Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 85

मागे वळून बघताना १२ –गोष्ट एकत्र उद्योगाची

$
0
0

आज पर्यंतच्या अनुभवात आपण यशस्वी झालेल्या गोष्टी बघितल्या पण सुरु केलेली प्रत्येकच गोष्ट हवी तशी यशस्वी होते असं नाही, काही वेळा, काही प्रमाणात यश पदरी पडलेले असते अशा एका उद्योग प्रकाराची गोष्ट आज पाहूया! 

१९९५ साली वेल्ह्यात बचत गट सुरु झाले. अगदी किरकोळ म्हणजे महिन्याला २५ रुपये बचत असली तरी दर महिन्याला बचतीचे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न होताच, म्हणून जोडीनेच स्वयंरोजगाराचे काम सुरु केले. त्या सुमारास शासनाचा जोर होता की महिलांनी गटाने एकत्र येउन उद्योग करावा पण असे उद्योग कुठे यशस्वी झालेला ऐकलेले नव्हते. एखाद्या महिलेने स्वबळावर स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात करणे हे त्या काळात फारच अवघड होते याची कल्पना होती म्हणून शासन म्हणतेच आहे तर गटानी एकत्र उद्योग करून बघू असे ठरवले!

कुठलाही उद्योग करायचा ठरवला तर उद्योग यशस्वी होण्यासाठी तयार मालाची खरेदी कोण करणार हे माहित असायला हवे. जोपर्यंत शाळा आहेत आणि काळा फळा वापरला जातो तोपर्यंत खडू लागणारच या गृहीतावर १९९६ साली आपल्या वेल्ह्यातील महिलांनी गटाने पहिला खडू निर्मिती उद्योग करायचा ठरवला.  खडू कसा बनवायचा ते शिकवले, कच्चा माल कुठून आणायचा ते सुद्धा शिकवले. अतिशय उत्साहाने सगळे समजून महिलांनी परिश्रम करून खडू बनवले. वेल्ह्यातील सगळ्या शाळा सरकारच्या मालकीच्या मग ‘सरकारच विकत घेईल का?’ विचारायला हवे असे म्हणत बचत गटाच्या महिला पंचायत समितीमध्ये खडूचा नमुना घेउन गेल्या. आणि ‘हो’कार मिळवून परतल्या! खडूचा कच्चामाल कोणी आणायचा हे त्यांनी ठरवलं, परवडणारा दर काय असावा हे त्यांनी ठरवलं, वाटप करण्यासाठी कमीत कमी खर्च यावा म्हणून स्थानिक जीपवाल्याशी बोलणे केले, सगळं परवडणाऱ्या खर्चात होईल असे पाहिले आणि महिलांनी गावोगावी जाऊन शाळांना खडूचे वाटप केले सुद्धा. कधीच शाळा न पाहिलेल्या महिलांनी पुढच्या पिढीच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली! 

आता पुढची अडचण डोळ्यासमोर आली ती म्हणजे दिलेल्या खडूच्या बिलाची वसुली कशी करायची? हे सगळं करेपर्यंत मलाही ‘शासन कसं चालतं’ याची पुरेशी कल्पना नव्हती आणि त्यामुळे मीही त्यांच्या सारख्याच  भाबड्या समजूतीत होते की ज्या अर्थी शासनाने खडूची ऑर्डर दिली त्याअर्थी पैसेही सहज मिळतील! पण तसे झाले नाही… महिनोंमहिने हेलपाटे मारावे लागले… हळूहळू गटाची प्रेरणा कमी व्हायला लागली. आता तर गटाची प्रेरणा टिकणे हेच मोठे आव्हान होउन बसलं … म्हणून या गटाला ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य विभागाच्या मदतीने ‘समिधा गोळा करणे’ असे काम मिळवून दिले. हजारो रुपयांच्या समिधा या गटांनी पुण्यात आणून विकल्या. त्यातून खडूच्या वसूलीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना तोंड द्यायची हिम्मत आली. जवळजवळ दोन वर्षांनी जेमतेम घातलेली मुद्दल बाहेर येऊन खडूचा व्यवसाय गुंडाळून ठेवायला लागला. खरेतर समिधा विकण्याचा उद्योग केल्यामुळे शासनाकडून खडूची रक्कम मिळवता आली, नाहीतर हेलपाटे मारण्यासाठी लागणारं महिला गटाचं मनोबलही कमी पडलं असतं. तर काय खडू निर्मिती उद्योग ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण बंद केला! त्यातून मी शिकले की तोटा झाला नाही हा मोठ्ठाच फायदा!!

