Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 85

प्रबोधनाचे गीतासूत्र

$
0
0

२०.बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी

मागच्या श्लोकामध्ये धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वर जो अवतार घेतो तो आपल्या सगळ्यांमधूनच घेतो, असे म्हटले होते. आपल्यामधून परमेश्वरी शक्ती प्रकट होत आहे अशी सुरुवातीला श्रद्धाच ठेवावी लागते. आपण जशी श्रद्धा ठेवतो, तसे आपण बनतो. त्या श्रद्धेचे प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होण्यासाठी आपली बुद्धी स्वच्छ करावी लागते. विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये कंदिलाच्या काचेचा दृष्टांत दिला आहे. कंदिलातील ज्योतीचा प्रकाश दिसायचा असेल, तर कंदिलाची काच स्वच्छ धुतलेली आणि पुसलेली असावी लागते. अशा स्वच्छ काचेतून आतल्या ज्योतीचा उजेड बाहेर भरपूर पसरतो. आपल्यामधली परमेश्वरी शक्ती कंदिलाच्या ज्योतीसारखी आहे, अशी कल्पना केली, तर आपली बुद्धी जणू कंदिलाच्या काचेसारखी आहे. बुद्धी स्वच्छ करण्यालाच बुद्धी शुद्ध करणे असे म्हणतात.

आपल्या बुद्धीचा विकास तीन पद्धतींनी होऊ शकतो. बुद्धीची शीघ्रता वाढवता येऊ शकते. म्हणजे एखादा विषय समजून घेणे, अतिशय वेगाने करता येते. बुद्धीची तीक्ष्णता किंवा कुशाग्रता पण वाढवता येऊ शकते. म्हणजे गुंतागुंतीची परिस्थिती किंवा अतिशय अवघड प्रश्नाच्या मुळापर्यंत सहज जाता येते. बुद्धीच्या विकासाचा तिसरा प्रकार म्हणजे बुद्धीची शुद्धता वाढवणे. शुद्धता वाढली म्हणजे विचार करत असताना, माझे मत आणि माझा फायदा, मला सुख कसे मिळेल आणि माझे दुःख कसे कमी होईल, या हेतूने विचार करणे कमी होत जाते. केवळ प्रश्न सुटला पाहिजे, परिस्थिती स्पष्ट झाली पाहिजे आणि त्यातून सर्वांचे हित झाले पाहिजे, एवढाच हेतू शुद्ध बुद्धीने विचार करताना असतो.

बुद्धीची शीघ्रता, कुशाग्रता आणि शुद्धता वाढवण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या मनाची आणि बुद्धीची एकाग्रता वाढवणे. तीक्ष्णता आणि कुशाग्रता वाढवण्यासाठी जो विषय किंवा प्रश्न समजून घ्यायचा, त्यावर मन एकाग्र करावे लागते. असे हे विषय आणि प्रश्न आपल्या बाहेरच्या जगात असतात. बुद्धीची शुद्धता वाढवण्यासाठी आपले मन आणि बुद्धी आपल्या आतमध्ये, त्या दोन्हींनाही चेतना देणाऱ्या आपल्या चेतनेच्या केंद्रावर एकाग्र करावी लागते. काही जणांचे हे केंद्र दोन भुवयांच्या मध्ये आत असते. काही जणांचे केंद्र छातीच्या हाडाच्या मागे भावनिक हृदयात असते. बाहेर किंवा आत कुठेही मन एकाग्र करायचे असले, तरी त्यासाठी रोजचा सराव लागतो. मन आत एकाग्र करायच्या सरावालाच आपण दैनंदिन उपासना म्हणतो. विद्याव्रत संस्काराच्या पोथीमध्ये (विद्याव्रत उपासना, चतुर्थ आवृत्ती, शके १९३९, पान १९) दैनंदिन उपासना करण्यासंबंधी सूचना म्हणून गीतेतला एक श्लोक सांगितला आहे.

गीता ६.१२    :       तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः |

                           उपविश्यासने युञ्जात्‌‍ योगम्‌‍ आत्मविशुद्धये ॥ 

गीताई ६.१२  :        चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी

                           आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे

बुद्धी शुद्ध करण्यासाठी स्वच्छ आसन घालून त्यावर ताठ बसावे. शरीराची हालचाल थांबवली, डोळे मिटून घेतले की इंद्रियांचे व्यवहार शांत होऊ लागतात. मग मनात येणारे विचार कमी करण्याचा प्रयत्न करावा. असे शरीरावर आणि मनावर नियंत्रण आणले, म्हणजे मन एकाग्र करता येते. मग आत्मशुद्धीसाठी म्हणजे मनाच्या आणि बुद्धीच्या शुद्धीसाठी प्रयत्न करावा लागतो. मन शुद्ध करणे म्हणजे मनातील दुःख, राग, अपमानाची आठवण, इ. भावना काढून टाकणे. बुद्धी शुद्ध करणे म्हणजे मनातील ‌‘मी‌’ आणि ‌‘माझे‌’ यासंबंधीचा विचार कमी करणे. याची सुरुवात सर्वांचे भले व्हावे अशा प्रार्थनेने किंवा चिंतनाने करता येते. प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेतील ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये‌’ हा मंत्र त्यासाठीच आहे. परब्रह्मशक्ती स्फुरो म्हणजे आपल्या समाजातील संघटना, पराक्रम, सर्वजण परमेश्वराचे अंश असल्याची जाणीव आणि सर्व मानवांमध्ये ही जाणीव वाढवू अशी विजयेच्छा वाढो. नंतर असेच परब्रह्मशक्तीचे स्फुरण आपल्या संघटनेत, म्हणजे प्रबोधिनीत व्हावे, असे चिंतन करावे. मग आपले शरीर आणि शरीरातील प्रत्येक पेशी, यातील शोक, भीती, अशा भावना दूर व्हाव्यात व त्यामधील ईश्वरी चेतना जागृत व्हावी अशी प्रार्थना करावी. शेवटी आपल्या शरीरातील पेशींचेही नियंत्रण करणाऱ्या चेतनेच्या केंद्रावर मन एकाग्र करावे. हे सरावाने जमू लागते. असे करण्यालाच या श्लोकामध्ये ‌‘योग‌’ म्हणजे ध्यानयोग म्हटले आहे. ध्यानयोगातून मनबुद्धीची शुद्धी झाली की आपल्यामधून परमेश्वरी शक्ती प्रकट होत आहे या श्रद्धेचे हळूहळू प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होऊ लागते. असा अनुभव येऊ शकतो या माहितीला गीतेत ज्ञान म्हटले आहे. प्रत्यक्ष अनुभवाने पटलेल्या खात्रीला गीतेत विज्ञान म्हटले आहे. ज्ञानयोग म्हणजे शुद्ध बुद्धीच्या मदतीने ज्ञानाचे विज्ञान करणे.

The post प्रबोधनाचे गीतासूत्र first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 85

Trending Articles