Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 85

मागे वळून बघताना –२३ भावविश्व विस्तारताना!

$
0
0

आपल्या कामात महिलेचे भावविश्व विस्तारण्यासाठी ‘अनुभव सहलीं’चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट शब्दामध्ये समजावून देण्यात येणाऱ्या मर्यादा, डोळ्याने पाहिले की नाहीशा होतात या अनुभवासाठी सहल हा जणू एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. वयाने मोठे झाल्यावर एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करायची तर ती गोष्ट शिकणे रंजकही असावे लागते. अनुभव सहली अशी शिक्षण संधी देतात. 

ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागात लहान वयोगटातील सहाध्याय दिन हा उपक्रम अशाच प्रकारे चालतो त्यावरून कल्पना घेऊन ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आपण अनुभव सहली काढल्या, अभ्यास दौरे काढले. आधी कार्यकर्त्या शहाण्या झाल्या पाहिजेत म्हणून त्यांचे अभ्यास दौरे काढले आपल्या सारखे काम अजून कुठली संस्था करते ही बघणे हा सुद्धा प्रशिक्षणाचाच भाग होता. उदाहरण द्यायचे तर श्रावण महिन्यात भीमाशंकरला भोळेनाथ दर्शनाची सहल काढली की सोबत त्याभागात काम करणाऱ्या चैतन्य संस्थेच्या एखाद्या बचत गटाला भेट द्यायची असे आवर्जून वेळापत्रकात घातलेले असायचे.  

बचत गटातील महिलांनी फक्त महिला-महिलांच्या सहली काढल्या कारण घरातल्या बजेटमध्ये महिलेला घराबाहेर पडण्यासाठी कधी पैसे नसतात. सुरुवातीला फक्त ‘एकट्या’ महिलांच्या सहली काढणे इतके अशक्य वाटत होते की महिलांनी सहलेला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रकल्पातून निधी उभा करायला लागत होता. वेगवेगळ्या सहलींना नेल्यानंतर सामाजिक काम बघत असताना लक्षात आले की किमान फिरणे सुद्धा झाले नसल्यामुळे एकदम सामाजिक काम बघण्याची मनोभूमिका तयार होत नाही  त्यामुळे आधी देवदर्शनासारख्या त्यांच्या आवडीच्या ठिकाणी सहली काढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्पातून खर्च उभा करण्याऐवजी त्यांनीच स्वतः खर्च केला पाहिजे पण जोपर्यंत फिरल्याने ‘नवीन बघायला मिळतं’, यांची गोडी लागत नाही तोपर्यंत तरी मदत करावीच लागते. असा अगदी या वर्षाचा सुद्धा अनुभव आहे या अनुभवाचा विचार करून लक्षात आले की देवदर्शनाच्या सहली काढल्या तर मात्र त्यासाठी घरातून रक्कम मिळते किंवा दोन-चार रुपये बाजूला टाकून गुपचूप सहली इतके पैसे ‘ती’ आवडीने जमा करते. कधी कर्ज घेऊन सहल करते मग हप्त्याहप्त्यात फेडते. अशा खूप सहली गेल्या की ज्या सहलीचा पूर्ण खर्च बचत गटाने केला म्हणजे सभासदाच्या व्याजातून.. उद्या मिळणाऱ्या व्याजाची रक्कम आजच सहलीसाठी खर्च केली तरी हरकत नाही असा निर्णय घ्यायला गटामुळे महिला शिकल्या. आता दरवर्षी अशा हौसेच्या किमान दहा-पंधरा सहली तरी सहज निघतात. आता सहली इतक्या अंगवळणी पडल्या की भागातले वाहनचालक सुद्धा तयार झाले. १-२ दिवसात जाऊन येण्याच्या सहलींचे पॅकेज ते गावातल्या महिलांसोबत बोलू लागले. शंभर टक्के महिला सहभागी आहेत अशा सहलींचे आयोजन अनुभवाच्या आधारावर ते सुद्धा करू शकले.  

आपले काम शिवप्रदेशात राजगड तोरणा पुरंदर या किल्ल्यांच्या परिसरात चालते तरी महिला कधी गडावर गेल्या नव्हत्या. लाकूड फाटा आणायला आणायला गडावर जाणे वेगळे आणि तोरण गड म्हणजेच प्रचंडगडाचा इतिहास ऐकत गडावर जाणे वेगळे यातला फरक त्यांनी सहलीमुळे अनुभवला. अशा स्थानिक ठिकाणांच्या सहली पासून पराराज्यातील सहली सुद्धा अनुभवल्या! गावाबाहेरच्या कार्यकर्तीने गावात जाऊन सहलीसाठी महिलांना तयार करणे वेगळे. गावातल्याच एखाद्या गट प्रमुख महिलेने आग्रहाने, हौसेने कधीच घराबाहेर पडलेली नाही अशा ‘ती’ला घराबाहेर पडण्याचा अनुभव देण्यासाठी सहल काढणे वेगळे. 