प्रयोग दुसरा : ज्ञान प्रबोधिनीची शिवायपूरला यंत्र शाळा चालू होती. आपण महिलांना फक्त एरवी महिलाच करू शकतील अशाच कामात गुंतवायचे नाही असे ठरवलेच होते तेव्हा संधी चालून आली की व्हऱ्लपूल वॉशिंग मशिनला शॉक अबसॉर्बर असेंबल करून हवे होते. मग काय महिलांना सोल्डरींग शिकवले आणि जॉब करून द्यायला सुरुवात झाली. गटाने उद्योग केला. गटाच्या नावाने चलन तयार केले. जमले.. पण कारखानाच त्या भागातून हालला त्यामुळे जास्त काळ जमलेला उद्योग करता आला नाही!

तिसरा उद्योग: महाराष्ट्र ग्रामीण पत पुरवठा म्हणजेच एम आर सी पी योजनेतून 1998 च्या सुमारास आंबवणे गावात युरिया-डीएपी खताच्या ‘विक्रम’ नावाने ब्रिकेट करायला सुरुवात केली. दोन खतं एकत्र करून प्रेशरने त्याच्या ब्रिकेट होतील असा उद्योग, यंत्र खरेदी करून सुरु केला. जे कधी बघितले नाही त्याचे उत्पादन कर्ज घेउन करायचे हे शिकवताना खूपच अवघड जात होतं. शासकीय योजनेतून निधी मिळत होता म्हणून अंबवणं गावाच्या गटाला तयार केलं. या उत्पादनाची मुख्य खरेदी ज्ञान प्रबोधिनी संस्था स्वतः करणार होती त्यामुळे अडचण नव्हती. उत्पादन १ टन झाल्यावर आनंदाची बातमी कळली की संस्थे बरोबर आता गोळीखत वापरासाठी कृषी खात्यानी सुद्धा पुढाकार घेतला आहे. कृषी खाते सबसिडी देणार आहे. याचा प्रचार झाल्यामुळे मागणी चांगली वाढली. जिथे खाजगी लोकं खरेदी विक्री करणार होते ती प्रत्येक गोष्ट यशस्वी झाली पण जेव्हा कृषी खात्यानी दोन टन खरेदी करायचं आमिष दाखवून प्रत्यक्ष खरेदीही केली, तेव्हा मात्र हा उद्योग डब्यातजायला सुरुवात झाली कारण त्याची पै पै वसुली करण्यासाठी लागणारं मनोबळ गटाकडे शिल्लकच राहीलं नाही. खरंतर वेल्हे तालुक्यात महिलांनी चालवलेला हा एकमेव यशस्वी उद्योग असल्यामुळे त्या दोन वर्षात जणूकाही शासनाकाडे आलेला प्रत्येक पाहुणा हे युनिट बघायला आला, त्याने गटाला भेट देली. पण त्या पाहुण्यांचं चहापाण्याचं बिल मात्र गटाला कधीच मिळालं नाही. हा उद्योग, उद्योग म्हणून यशस्वी झाला पण पाहुणचारासाठी करावा लागलेला भरमसाठ खर्च गटाला परवडला नाही आणि गट कर्ज फेडू शकणार नाही म्हणजे ‘बुडीत’ झालं असं बँकेने जाहीर केले. पै सुद्धा परत न करता कर्ज माफ होणार होतं पण आपण अस करायला कधीच शिकवले नाही. उलट गटाला आवाहन केले की आपला गट बुडीत जातोच कसा? असं चालणार नाही, नफा झाला नाही तरी चालेल पण ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण गट बंद करू. त्यानंतर गटात पुन्हा एकदा जिवंतपणा आणला आणि युनिट चालू झालं. काळजी घेऊन.. एकही रुपयाची शासकीय ऑर्डर घेतली नाही. फक्त प्रबोधिनीच्या बचत गटाच्या संपर्काचा वापर करून, गटाने बँकेकडून घेतलेले कर्ज पै-पै फेडलं आणि यंत्र विकलं. यंत्र विकून आलेले पैसे गटाचा फायदा होता, तो गटाने वाटून घेतला. विशेष म्हणजे एका सभासदाच्या वाट्याचा नफा संस्थेला गटाने स्वखुशीने दिला…. 

