Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 160

धर्म

धर्म

  • धर्माचा अर्थ

नेहमीच्या भाषेमधे आपण हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असे शब्दप्रयोग करत असतो. येथे धर्म शब्द आपण उपासनापद्धती म्हणून वापरतो. धर्म शब्दाचा खरा अर्थ मात्र उपासनापद्धती असा नव्हे. ‌‘धृ‌’ म्हणजे धारण करणे या अर्थाचा संस्कृत भाषेतील धातूपासून धर्म शब्द बनला आहे. व्यक्ती आणि समाजाच्या धारणपोषणास कारणीभूत होतो तो धर्म. ज्या नियमबंधनांच्या योगे समाजव्यवस्था टिकून राहाते व प्रगती करते त्याला धर्म म्हणतात. ‌‘संतुलित समाजस्थितीसाठी आवश्यक असलेला आचार‌’ हा धर्म शब्दाचा अर्थ आहे. धर्म शब्दाला हा सामाजिक संदर्भ महाभारतात प्राप्त झालेला दिसतो.   

धारणात् धर्मम्‌‍ इति आहुः धर्मेण विधृताः प्रजाः |

यः स्यात् धारणसंयुक्तः सः धर्मः इति निश्चयः  (महाभारत शांतिपर्व  १०९-११)

       धारण करण्याच्या क्रियेमुळे (विशिष्ट आचारपद्धतीला) धर्म असे म्हणतात. धर्माच्या योगाने समाजधारणा होते. म्हणून ज्याच्या ठिकाणी धारणपोषण करण्याचे गुण आहेत त्याला धर्म असे निश्चितपणे म्हणावे.

या व्याख्येत व्यासांनी समाजधारणा हेच धर्माचे मुख्य ध्येय मानले आहे. परंतु समाजाची धारणा होते म्हणजे काय? कणाद महर्षींनी म्हटल्याप्रमाणे –

              यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः धर्मः | (वैशेषिक सूत्र १-१-२)

       ज्याच्यामुळे अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ती होते तो धर्म ! अभ्युदय म्हणजे घरदार, जमीनजुमला, पैसाआडका आदि ऐहिक सुखसोयींची साधने मिळवून उन्नती साधणे, तर  निःश्रेयस म्हणजे आत्मिक उन्नती साधून परमोच्च सात्त्विक आनंदाचा अनुभव घेणे. धर्मामुळे  समाजाची धारणा होते याचा अर्थ अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल सामाजिक परिस्थिती प्राप्त होते.

       आपल्या पूर्वजांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांची मांडणी केली आहे. काम म्हणजे मानवी इच्छा-आकांक्षा आणि अर्थ म्हणजे त्या पूर्ण करण्याची साधने. अर्थप्राप्ती आणि कामनापरिपूर्ती म्हणजेच अभ्युदय. या गोष्टी धर्माच्या चौकटीत राहूनच करायला सांगितल्या आहेत. मोक्ष म्हणजेच निःश्रेयस. मोक्ष हा परमपुरुषार्थ होय. धर्माचे आचरण करणे हे मोक्षमार्गासाठी आवश्यक असेच आहे. अशाप्रकारे धर्म हा सर्व पुरुषार्थांचा पाया मानला जातो.

       या धर्माचे मूलाधार कोणते? धर्म कोणता हे ठरवण्याचे स्रोत कोणते? मनुस्मृतीत म्हटले आहे-

वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य प्रियमात्मनः |

एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम्‌‍   (मनुस्मृती २-१२)

       वेद (ज्ञान), स्मृती (धर्मशास्त्र), सदाचार आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ही चार धर्माची लक्षणे होत.

वेदप्रामाण्य मानणारा आणि न मानणारा असा सर्व भारतीय समाज डोळ्यासमोर ठेवून वेद याचा ज्ञान असा मूळ अर्थ येथे स्वीकारावा लागेल. वेद हा शब्द विद्‌‍ म्हणजे जाणणे या धातूपासून बनला असून ज्ञान, ज्ञानाचे साधन, ज्ञानाचा विषय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ज्ञान हा धर्माचा मूलाधार आहे.

स्मृती म्हणजे धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्र म्हणजे कायदा. त्या त्या काळात त्या त्या स्मृती कायदा म्हणून प्रचलित होत्या व स्थलकालानुरूप त्यांत परिवर्तने झाली आहेत. आजच्या काळात भारताच्या घटनेच्या आधारे बनवलेले कायदेच या देशातील लोकांना लागू आहेत. स्मृती म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या चांगल्या सामाजिक प्रथा असा अर्थ घ्यावा.

सदाचार हा धर्माचा एक मूलाधार म्हणून मानला आहे. यासंदर्भात –

    जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्व भावे करावे (मनाचे श्लोक )

       हे समर्थ रामदासांचे सोपे सूत्र लक्षात ठेवावे. समाजामधे ज्या व्यक्ती आदर्श म्हणून मानल्या आहेत अशांचे उदाहरण समोर ठेवून केलेले आचरण किंवा समाजामधे जो आचार चांगला मानला आहे, तदनुरूप आचरण असा सदाचार याचा अर्थ होतो. व्यक्तीला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा धर्माचा मूलाधार म्हणून स्वीकार होणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अर्थात् या प्रिय असणाऱ्या गोष्टी वेद, स्मृती, सदाचार यांच्या निकषांवर तपासून घेतलेल्या अशाच असल्या पाहिजेत. कोणीही मन मानेल तसे वागावे आणि त्याला धर्म म्हणावे असा अर्थ येथे नाही.

