांग… उगाच गावात बोभाटा नको!’ असे सुरक्षित संवादही व्हायचे. या मोकळ्या संवादातून काही रुग्ण लक्षात यायचे जे पूढे डॉक्टरांच्या तपासणीला यायचे. डॉक्टर आणि उपचार जरी काही पैसे न देता होणार असले तरी विश्वास किती महत्वाचा हे या प्रकल्पातून शिकायला मिळाले.
आरोग्य विषयी सगळे सांगू शकणारी, सहज बोलता येईल अशी (resourceful) ताई गावात असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत धरून आपण पहिल्या वर्षी २५८ प्रशिक्षणातून ६४५६ लोकांपर्यंत पोचलो तर दुसऱ्या वर्षी गावे व मनुष्यबळ वाढल्यामुळे २४३४ प्रशिक्षणे/ तपासणीतून २१०७१ जणांपर्यंत पोचलो. एकूण २७,५२७ अशा विक्रमी संख्येपर्यंत पोचलो. यात अनेकांनी एका पेक्षा जास्त उपचार घेतल्याची गाव-वय अशी १२००० पेक्षा जास्त जणांची नोंद आहे!
या आरोग्य जाणीव जागृती सोबत केलेल्या तपासणींमुळे तालुक्यातला पहिला दातांचा दवाखाना मार्गी लागला. ‘दात दुखला तर painkiller खायची’ या सवयीतून दवाखान्यात जायची सवय लावणे सोपे नव्हते, अनेकांना तर दाताचा वेगळा दवाखाना असतो हे सुद्धा यामुळे प्रथमच कळले. माता-पालिकांच्या मागणीमुळे बालआरोग्य तपासणी गावोगावी जाऊन नियमित करणे शक्य झाले ज्याचा परिणाम शासनाचा लहान मुलांच्या लसिकरणाचा प्रतिसाद वाढण्यात झाला. ‘लसीकरण या शासनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग’ असे नसून ‘आपल्या बाळाची शासन काळजी घेते म्हणून हजर राहायचे’ असे माता पालिका शिकल्या. प्रश्न असला तरी यौनीमुखाच्या कर्करोगा बद्दल आतून तपासणीला तयार होणे फारच अवघड होते. आधी मनाची तयारी करून तपासणी करायला टप्प्याटप्यात गावोगावच्या शेकडो महिला आल्या. अनेकींनी उपचारासाठी आवश्यक ती ऑपरेशनस दीनानाथ रुग्णालयातून करून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा अजून एक प्रश्न म्हणजे मोतीबिंदू! त्याचे रुग्ण शोधून त्यांना दवाखान्या पर्यंत नेउन ऑपरेशन करून परत गावात सोडायची सोय प्रकल्पात केली होती तरी धिटाईने गाडीत बसणारे ‘आज्जी / आजोबा’ तयार करणे सोपे काम नव्हते …. ‘माझे मेलीचे असे आता किती दिवस राहिले?’ या प्रश्ना पलीकडे जिला जिला नेउन तिच्यावर उपचार करून घेतले त्या प्रत्येकीची जीवन गुणवत्ता सुधारली होती. अनेकींची आयुष्य आरोग्य सखी प्रकल्पामुळे सुखकर झाली, काहींची आयुष्य काही वर्षाने का होईना नक्कीच वाढली, जगण्याला हुरूप आला!
जागतिक पातळीवर HDI (human development index) मध्ये ‘मागास’ असणाऱ्या भारत देशाला पुढे न्यायचे तर ज्या ज्या घटकामुळे ‘बाई’ची आयुर्मर्यादा कमी होते त्या त्या घटकावर काम करायला हवे होते आजही हवे आहे. गावातील आरोग्य सखींनी प्रकल्पात ते काम कसे करायचे हे शिकले आणि आजही त्या ते काम वसा घेतल्या सारखे करत आहेत याचा अतिशय आनंद वाटतो.
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६
The post मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी! first appeared on ज्ञान प्रबोधिनी.