२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत
पुराणामध्ये ध्रुवाची कथा आहे. सावत्र आईमुळे त्याला वडिलांच्या मांडीवर बसता आले नाही. त्यामुळे जेथून कोणीही उठवणार नाही, असे अढळपद मिळावे म्हणून, त्याने लहानपणीच तपश्चर्या केली. आकाशात उत्तरेला असणारा ध्रुव तारा, गेली काही हजार वर्षे एकाच जागेवर स्थिर दिसतो. तो ध्रुवतारा हेच कुमार ध्रुवाला मिळालेले अढळ स्थान अशी समजूत आहे.
कुठल्याही वाहनाच्या चाकांचा अक्ष पाहिला तर तो स्थिर असतो. त्याच्या भोवती चाकाचे सर्व बिंदू गोल फिरत असतात. त्या अक्षाच्या ठिकाणी आपल्याला जाता आले, तर आपणही स्थिर राहू. पण अक्षापासून थोडे जरी दूर गेलो, तरी जत्रेतल्या पाळण्याप्रमाणे आपण गरागरा फिरू लागतो. हल्ली पूर्व-पश्चिम किनाऱ्यांवरून येणाऱ्या चक्रीवादळांची उपग्रहामधून घेतलेली छायाचित्रे बघायला मिळतात. त्यामध्ये वादळाचा केन्द्रबिंदू स्थिर असतो व त्याभोवती सगळे ढग वेगाने फिरत असतात. या सर्व चक्राकार गतींमध्ये केन्द्रस्थान स्थिर असते. तसे आपल्या आयुष्याकडे पाहता येईल का? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तसे पाहायला सांगतात.
गीता २.१३ : देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति ॥
गीताई २.१३ : ह्या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी |
तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे
जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कोणाचेही आयुष्य पाहिले तर त्यात शिशू अवस्था, बालपण, पौगंडावस्था, तारुण्य, अशा अवस्थांमधून शरीराची वाढ होत जाताना दिसते. मग प्रौढ वयामध्ये काही वर्षे स्थैर्याची जातात. वृद्धावस्थेत शरीराची शक्ती कमी व्हायला लागते. आणि शेवट मृत्यूमध्ये होतो. आपले शरीर अन्नद्रव्यापासून बनलेले असते. आणि मृत्यूनंतर त्याची राख/माती होते. त्या मातीतूनच कुठे तरी पुन्हा अन्नद्रव्य तयार होऊन जगाच्या पाठीवर कुठे तरी काही काळानंतर नवीन व्यक्तीचे शरीर बनते. त्यामुळे एका व्यक्तीच्या शरीराचा जन्म ते मृत्यू हा सरळ रेषेतील प्रवास नसून जन्म-मृत्यू-जन्म-मृत्यू अशा एका मोठ्या अन्न-चक्रातील आपल्याला सरळ भासणारा छोटासा तुकडा आहे. आपण इतरांच्या जन्म-मृत्यूचे निरीक्षण करून या चक्राचा अंदाज करू शकतो. आपले शरीरही याच चक्राचा एक भाग आहे व त्या चक्राच्या गतीनुसार येणाऱ्या आयुष्यातील विविध टप्प्यांपैकी बालपण, तारुण्य आणि जरा किंवा म्हातारपण या तीन टप्प्यांचा उल्लेख गीतेच्या या श्लोकामध्ये आलेला आहे. हे तीन टप्पे आपण अनुभवलेले असतात. शरीरात बदल झाले तरी ‘हे माझे शरीर’ म्हणणारा त्या शरीरातील ‘मी’ एकच आहे. तो बदललेला नाही. याचा अनुभवही आपण घेत असतो. इतर अनेकांच्या देहाप्रमाणे आपल्या देहाचीही माती होणार व त्या मातीला अन्नद्रव्याच्या माध्यमातून नव्या शरीरात स्थान मिळणार याचेही अनुमान आपण करू शकतो.
हा जो स्थिर ‘मी’ आहे, तो मृत्यूनंतर शिल्लक राहतो की नाही, हे लाखातील 99,999 लोकांना सांगता येत नाही. त्यातील अनेकांचा मृत्यूबरोबर ‘मी’ ही संपतो असे मानण्याकडे कल असतो. पण मागच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ज्याने ब्रह्मसंस्पर्शाचा अनुभव घेतला आहे त्याला अखंड आनंदच अनुभवायला येतो. त्याला माझ्या फक्त शरीराचा मृत्यू झाला, मी आहे तसाच आहे याचा अनुभव येतो. मृत्यूनंतर मी संपतो हे जसे अनुमानच आहे, तसे मृत्यूनंतरही मी असतोच हा श्रद्धेचा विषय आहे. जो अशी श्रद्धा ठेवतो, त्याला ब्रह्माशी म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याची संधी आहे.
जवळच्या आप्तांच्या मृत्यूच्या प्रसंगी या श्लोकाचे स्मरण झाले तर मृत्यूचा शोक, आणि आपणही असेच एक दिवस मरणार ही भीती कमी होते. म्हणून धर्म निर्णय मंडळाने तयार केलेल्या व प्रबोधिनीने वापरून प्रसार केलेल्या अंत्येष्टीच्या पोथीमध्ये या श्लोकाचा समावेश केला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार, पाचवी आवृत्ती, शके 1939, पान 13). या श्लोकाच्या वाचन, पठण आणि चिंतनाने मृत्यूची भीती कमी होते. मृत्यूला सामोरे जाता येते. जो संकटांना धैर्याने सामोरा जातो, त्याला संस्कृतमध्ये ‘धीर’ म्हणतात. जीवनातील इतर घडामोडींसारखेच त्याला मृत्यूकडे तटस्थपणे पाहता येते. जो सर्व प्रकारच्या नव्या किंवा अवघड परिस्थितीला आणि मृत्यूला ही धैर्याने सामोरा जातो, तो आयुष्यातील इतर कठीण प्रसंगांनाही न डगमगता सामोरा जाऊ शकतो. स्वतःच्या मृत्यूचेही स्वागत करू शकतो. ब्रह्मसंस्पर्श होईपर्यंत एक शरीर गेले तर दुसरे शरीर मिळेल याची खात्री असल्याने मृत्यूला समोर पाहून तो गडबडून जात नाही. ह्या श्लोकापासून ज्ञानयोगातील मृत्यूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची ओळख आपण करून घ्यायला लागलो. प्रबोधिनीचे राष्ट्रसेवेचे व्रत हे ज्ञान-कर्म-युत-भक्तिव्रत आहे. त्यातील ज्ञानामध्ये लौकिक, म्हणजेच व्यावहारिक आणि शास्त्रीय ज्ञानाबरोबर, जन्म आणि मृत्यूच्या कोड्यामागील आध्यात्मिक ज्ञानाचाही समावेश होतो. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जगातील सर्व घडामोडींमधील स्थिर काय आणि बदलते काय हे ओळखता येणे.
The post प्रबोधनाचे गीतासूत्र first appeared on ज्ञान प्रबोधिनी.