       अशा प्रकारे वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःचे प्रिय यांच्या आधारावर उभ्या असलेल्या धर्माचे भारताच्या बाबतीत तर विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व स्वामी विवेकानंदांनी बरोबर ओळखले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा जसा विशेष स्वभाव असतो तसाच प्रत्येक राष्ट्राचाही असतो. त्या स्वभावानुरूपच त्या त्या राष्ट्राची उन्नती होते. त्या स्वभावाला अनुसरून केलेल्या सुधारणाच त्या राष्ट्रासाठी उपयोगी ठरतात. भारताचा विशिष्ट स्वभाव, विशिष्ट प्रकृती, विशिष्ट जीवनहेतू ‌‘धर्म‌’ हा आहे. म्हणूनच धर्माचा विचार न करता केलेल्या योजना अन्य राष्ट्रांबाबत उपयोगी ठरत असल्या तरी त्या भारतात मात्र यशस्वी होतीलच असे नाही. म्हणूनच स्वतःची आणि आपल्या परमप्रिय राष्ट्राची प्रगती साधू  इच्छिणाऱ्या प्रत्येकाने धर्माचा विचार केला पाहिजे.

       समाजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून घालून दिलेले नीतिनियम असा धर्म या शब्दामागचा आशय आपण पाहिला. समाजाचे म्हणून जसे काही नीतिनियम असतात तसेच ते प्रत्येक व्यक्तीसाठीही, स्वतंत्रपणे सांगितलेले असतात. तोच त्या त्या व्यक्तीचा धर्म होय. उदा. उत्तम अध्ययन करणे हा विद्यार्थ्याचा धर्म होय. सचोटीने व्यापार करणे हा व्यापाऱ्याचा धर्म होय. पक्षपात न करता न्याय देणे हा न्यायाधीशाचा धर्म होय. अशा त्या त्या  माणसागणिक बदलणाऱ्या धर्माला  गीतेने ‌‘स्वधर्म‌’ म्हटले आहे.

       पण माणूस म्हणून प्रत्येकाचा धर्म कोणता? स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, “माणसामधे मूलतःच असलेले दिव्यत्व आविष्कृत करणे म्हणजे धर्म”. या दिव्यत्वाच्या आविष्करणास उपयुक्त अशी सेवा, प्रेम, त्याग, निःस्वार्थीपणा, अहिंसा, सत्य अशी तत्त्वे  मूल्ये म्हणून सांगितली गेली आहेत. अशी ही धर्माची स्थलकालाच्या कसोटीला उतरून  शाश्वत ठरलेली तात्त्विक बाजू आहे. ही बाजू स्थिर व कालातीत म्हणूनच  अपरिवर्तनीय आहे.

       धर्माच्या या तत्त्वज्ञानात्मक अंगाला व्यावहारिक चौकटही असावी लागते.  स्वामी विवेकानंद  एके ठिकाणी म्हणतात, “केवळ शिथिल अशा तत्त्वज्ञान पद्धतीने लोकांच्या मनावर प्रभाव पडत नाही. लोकांना साधारणपणे बाह्य अनुष्ठानांची आवश्यकता असते. धर्म म्हणजे अनुष्ठानांच्या व प्रतीकांच्या द्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्तरूप होय.”                            (विवेकानंद ग्रंथावली खंड ९, आवृत्ती ४, पान ५०३)

प्रस्तुत पुस्तकात आपण संस्कार, शांती, पूजा यांसारख्या धर्मविधींचा परिचय करून घेणार आहोत. त्यामुळे धर्मामधे या विधींचे स्थान काय हेही आपण पाहिले पाहिजे. हे धर्मविधी म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे धर्माच्या तत्त्वज्ञानात्मक अंगाला व्यावहारिक चौकट देण्याचाच एक प्रयत्न आहे. हे धर्मविधी म्हणजे धर्ममार्गावरील प्रारंभिक पायऱ्या किंवा धर्मरूपी रोपट्याला घातलेल्या कुंपणाप्रमाणे आहेत. रोपट्याच्या रक्षणासाठी प्रथम कुंपणाची आवश्यकता असतेच  असते. म्हणून माणसाच्या मनातील धर्मभावनेच्या रक्षणासाठी हे संस्कार, शांती, पूजा इ. धर्मविधी आवश्यक आहेत.

       रोपट्याचा वृक्ष झाल्यावर ते कुंपण त्याच्या वाढीस अडथळा ठरते व त्याची आवश्यकता उरत नाही हे खरे. या अर्थाने ही सर्व क्रियाकर्मे, अनुष्ठाने, शास्त्रे, इ. गोष्टींना स्वामी विवेकानंदांनी गौण तपशीलाच्या बाबी असे म्हटले आहे. पण या गौण तपशीलाच्या बाबींचे महत्त्वदेखील ते जाणून होते असेच दिसते. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, “कर्मकांड, अनुष्ठाने, देवळेरावळे व तत्सदृश बाह्य अवडंबर निरर्थक आहे असे म्हणणे फार सोपे आहे. पण या साऱ्या स्थूल वस्तू ज्यांची प्रतीके होत त्या अमूर्त भावांचा उदय त्यांच्यामुळे होत असतो. म्हणून अनुष्ठाने व प्रतीके यांची उपेक्षा करणे व त्यांना फाटा देणे हे शहाणपणाचे नाही.” (विवेकानंद ग्रंथावली खंड १, आवृत्ती ४,  पान ९७)

       अशाप्रकारे धर्मातील विधींचे महत्त्वाचे स्थान समजावून घेतल्यानंतर आपण क्रमशः संस्कार, शांती आणि पूजा यांसारख्या धर्मविधींचा परिचय करून घेऊ.

The post धर्म first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 160

Trending Articles