Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 85

मागे वळून बघताना ११ –नवी उमेद उपक्रम

$
0
0

 हिरकणी कामाचा पुढचा टप्पा म्हणजे नवी उमेद उपक्रम!!

मुलासाठी (आपत्यासाठी) काही चांगले करायला सुरवात करायची तर सुरुवातंच आईच्या आत्मसन्मानाने करावी लागते कारण मी काही तरी करु शकते असा स्वसंवाद हिरकणीने करायची गरज असते. सध्याच्या ग्रामीण महिलेच्या आयुष्यातली अगतिकता म्हणजे नातेवाईकांनी ठरवलेल्या नवऱ्याशी लग्न करणे. अनोळखी घरात आता हेच आपलं म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करणे. या टप्प्यावर ‘ती’ला ‘ती’ची म्हणून असणारी जी काही असेल ती ओळख पुसावी लागते… आणि नवीन ओळख निर्माण करावी लागते. 

नुकतेच लग्न झालेल्या कुठल्याही मुलीला लग्न लागून काही तास झाले असतानाही तिचे नाव विचारले तर ती वडिलांच्या नावाऐवजी नवऱ्याचे नाव लाऊन सांगते आणि ऐकणाऱ्या सगळ्यांनाही ते बरोबरच आहे असे वाटते हा सामाजिक संकेत आहे. पण हे नाव कागदोपत्री लागते का? कधी लागते? ज्याचे नाव ती लावते त्याला ‘ती’चे नाव कायदेशीररित्या बदलण्यासाठी काही करावे लागते हे माहिती असते का? ते सगळे करण्याची जबाबदारी वाटते का? तर नाही!! आणि त्यामुळे ‘ती’ सामाजिक दृष्टीने माहेरच्या नावाने अस्तित्वात नसते नि शासकीय दृष्टीने सासरच्या नावाने अस्तित्वात नसते. आपल्याला अस्तित्वच नाही हे तिला माहित असतंच पण ‘खरंच अस्तित्व नसतं’ हे स्विकारणं खूप अवघड असतं. या टप्प्यावरच्या अनेकींशी बोलताना लक्षात आलं की हा काळ अनेकींच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. तेव्हा नेमकी नातेवाईकांपलिकडच्या आधाराची गरज असते. 

हिच नवी उमेद या प्रकल्पाची मध्यवर्ती कल्पना. या प्रकल्पाच्या बैठकीत सुरवातच ‘मँरेज सर्टिफिकेट काढले आहे का?’ या प्रश्नाला हिरकणींनी तोंड देऊन होते. मुलांच्या वाढीवर बोलल्यामुळे जरा मोकळा झालेला गट अशा प्रश्नांनाही खरी उत्तरे देतो ते प्रतिप्रश्न विचारुनच …. ‘हे सर्टिफिकेट म्हणजे काय असतं?’, ‘सर्टिफिकेट मिळवायला परिक्षा द्यावी लागते का?’, ‘हे कोण काढतं’, ‘कुठं मिळतं?’ …… लग्न होऊन पोरं झालेल्या प्रत्येकीवर पोरं झाल्यामुळे आता ही सासरची झाली असा सामाजिक शिक्का बसलेला असतो, तरीही साधारण ६०℅ महिलांकडे तरी मँरेज सर्टिफिकेट नसते… त्यातल्या ५०% महिलांना हे काय असते हे सुद्धा माहिती नसते. मग चला ते काढू या… अशा कामाने त्यांच्या अस्तित्वात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यानिमित्ताने गावातल्या अंगणवाडी ताईची ओळख होते, ग्राम सेवक, तलाठी कोण आहे? ते कुठे बसतात, गावात कधी येतात हे समजते. ग्राम पंचायत कुठंय? हे सुध्दा कळते. नवीन नवरीला देवाच्या पाया पडायला नेतात त्यामुळे ग्रामदेवतेचं मंदिर कुठे आहे ते माहिती असते, आपल्या प्रयत्नाने ग्राम पंचायत कुठे आहे ते समजते. नागरीक म्हणून मतदानाचा अधिकार बजावायचा तर आधी कागदोपत्री अस्तित्वात यावे लागले! ही त्याची पहिली पायरी! 

एकूणच महिलांना ‘आर्थिक’ विषय महत्वाचे असले तरी ‘आपले’ वाटत नाहीत म्हणून वेळ आल्यावर समजून घेण्यापेक्षा वेळेत समजून घ्यावेत या हेतूने या हिरकणींना बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत बचत खाते काढायला सांगायचो. 

साधे बचत खाते बँकेत काढायचे तर नवीन नावाने pan हवा, त्याच नावाने आधार हवे या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यापासून सुरुवात करावी लागते .. यातल्या प्रत्येक कामाला काही महीने लागतात. त्यामुळे अशी कामे करता करता एकीकडे या वयाला साजेशी आरोग्याची माहिती सांगायची. हिरकणीला स्वतःचे हिमोग्लोबिन किती आहे हे माहीत असायला हवे. त्या निमित्ताने गावाच्या जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे गावात औषध देणारी आशा आरोग्य सेविका कोण आहे ती कुठे रहाते हे माहिती होते. जाताजाता पाळी चक्र समजणे, सँनिटरी नँपकिन बद्दल माहिती घेणे असेही विषय ओघाने पुढे यायचे. हिरकणी सत्र घेणारा स्थानिक कार्यकर्त्यांचा गटच नवी उमेद याही उपक्रमात काम करतो त्यामुळे संवाद मोकाळेपणा असतो. असा संवाद करण्याचे घेणाऱ्या गटाचे प्रशिक्षण नियमित चालू असते. नवी उमेद या उपक्रमाचे ही चौथे वर्ष चालू आहे, 

हे सगळे करताना लक्षात घ्यायचे की गटातील हिरकणी जर पहिल्या बाळाची असेल तर तिचे लग्न होऊन फार दिवस झालेले नसतात त्यातले बरेच दिवस माहेरी ये-जा करण्यात गेलेले असतात, तशी ती संसारी फारशी रुळलेली नसते.. तिचा घरातला संवादही पुरेसा सांधलेला असतोच असे नाही. या टप्प्यावर छोट्या कुरूबुरी सुरु होण्याचा धोका असतो.. आशा कुरूबुरीचे मानसिक ताणात रूपांतर होता कामा नये म्हणून तिला छोट्याशा गटात बोलते करणे हे सुद्धा एक महत्वाचे काम करावे लागते. हिरकणी गटाला सासरच्या मंडळींकडून नातेवाईकांचा परिचय करून दिला जातो, तसा नवी उमेद उपक्रमातील सहभाग नात्यापालिकडच्या, तिच्या वयोगटातल्या गावातल्या समवयस्कांचा परिचय करून देतो.. मग त्यांना गावातच मैत्रिणी मिळतात परिणामतः गाव लवकर आपलं वाटायला लागतं. छान गट जमला आणि एखाद्या गटाची दिवसभराची मुलांना घेऊन कुठेतरी सहल निघाली तर मग गटातल्या हिरकणींचे मैत्रीबंध दृढ झालेच म्हणून समजा मग त्यांची ताकद गावाला हळूहळू कळू लागते. पण या पुढच्या सगळ्यांची सुरुवात हिरकणींच्या एकत्र बसण्यापासून सुरू होते हे विसरू नका याचेच नाव नवी उमेद, जे कागदपत्र काढण्यापासून तीला अस्तित्वात आणण्यापासून सुरू होते!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

The post मागे वळून बघताना ११ – नवी उमेद उपक्रम first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 85

Trending Articles