२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी
या गीतासूत्राच्या तिसऱ्या श्लोकाच्या निरूपणात आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्व योग्य त्या कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात कराव्यात असे सांगितलेले होते. तिथून कर्मयोगाची सुरुवात होते. कर्मयोगात सर्व कामे निरपेक्ष बुद्धीने करायची असतात. पण ते एकदम करता येत नाही. म्हणून आपल्या कर्माचे परिणाम परमेश्वराला अर्पण करायची युक्ती सांगितली. तिथून भक्तियोग सुरू होतो. सुरुवातीला भक्तियोगात सुद्धा परमेश्वराची मूर्ती किंवा चित्र समोर लागते. त्यावर मन एकाग्र करत गेले, की हळूहळू डोळे मिटले तरी डोळ्यासमोर मनातल्या मनातच मूर्ती समोर उभी राहते. काही काळानंतर मूर्ती किंवा चित्राऐवजी एखादी प्रकाशज्योत मनातच पाहणे हे सुद्धा परमेश्वराचे प्रतीक म्हणून पुरते. मागच्या श्लोकात स्वतःच्या आतमध्ये हृदयाच्या ठिकाणी किंवा कपाळाच्या मध्यभागी आतमध्ये ज्योतीची कल्पना करून त्यावर मन एकाग्र करण्याचा सराव करावा अशी कल्पना सांगितली होती.
एवढा सराव झाला, की भक्तियोगातून ध्यानयोगात प्रवेश होतो. असे एकाग्र मनाने ध्यानयोग करत गेल्यास हळूहळू बुद्धी शुद्धी होऊ लागते. बुद्धी शुद्ध झाल्यावर काय होते, हे आजच्या श्लोकात सांगितले आहे. पूर्वी विद्याव्रत संस्काराला आपण उपनयन किंवा दीक्षाग्रहण संस्कार म्हणायचो. दीक्षाग्रहण संस्कार पोथीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये दैनंदिन उपासनेचा परिणाम सांगण्यासाठी गीतेतील पुढील श्लोक समाविष्ट केला होता. (उपनयन उपासना, १९७६ आवृत्ती, पान २२)
गीता ६.२८ : युञ्जन् एवं सदा आत्मानं योगी विगतकल्मषः |
सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखम् अश्नुते ॥
गीताई ६.२८ : आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी
सुखे चि भोगतो योगी ब्रह्मानंद अपार तो
कल्मष म्हणजे दोष किंवा अशुद्धी. विगतकल्मष म्हणजे ज्याचे दोष किंवा अशुद्धी नाहीशी झाली आहे, असा. म्हणजेच ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे असा. ध्यानयोगाचे आचरण करता करता ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे अशी व्यक्ती सुखेन, म्हणजे सहजपणे, फार कष्ट न घेता, अत्यंत सुख म्हणजे दुःखाचा स्पर्श ही नसलेले सुख अनुभवते. अशा सुखालाच तत्त्वज्ञानामध्ये ब्रह्मानंद असा शब्द वापरतात.
प्रबोधिनीमध्ये विद्याव्रत संस्काराच्या आधीपासून काही केंद्रांवर पाचवीपासूनचे, तर काही केंद्रांवर पहिलीपासूनचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी’ हा मंत्र म्हणतात. वरील श्लोकातील दुसऱ्या ओळीचा हा त्यातल्या त्यात सोपा अनुवाद आहे. लहानपणापासून म्हणता म्हणता कधीतरी त्याचा अर्थ समजून घ्यायची इच्छा व्हावी, आणि नियमित दिनक्रम, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, या पायऱ्या चढत चढत या मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, अशी अपेक्षा आहे. या पायऱ्या ठरवूनही चढता येतात. किंवा निष्ठेने कर्मयोग किंवा भक्तियोग आचरत गेल्यास आपोआपही चढल्या जातात.
आपणच ब्रह्म झाल्यावर ब्रह्माचा आनंद कसा अनुभवणार? तुकाराम महाराजांनी साखर होऊन जाण्यापेक्षा साखरेची गोडी अनुभवता यावी, असा दृष्टांत दिला आहे. म्हणूनच येथे, ब्रह्माशी एकरूप होण्यापेक्षा ब्रह्माचा अतिशय निकटचा स्पर्श – ब्रह्मसंस्पर्श व्हावा, असे म्हटले असावे. बुद्धी शुद्ध झाल्यावर ब्रह्मसंस्पर्शाचा आनंद होतो ही ध्यानयोगाची भाषा. भक्तियोगात परमेश्वराची कृपा झाली की त्याच्या दर्शनाचा आनंद होतो असे म्हणतात. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगामध्ये तुकारामांनी ब्रह्मसंस्पर्श झाल्याचे वर्णनच केले आहे. कोणी ब्रह्मसंस्पर्श म्हणजे शुद्ध पक्षातील चतुर्दशीचा चंद्र असे वर्णन केले आहे. एक दिवसाने पौर्णिमेचे पूर्णबिंब होणार आहे, पण पूर्णबिंब झालेले तर नाही. पौर्णिमेचे बिंब व्हायचे ही नाही. कारण पूर्णबिंब म्हणजे ब्रह्माशी एकरूप होणे. चतुर्दशीचा चंद्रच राहायचे. रामकृष्ण परमहंसांच्या संवादात ‘भावमुखी राहा’ असे शब्द वारंवार येतात. जणू घराच्या उंबऱ्यावर उभे राहून आतमध्ये वळून आतील ब्रह्माचा अनुभवही घेता येतो तर कधी बाहेर तोंड वळवल्यावर बाहेरच्या जगातही व्यवहार करता येतो. अशा स्थितीत राहणे म्हणजे भावमुखी राहणे. त्यांची बुद्धी शुद्ध असल्यामुळे अशा स्थितीत राहून ते सर्व काळ आनंद अनुभवत असत.
अशी स्थिती समजू शकणारे विद्यार्थी आठवीत फारच दुर्मिळ असायची शक्यता असल्याने, विद्याव्रत पोथीच्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये हा श्लोक आपण वगळला. शुद्ध चतुर्दशीचा चंद्र होऊन राहणे किंवा भावमुखी राहणे यापेक्षा वेगळा दृष्टान्त प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेचाच भाग आहे. गायत्री मंत्रापूव ॐ भूः ते ॐ तपः या मंत्रांचा उच्चार करताना अनुक्रमे पृथ्वी ते अनंत आकाशगंगा यांचे स्मरण आपण करतो. पण अनंत आकाशगंगा म्हणजे ब्रह्म नाही. ब्रह्म त्याहूनही विशाल आहे. अनंत आकाशगंगा आपल्या बुद्धीच्या आवाक्यात येईपर्यंत सतत विस्तारणारे विश्व आणखी विस्तारलेले असते. ते शुद्ध बुद्धी झाल्यावरच अनुभवता येईल. तो पर्यंत ॐ तपः नंतर ॐ सत्यम् म्हणताना, ब्रह्मसंस्पर्श व्हावा असाच प्रयत्न करायचा असतो. गायत्री मंत्रातली ‘प्रचोदना देवो’ ही प्रार्थना या प्रयत्नांचाच भाग आहे. त्यामध्ये ब्रह्मसंस्पर्श व्हावा यासाठी बुद्धी शुद्ध करण्याची प्रेरणा मिळो, अशीच प्रार्थना सवित्याला म्हणजेच परब्रह्माला किंवा सत्याला करायची आहे.
The post प्रबोधनाचे गीतासूत्र first appeared on ज्ञान प्रबोधिनी.