या टप्प्याला गट गेला, या निमित्ताने गावात महिलांनी चालवलेला उद्योग ‘चालतोस कसा?’ म्हणूनही खूप भांडण झाली. त्या सगळ्यावर वेगवेगळ्या प्रकारानी महिलांनी मात केली. तालुकाभर चर्चा होऊन शेवटी कोणालाही अडचण नाही अशा टप्प्यावर हा गट उद्योग बंद केला आणि श्रीरामनगरच्या गटाने ते यंत्र खरेदी केले. श्रीरामनगरच्या गटाने नवीन उद्योगाला सुरुवात केली. हा युरिया ब्रिकेटचा एकत्र उद्योगाचा चौथा प्रयत्न! 

श्रीरामनगरच्या गटाला जुन्या यंत्रावर जमतंय असं लक्षात आल्यानंतर जुने यंत्र वापरून वापरून रसायनामुळे निकामी झाले, मग नवीन यंत्र खरेदी केले. गटाच्या प्रमुख आशाताई गोगावले यांनी हवेली पंचायतीमध्ये चकरावर चकरा मारल्या आणि कुठल्याही टेबलवर एक रुपयाची सुद्धा लाच न देता काम करून घेतले. राज्यपालांच्या हस्ते गटाच्या उद्योगाचे उद्घाटन झाले. हा उद्योग गटाने व्यवस्थित चालवला. या गटामध्ये महिलांनी एकत्र काम करून युरिया ब्रिकेटचे उत्पादन केले हे खरे पण या वेळेपर्यंत आलेल्या अनुभवाने काम करणार्या गटाला दिवसाच्या रोजंदारीवर मजुरी देण्याऐवजी एक टन काम केले की ठराविक मजुरी असे गणित आपण करून दिले. हा उद्योग यशस्वी झाला. गटाला सर्व कर्ज फिटेपर्यंत ऑर्डर मिळण्यासाठी, मिळवण्याची संस्थेने मदत केली. गावातील स्थानिक लोकांनी सुद्धा मदत केली या गटानी खताची खरेदी विक्री करण्यासाठी परवाना सुद्धा काढला. जोपर्यंत गट एकसंध होता तोपर्यंत हा उद्योग अतिशय यशस्वी चालला. पाच-सहा वर्षानंतर त्याच गटाला तो उद्योग त्याच प्रेरणेने चालवता येणार नाही असे लक्षात आले, तेव्हा हा उद्योग यशस्वीपणे दुसऱ्याकडे सुपूर्द केला. गटातील महिलांनी हौसेने एकसारख्या साड्या नेसून भिमथडी पासून सर्व प्रदर्शनात सहभाग घेतला आणि आमचे उत्पादन वापरल्याने उत्पादन कसे वाढते ही पटवू दिले! श्रीरामनगरच्या या गटाला ५ वर्षांमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र पातळीचा यशस्वी उद्योजकता पुरस्कार मिळाला, हे सांगण्यास अतिशय आनंद होतो. या गटाच्या कामामुळे आशाताई यांच्यावर काढलेली ‘सारं बदललं’ ही चित्रपट्टीका यशदाने बचत गट प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात घातली त्यामुळे शासन सहभागाने ही कल्पना महाराष्ट्रभर पोचली, हे आपले भाग्यच म्हणायचे!! 

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

The post मागे वळून बघताना १२ – गोष्ट एकत्र उद्योगाची first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 85

Trending Articles