Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 88

प्रबोधनाचे गीतासूत्र

$
0
0

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे

ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी ही संस्था का निर्माण करत आहोत या संबंधीचा लेख लिहिलेला आहे. त्यात म्हटले आहे की आपल्या देशात विचार आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत नवनिर्मिती व्हावी आणि त्यांचा सर्वांमध्ये विकास व्हावा, या द्वारे देशाचे भौतिक आणि सामाजिक रूप पालटावे, जुन्या वारशाचे आदर व अभिमानाने उपयोजन व्हावे आणि नव्या परंपरा निर्माण करण्याचा उत्साह आणि उरक यावा, यासाठी ही प्रबोधिनी सुरू करत आहोत. असे करणे म्हणजेच मागच्या निरूपणात म्हटलेला समाजाचा योगक्षेम वाहणे. व्यक्तीच्या बाबतीत योगक्षेम शब्द वापरला आहे. समाजाचा योगक्षेम वाहण्यालाच गीतेमध्ये धर्मसंस्थापना असा शब्द वापरलेला आहे. प्रबोधिनीच्या सात तत्त्वांवरील लेखांपैकी धर्मसंस्थापना याच शीर्षकाच्या पहिल्या लेखात गीतेतील पुढील प्रसिद्ध श्लोक आहे.

             गीता 4.8 :           परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌‍ |

                                     धर्मसंस्थापनार्थाय संभावामि युगे युगे ॥

             गीताई 4.8 :         राखावया जगी संतां दुष्टां दूर करावया |

                                    स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगीं युगीं 

            शेतातली पिके कोमेजायला लागली की त्यांना तरतरी येण्यासाठी दोन गोष्टी करायला लागतात. एक म्हणजे पिकांना खत-पाणी घालणे आणि दुसरे म्हणजे पिकांची नासाडी करणारी कीड नष्ट करणे आणि त्यांची जमिनीतली पोषक द्रव्ये पळवणाऱ्या तणांना उपटून काढणे. तसे समाजात अव्यवस्था, अराजक, अनाचार व्हायला लागला की त्याचा दुसरा परिणाम म्हणजे शांतता, व्यवस्था, सदाचार, सुसंवाद यांची शक्ती कमी पडायला लागते. त्यालाच धर्माला ग्लानी आली असे म्हणतात. खूप कष्ट झेलल्यावर माणूस जसा गळून जातो, तसा जणू काही धर्म गळून जातो. धर्माची ग्लानी दूर करणे हे काम धर्माला पुन्हा बळकटी आणण्याने होते. पण धर्म पुन्हा जोराने सक्रिय व्हायचा असेल तर अराजक, अनाचाराची कारणे दूर करावी लागतात. अनाचार करणाऱ्या दुष्टांचा बंदोबस्त करावा लागतो. त्यांचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत सदाचारपूर्ण जीवन जगू इच्छिणाऱ्यांचा प्रतिपाळही करावा लागतो. म्हणून साधू-सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्कृत्ये करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी झटणारे म्हणजे जणू मानवरूपात जन्म घेतलेली ईश्वरी शक्ती आहे अशी कल्पना केली आहे.

            सरधोपट मार्गाने विचार केला तर असे काम करणे म्हणजेच धर्मसंस्थापना असे वाटते. पण सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश, ही दोन्ही कामे करणे, हे तण काढण्यासारखे आहे. अधर्म डोके वर काढत असतो ते ठेचण्यासारखे आहे. योगक्षेमापैकी हे क्षेम राखण्याचे काम आहे. पिकांची मरगळ दूर करणे, त्यांना टवटवी आणणे म्हणजे सज्जनशक्तीला निर्भय, संघटित, विस्तारशील आणि नवनिर्माणक्षम बनवणे आहे. यालाच धर्मसंस्थापना म्हणायचे. हेच योगक्षेमापैकी योग साधण्याचे काम आहे. हे काम करणारे म्हणजे जणू मानवरूपात जन्म घेतलेली ईश्वरी शक्ती आहे अशी समजूत आहे. खरे तर सर्व माणसांमध्येच ईश्वरी शक्ती असते. तिची जाणीव ज्यांना होते ते सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश करून अधर्माची वाढ थांबवतात. आणि धर्माचा गळाठा घालवून धर्मसंस्थापना ही करतात.

            ‌‘श्री माताजी-श्री अरविंद काय म्हणाले? ‌’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कै. आप्पांनी गुरु गोविंदसिंहांच्या ‌‘विचित्र नाटक‌’ या आत्मचरित्रातील दोन ओळी उद्धृत केल्या आहेत. (प्रस्तावना पान सहा)

याही काज धरा हम जनमं | समझ लेहु साधू सभ मनमं |

धरम चलावन, संत उबारन | दुसट सभन को मूल उपाटन ॥

(विचित्र नाटक, ४.४३)

            ‌‘हे सज्जन हो, आपण सर्व मनात जाणून असा की धर्मस्थापना करणे, साधूंचे रक्षण करणे, सर्व दुष्टांचे मूळ उपटून काढणे, यासाठीच आम्ही जन्म घेतला आहे.‌’ श्रीकृष्णाला कोणी पौराणिक पुरुष मानतात. त्याच्याच भाषेत गुरू गोविंदसिंहांसारखा ऐतिहासिक पुरुष हे सांगतो आहे. तुम्ही आम्ही सर्वजण ही तसे म्हणू शकलो पाहिजे. धर्मसंस्थापना या शब्दात धर्माला प्राधान्य आहे. धर्म शब्दाबाबत अनेक गैरसमजुती आहेत. कै. आप्पांनी त्याच्या जागी समाजाला प्राधान्य देणारा समाजसंस्थापना हा शब्द वापरायला शेवटी शेवटी सुरुवात केली. स्वतःमधील ईश्वरी शक्ती समाजसंस्थापनेसाठी जागविणे, समाजाच्या योगक्षेमासाठी वापरणे, म्हणजेच समाजसंघटन, समाजविकास आणि समाजाच्या उत्क्रांतीसाठी वापरणे, हाच खरा सकारात्मक समाजाभिमुख कर्मप्रवण भक्तियोग आहे. असे काम करणारे दर पिढीमध्ये अनेक जण असणे म्हणजेच प्रत्येक युगात परमेश्वराने अवतार घेणे.

            प्रबोधनाचे गीता-सूत्र या मालेतील पहिले आठ श्लोक कर्माविषयी होते. नंतरचे आज अखेरचे अकरा श्लोक भक्तीविषयी आहेत. पुढील रविवारपासून ज्ञानाविषयीच्या श्लोकांचे निरूपण सुरू होईल.

The post प्रबोधनाचे गीतासूत्र first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 88

Trending Articles