सहलीसाठी एका दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणे अशी जेजुरी, भीमाशंकरची देवदर्शनाची सहल काढण्यापासून सुरुवात होते ते थेट बालाजी दर्शनाची ६ दिवसाची सहल! सहलीत विविधता असते जेव्हा हंडाभर पाण्यासाठी २-४ तास वणवण करणाऱ्या महिला मुंबईला राज्याची राजधानी बघताना, अथांग समुद्राचे दर्शन घेतात तेव्हा सहलीहून परतल्यावरही अनेक दिवस समुद्राचे दृश्य डोळ्यांसामोरून हालतच नाही असे सांगतात .. हा अनुभवच घ्यावा लागतो. तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जाणे हा एक वेगळाच अनुभव कारण या सहली मधला ३ दिवसाचा काळ ‘आउट ऑफ रेंज’ असायचा. गेल्या २५ वर्षात बालाजी दर्शनाच्या अशा १८ सहली काढल्या ज्यात किमान ६०० जणी स्वखर्चाने केल्या. ६ दिवस ५ रात्रीच्या या सहलीला स्वतःची परवानगी काढणे हेच मोठे आव्हान असते अशी शिकवण या सहलींनी दिली. एका पुढाऱ्याने आर्थिक मदत केल्यामुळे ३७ गावातल्या ८०० महिला एकाच दिवशी १६ गाड्यांमधून एकाच वेळी जेव्हा कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनाला गेल्या तेव्हा सर्व आर्थिक, सामाजिक सीमांचे भान कसे विरघळून गेले असे सहभागी महिलांनी अनुभवले, तेव्हा करता गट सहलींचे विक्रमही सहज करू शकतो असा विश्वास आला. 

२००९ पासून आपल्या प्रयत्नांने प्रकल्पातून निधी उभा करून वेगवेगळ्या गावातील महिलांच्या ३१ ठिकाणी ४२ सहली काढल्या ज्यात १७३६ जणी सहभागी झाल्या, प्रकल्पासाठी यांची नोंद केली आहे. कधी पावस पाहिले तर कधी कोल्हापूर, कधी तुळजापूर तर कधी पंढरपूर सगळी ठिकाणे आली. यातली प्रत्येक सहल ‘पहिली’ होती! समुद्र बघायला कोकणात गेले तर मुंबईपेक्षा खर्च कमी होतो, देवस्थानच्या निवासात राहिले तर निवास खर्च कमी होतो, अनेकदा प्रसादाच्या वेळेत पोचले तर जेवणाचीही सोय होते. बघण्याचा अनुभव तोच असला तरी खर्चाच्या या छटांच्या माहितीची देवाण घेवाण होत होती. एकदा प्रमुखाने बघितले की जायचे कुठे, तिथे काय बघायचे आणि सहलीच्या ठिकाणचे संपर्क मिळाले की मग या सहलीला आलेल्या प्रमुखांनी पुढच्या गावपातळीच्या सहली काढायच्या, असे नियोजन होते. सहलीतले अनुभव म्हणजे अगदी पोटभर खरेदी करणे असेल किंवा प्रेक्षणीय ठिकाणी ‘ती’चा काढलेला फोटो असेल, अशातून आयुष्याच्या सुखद आठवणी तयार करायच्या हा छुपा हेतू तर होताच. असे सगळे केले ते केवळ बचत गटाने दिलेल्या विश्वासाने, गटाच्या ताकदीमुळे! जेव्हा असे सहज करता येते तेव्हा संघटनेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरजच भासत नाही. मग याच संघटनेचा उपयोग घरातील महिलेचा सन्मान वाढण्यात होतो. 

बचत गटाचे काम सुरू केले तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या अनेक महिला होत्या पण जशी बचत गटाच्या संघटनेची ताकद लक्षात यायला लागली, महिलांचे अनुभव विश्व समृद्ध व्हायला लागले तसतसा या परिस्थितीत विधायक फरक पडायला लागला. जग बघितल्यावर विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. ‘पूर्वी माझ्या बाबतीतही सांगू नये असे काही घडत होते पण तसे घडणारच असे वाटायचे!’ पण  परिस्थिती बदलल्यावर पूर्वीची परिस्थिती मोकळेपणाने मान्य करायला लागल्या. मनातून एखादी गोष्ट पटत नसली तरीही अगतिकतेमुळे ती स्वीकारावी लागते असा अनुभव पदोपदी यायचा. घरातून ‘बाहेर’ पडल्यानंतर नवीन गावं बघताना नव्याने खूप काही कळतंच कळतं पण त्याच बरोबर कळतं ते, ‘माझ्या वाचून घर चालू शकतं!’ हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. स्वयंपाक घरात अडकून पडलेल्या बाईला हे शब्दाने पटवून देणं केवळ अशक्य असते!  अशा सहलीत आपण कोणाशी बोलतोय हे बघायला सुद्धा कोणी जवळपास नाही असा स्वातंत्र्याचा अनुभवही खूप काही शिकवून जातो. गप्पागप्पात समजते की ‘माझ्यासारखीच परिस्थिती इतरांच्याही घरात असते!’ याची समज वाढली की आयुष्याचा एकटेपणा जातो. त्यामुळे सुखद आठवणी सोबत सहलीतून मिळतात त्या जिवाभावाच्या मैत्रिणी! एरवी जसे ‘सहल’ म्हंटले की ‘मज्जा करायला बाहेर जाणे’ अशी जणू व्याख्याच बनली आहे, पण ग्रामीण महिलांच्या सहली जरा वेगळ्याच .. या सहली महिलांची समज वाढवायला, दृष्टी व्यापक करायला उपयोगी पडणाऱ्या असतात हे नक्की! 

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

The post मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना! first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 85

Trending Articles